Wednesday, September 7, 2016

एका जवळच्या मैत्रिणीच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. बाप्पाचं रीतसर दर्शन घेऊन झाल्यावर गप्पा मारायला बसलो. बोलण्याच्या ओघात तिच्या घरातल्या एका व्यक्तीने त्यांना भेट मिळालेली साईबाबांची फोटोफ्रेम कौतुकाने दाखवली. 'तुमचा विश्वास आहे का साईबाबांवर?' आपण 'काहीतरी' प्रश्न विचारतोय हे लक्षात आलं होतं पण इलाज नव्हता. त्यांच्या बोलण्यावर दुसरं काय बोलायचं हे तेव्हा तरी सुचलं नव्हतं. झालं! त्यांनी आपला विश्वास कसा बसला, आपण 'अचानक' शिर्डीला कसे गेलो, वाटेत आलेली संकटं बाबांनी कशी निवारली, मग दर्शन कसं विनासायास झालं, पुढे बाबांनी आयुष्यात कशी मदत केली आणि अजूनही करताहेत वगैरे सगळं यथासांग ऐकवलं. मैत्रीण खूप जवळची, दरवर्षी गणपतीला गेले की तिच्या घरच्यांशी खूप मस्त गप्पा होतात. ह्या वेळी हे अनपेक्षित होतं. 'असतो एखाद्याचा विश्वास' असं म्हणून मी ऐकलंही सगळं. पण मनात खूप प्रश्न आले.

अस्मादिकांची स्थिती अगदी 'भगवान, आज पहली बार तुमसे कुछ मांग रही हू, इन्कार मत करना' असं म्हणणाऱ्या हिंदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखी नसली तरी नेहमी देवळात गेल्यावर काहीतरी मागायचंच अशीही गत नाही. पण आजवर कधीतरी चुकून काही मागितलेलं सुध्दा कधी मिळालेलं नाही. आमच्या बाबतीत भगवानके घर 'देर' नाही तर लाईट गेल्यावर होतो त्यापेक्षाही घनघोर 'अंधेरा' आहे ह्याची अनुभवाने खात्री पटलेली आहे. :-) त्याचा मान राखायला आता काही मागायचं सोडलंय. उगाच त्याला कशाला कानकोंडलं करा, नाही का? पण जे हा देव देऊ शकत नाही किंवा देत नाही ते त्याचे हे भक्त असलेले संत-महात्मे देतात का? मग श्रेष्ठ कोण? तो देव का हे संत?

बरं 'दे रे हरी खाटल्यावरी' अशी आमची मागणी कुठे आहे? चांगले कष्ट करून मग त्याचं फळ मिळायची अपेक्षा करावी तर तेही नाही. मग एक गोंडस स्पष्टीकरण आहेच - तो तुम्हाला हवं ते नाही तर तुमच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते देतो. अरे वा! मग हे बाबा, साधू, संत वगैरे 'जो जे वांछील तो ते लाहो' म्हणून मागितलेलं सगळं देतात ते का? त्यांना देव अडवत नाही का? का देवाचंही त्यांच्यापुढे काही चालत नाही?

आणि हे असंच असेल तर देवाकडे कशाला काय मागायचं? देऊ देत त्याला काय द्यायचं ते. आणि तोच सगळं ठरवणार असेल तर मग आनंद म्हणतो ते बरोबर आहे की - बाबूमोशाय, हम सब रंगमंचकी कठपुतलीया है जिसकी डोर उपरवालेके हाथोमें है.

किंवा 'धुंद' मधल्या गाण्याचं ते कडवं:

हम लोग खिलौने है एक ऐसे खिलाडीके
जिसको अभी सदियोंतक ये खेल रचाना है

एकदा हे मान्य केलं की आपणही सुटलो आणि 'तो' ही. देणं नाही आणि घेणं नाही. मज्जानु लाईफ!

No comments: