Sunday, January 1, 2017

४. लोकमत दीपोत्सव

लोकमतचा २०१५ चा दिवाळी अंक वेगळ्या विषयांवरच्या, आजच्या भाषेत सांगायचं तर डोक्याला 'शॉट देणार्या' लेखांनी समृध्द होता. म्हणून २०१६ मध्ये परिक्षणाची वाट वगैरे न बघता आवर्जून विकत आणला. ह्या ना त्या कारणाने अंक वाचायचं राहून गेलं पण आज तो वाचून पूर्ण झाला. त्याविषयी थोडं......

खरं सांगायचं तर सुरुवात थोडी निराशाजनकच वाटली. रतन टाटा ह्यांचा 'स्टार्टअप इंडिया' वरचा लेख काही खास वाटला नाही. त्यांना टाटासमुहाची धुरा खांद्यावर घेताना जुन्याजाणत्या, मुरलेल्या लोकांशी संघर्ष करावा लागला हे एक आणि आजकालच्या स्टार्टअप्सबद्दलचे त्यांचे विचार ह्या दोन गोष्टींवरच हा पूर्ण लेख आहे. तसं बघायला गेलं तर ह्या दोन्ही गोष्टींबद्दल इतरत्र लिहून आलंय. त्यामुळे की काय कोण जाणे पण लेख बराचसा एकसुरी आणि कंटाळवाणा झालाय. तीच गोष्ट प्रियांका चोप्रा हिच्या लेखाची. ती तरुणपणी अमेरिकेत असताना ब्राउनी, करी वगैरे शेलक्या विशेषणांनी मुलांनी टोमणे मारणं तिने अनुभवलं त्यावर अनेकदा वाचलंय. मध्ये कधी तरी लोकप्रभाची एक जाहिरात वाचली तर त्यातसुद्धा तिच्या लेखाचा असाच काहीसा विषय दिसत होता. उरलेली जागा 'मी यंव, आणि मी त्यंव' हेच. एखाद्याला आपल्या कामगिरीचा अभिमान असणं वेगळं, नव्हे तो असायलाच हवा, पण म्हणून त्याने किंवा तिने स्वत:च त्याचं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली की वैताग येतो. त्यामानाने फेसबुकच्या मार्क झकरबर्गची पत्नी प्रिसिला चान हिच्यावरचा अपर्णा वेलणकर ह्यांनी अनुवादित केलेला लेख खूप आवडला. आपल्याला आवडलेले बूट सहाशे डॉलर्सचे आहेत हे कळल्यावर प्रिसिला ते घ्यायचे की नाही हा विचार करते. मार्कची बहिण तिला म्हणते घे की, तुझ्याकडे पैसे आहेत एव्हढे ह्यावर प्रिसिला म्हणते की आहेत ना, पण ते माझे नाहीत. ह्या वाक्यावर आपलं जोरदार अनुमोदन बॉस!

हिंदी सिनेमातली गाणी, दोस्तांनी आवर्जून पाठवलेल्या लिंक्स वगैरे सोडलं तर माझा आणि संगीताचा फारसा संबंध नाही. त्यामुळे गिरिजादेवींबद्दल ऐकलं नव्हत. तरी त्यांच्यावर लिहिलेला 'जिया तडप तडप जाये' हा लेख आवडला. रस्किन बॉंडची बरीच पुस्तकं आहेत माझ्याकडे पण निवांतपणे वाचू म्हणून ठेवली आहेत. त्यामुळे त्याची म्हणावी तशी ओळख नाहीये. पण शर्मिला फडके ह्यांचा लेख वाचून ती पुस्तकं वाचायाची तीव्र इच्छा होतेय. तसंच देहरादूनला गेलो होतो तेव्हा मसूरीला जायची संधी गमावली ह्याचं खूप दु:ख होतंय. पण खूप उशीर व्हायच्या आधी त्याची पुस्तकं सोबत घेऊन मसुरी गाठून ती तिथेच बसून वाचायची हे एक टूडू लिस्ट मध्ये नव्याने जमा केलंय. देखते है जिंदगी ये मुराद पूरी होने देती है या नही. :-)

थिएटरमध्ये सिनेमा लागायच्या आधी राष्ट्रगीत लागतं त्यात झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्यासारख्या ओळखीच्या चेहेर्यासोबत काही अनोळखी कलाकारही दिसतात. पण त्यांची नावं गुगलून बघायचा उत्साह कधीच नव्हता. मातीचं मडकं वाजवणारे (ह्याला घटम म्हणतात हे तेव्हढं कसं कोणास ठाऊक पण मला माहीत होतं) एक आजोबा अचानक दिवाळी अंकाच्या पानावर दिसले आणि मी 'अरेच्चा' म्हटलंच. त्यांचं नाव 'विक्कू विनायकराम' आहे ह्याबरोबरच आणखीही खूप माहिती मिळाली. गंमत म्हणजे हे घटम मदुराईतल्या मनमदुराई ह्या गावातलं एक कुटुंब आणि त्यातही त्यातली एक वृद्ध स्त्री बनवते हे वाचून तर मी अवाक झाले. तिथली माती म्हणे खास आहे. सुपर!

पाकिस्तान आणि चीन ह्या आपल्या शेजारच्या देशांतल्या लोकांचं भारताबद्दल काय मत आहे ह्यावर दोन सुरेख लेख ह्या अंकात आहेत. 'फिक्सर्स' हा भारतात ह्या ना त्या कारणाने येणाऱ्या परदेशी लोकांना मदत करणाऱ्या माणसांवरचा लेखही खास. युरोपात येणाऱ्या विस्थापितांच्या लोंढ्यावर आधारित 'रानोमाळ' हा लेखसुद्धा माहितीपूर्ण वाटला......ह्यावर अनेकदा आणि अनेक ठिकाणी वाचलेलं असूनसुध्दा.

ह्या अंकातला सर्वात आवडलेला भाग कुठला असेल तर लोकमतच्या ७ जणांच्या टीमने (ह्यात एक बाईसुध्दा होती बरं का!) कन्याकुमारी ते काश्मीर हा नेशनल हायवे ४४ उर्फ काला मख्खन वरून केलेला प्रवास. काय काय पाहिलं त्यांनी (आणि त्यांच्यासोबत वाचकांनी) ह्या प्रवासात. टोकाची गरिबी पण त्यातही न हरवलेली जिद्द. घरदार सोडून देशाच्या ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत माल वाहून नेणारे ट्रकवाले. मायेची, प्रेमाची माणसं सोडून कधी शिकायला तर कधी नोकरीधंद्यासाठी दूर कुठेतरी एकटी राहणारी तरुण मंडळी. त्यांचं जीवनविषयक बावनकशी तत्वज्ञान. कुठे जमिनी विकून आलेली अफाट श्रीमंती तर कुठे सुक्या भातावर नुसतं मीठ शिंपडून खावं लागण्याइतकी वाईट गरिबी. कोलारच्या रिकाम्या झालेल्या खाणी आणि अजूनही डोक्यावरून मैला वाहून न्यावा लागणारी माणसं (हो आहेत ती अजूनही आपल्या देशात). बाहेरून येणाऱ्या लोकांनी फुगलेलं, आपली ओळख विसरून गेलेलं बेंगलुरूसारखं शहर. बेलामच्या जिवंत गुहा. कुन्तालाचा धबधबा. नागपूरचा झिरो माईल स्टोन आणि शहीद गोवारी स्मारक. शाहाबाद मारकांडयाची महिला हॉकी एकेडमी. पैश्याची मदत मिळावी म्हणून गावातली मेलेली माणसं हायवेवर गेली असं सांगणारं पेडाकुटटा गांव. हैदराबादची श्रीमंती आणि तेलंगणातलं गरीब जीवन. सिवनीच्या उड्डाणपूलामुळे विस्थापित होण्याच्या छायेत जगत असलेली गावं. 'प्रत्येक बाईने दहा अपत्यांना जन्म द्यावा आणि त्यांची काळजी परमेश्वरावर सोडावी' असलं बेजबाबदार वक्तव्य करणारया शंकराचार्यांचं गाव दिघोरी. हायवेवर सोडून दिलेल्या गाई आणि बुंदेलखंडातल्या दलित अत्याचाराच्या कहाण्या. चंबळची घाटी, आग्र्याची बजबजपूरी, मथुरेतल्या लहानग्या पंडयांचं वास्तव, उडता पंजाब. आणि हायवेच्या शेवटी काश्मीर नावाचं वादळ.

वाचून डोकं गरगरायला लागतं. कुठेकुठे आणि कायकाय फाटलंय? कोण कसं पुरं पडणार ह्याला? असे खूप प्रश्न पडतात आपल्याला. आपल्या खोलीतल्या पलंगावर निवांत पडून हे सगळं वाचताना. पण ही माणसं असा विचार करत नाहीत. कदाचित त्यांना असा विचार करायला वेळही नसावा. ते आपल्या परीने उत्तर शोधताहेत. सरकार, संस्था, देव कोणी मदतीला येईल ह्याची भाबडी आशा न बाळगता. हे खूप आशादायक आहे.

'मित्रो' म्हणून फुकटची डायलॉगबाजी करत, डोळ्यांतून हुकमी पाणी काढत लोकांना भ्रमित करणाऱ्या आपल्या माननीय वगैरे पंतप्रधानांनी एकदा हे सगळं वाचावं. म्हणजे जनात नाही तरी मनात खजील झाले तरी पुरे.

'एन एच ४४' साठी लोकमतच्या टीमला माझ्याकडून भलंमोठं 'हे शाब्बास!' :-)

No comments: