Monday, January 2, 2017

'पु.लं. च्या काही लेखांचे एमपी३ज आहेत. पाठवू का?' एका मित्राचा मेसेज आला. नेकी और पुछ पुछ? म्हटलं नक्कीच पाठव. म्हणायचा अवकाश. लगेच सात-आठ फाईल्स फोनमध्ये येऊन पडल्या. मग काय? एखादी आवडीची डिश पुरवून पुरवून खावी तसं एका दिवशी एकच लेख ऐकायचा (!) असं ठरवलं पण ते काही जमलं नाही. मग अधाश्यासारखे माझे पौष्टिक जीवन, अंतू बर्वा, नारायण, हरितात्या, चितळे मास्तर आणि मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर ऐकले.

ही पुस्तकं वाचून किती वर्षं झाली. शेवटची केव्हा वाचली होती आठवत देखील नाही. तशी सगळी आहेत माझ्याकडे. पण कपाटात. लायब्ररीत जायला जमणार नाही किंवा आसपास लायब्ररी नसेल तेव्हा वाचू म्हणून हौसेने जमवलेल्या अनेक कधीही न वाचलेल्या पुस्तकांत हीसुध्दा आहेत. एके काळी 'आपल्यानंतर ह्या पुस्तकांचं काय' हा प्रश्न सतावत असे. पण एखाद्या गावातल्या लायब्ररीला देऊन टाकायची असा निर्णय घेऊन टाकल्याने मामला सोपा झाला आणि मी पुस्तकं जमवायला मोकळी झाले. पण तरी कधीकधी देवाजीने ७० च्या वर वगैरे आयुष्य दिलं तर तोवर ही पुस्तकं द्यायला भारतात गावं आणि त्यातल्या लायब्ररया रहातील का ही भीती सतावते. :-) अर्थात ज्या वाटेवरून जग चाललंय त्या वाटेवरूनच जात राहिलं तर मी सत्तरी गाठायची सुतराम शक्यता नाही हेही आहेच.

असो. तर पु.लं. इतक्या वर्षांनंतर हे लेख वाचताना, सॉरी ऐकताना, "पुन:प्रत्ययाचा" का कसला म्हणतात तो आनंद झाला. खदखदून हसायला लावणाऱ्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्या आहेत. ह्या माणसाची खरोखर कमाल आहे. एकाच लेखात हसता हसता आणि रडता रडता वाचकाच्या/श्रोत्याच्या डोळ्यांतून पाणी काढता येणं किती कठिण आहे. पण पु.लं. सहजपणे हे करतात. Hats Off!

आता एक फाईल ऐकायची राहिली आहे. बाकीच्यांपेक्षा तिचा साईज दुप्पट आहे म्हणजे बहुतेक दोन लेख असणार. सुरुवात तर 'रावसाहेब' ने झाली आहे हे मी ऐकून ठेवलंय. अजून कुठला लेख असेल ही उत्सुकता आहे. पानवाला? का म्हैस? पाहू जादुगाराच्या पोतडीतून काय निघतं ते :-)

No comments: