विकेंडला सकाळी वॉकला जायला जमलं नाही म्हणून संध्याकाळी गेले. समोरून एक सिनियर सिटीझन जोडपं चाललं होतं. नवऱ्याच्या हातात चणे किंवा शेंगदाणे असं काहीतरी असलेली पुडी होती. त्याने उरलेले दाणे आपल्या हातात ओतून घेतले आणि पुडी सरळ बाजूला फेकून दिली. असला संताप आला. शिकली-सवरलेली माणसं, बरं एव्हढं वय झालंय आणि एव्हढीही अक्कल नाही? पुढे अक्षरश: चार पावलांवर कचऱ्याची कुंडी होती. पण तेव्हढा वेळ ती पुडी सांभाळण त्या काकांना जड गेलं. एकदा वाटलं होतं की मुन्नाभाई स्टाईल ती पुडी उचलावी, त्यांच्याकडे जाऊन म्हणावं की काका, ही अशी कचऱ्याच्या कुंडीत टाकायची ही पुडी. मग विचार केला की कशाला वाद घाला. पण तेही पटत नव्हतं कारण हा कचखाऊपणा झाला. नुसती चिडचिड झाली. पुढे २ मिनिटात कचरा साफ करणारे कर्मचारी दिसले. निदान ती पुडी उचलली जाईल ह्याचं समाधान वाटलं पण माझं चुकलं हेही प्रकर्षाने जाणवलं. माझ्या बोलण्याने ते काका काही सुधारले असते अश्यातला भाग नाही पण निदान खजील तरी नक्कीच झाले असते. कदाचित पुढल्या वेळी त्यांनी ती पुडी कचराकुंडीत टाकली असती. पुढल्या वेळी असं करताना कोणी दिसलं तर त्यांना काही बोलले नाही तरी मी स्वत: उचलून ती पुडी कचऱ्याच्या कुंडीत टाकणार हे नक्की.
हे एखादं उदाहरण नाहिये. पेपरात वाचलं की कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन रंगवलेल्या उपनगरी गाड्यांच्या स्टेशनांना प्रवाशांनी गुटक्याची पाकिटं फेकून आणि पानाच्या पिचकाऱ्या मारून पुन्हा अवकळा आणली. निर्माल्य असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकून लोक किनारे घाण करताहेत आणि जलचर जीवांना धोका निर्माण झालाय. हे असं करू नये हे शिकवायला लागतं? काय काय आणि किती किती शिकवायचं लोकांना? आपण स्वच्छता कधी शिकणार :-(

No comments:
Post a Comment