Sunday, September 18, 2016

मेक्सिकोपर्व - मीना प्रभु

लायब्ररी पुन्हा जॉईन केली आणि नेहमीच्या सवयीने इंग्लिश पुस्तक घेऊन आले. ते वाचून परत करताना आठवलं की आपण ह्या वर्षाचे उरलेले महिने मराठी पुस्तकं वाचायची असं ठरवलं होतं. मागे एकदा व्हॉटसेपवर एका मित्राने वाचलीच पाहिजेत अश्या मराठी पुस्तकांची एक यादी पाठवली होती. त्यातल्या आवडतील अश्या पुस्तकांच्या नावाची माझी अशी वेगळी यादी बनवून ठेवली होती पण मध्ये लायब्ररी बंद केल्याने ती तिथे देता आली नव्हती. ती बरोबर घेऊनच लायब्ररीत गेले. चेकआऊटसाठी बसलेल्या मुलाच्या हातात देऊन 'ह्यातली किती पुस्तकं लायब्ररीत आहेत ते चेक करून ठेव' असं सांगितलं. आज यादीत नसलेलं एखादं घ्यायला लागणार होतं म्हणून आधीच 'मीना प्रभु' ह्यांचं पुस्तक घ्यायचं ठरवून आले होते. त्यांची गाथा इराणी, वाट तिबेटची, इजिप्तायन, रोमराज्य आणि तुर्कनामा ही पुस्तकं आधीच वाचली आहेत. मग 'मेक्सिकोपर्व' घेऊन आले.

'रोमराज्य' वाचून ठरवलं होतं की इटलीची सफर कुठल्याही Touring company सोबत करायची नाही तर हे पुस्तक बरोबर घेऊन त्याप्रमाणे फिरायचं. 'मेक्सिकोपर्व' वाचताना त्याची आठवण झाली. एझटेक आणि मायन संस्कृतीच्या खुणा मिरवणाऱ्या मेक्सिकोतल्या सर्व जागा आणि तिथे जाऊन नेमकं काय बघायचं ह्याची माहिती तर आपल्याला मिळतेच वर मेक्सिकन इतिहासाबद्दलसुध्दा बरंच काही वाचायला मिळतं. खरं सांगायचं तर पर्यटन म्हणजे नुसती ठिकाणं पाहून तिथे 'पटेल पोईंट' छाप फोटो काढणं नव्हे तर त्यामागचा इतिहास, भूगोल, आणि बऱ्याचदा राजकारण - मग ते स्थानिक आणि असो वा इंटरनेशनल - हे अगत्याने समजावून घेउन जे पाहतोय त्याच्याशी त्याची सांगड घालणं आहे ही नवी दृष्टी मला 'मीना प्रभु' च्या पुस्तकांतून मिळाली. तेच हे पुस्तक वाचतानाही जाणवलं. आपण कुठे एखाद्या ठिकाणी परतपरत जातो? एकदाच जातो तेव्हा काय ते व्यवस्थित पाहून घ्यावं हेच ठीक. नुसती प्रेक्षणीय स्थळं नव्हे तर चित्रकला, शिल्पकला, मेक्सिकोतले महत्त्वाचे कलाकार ह्यांच्याबद्दलही त्या भरभरून लिहितात. तिथल्या सामान्य माणसांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल लिहितात. माझी त्यांच्या पुस्तकांबद्दलची एकच तक्रार म्हणजे 'जेवण' म्हणजे 'उदरभरण' असल्यासारखं त्याचा उल्लेख त्या एक तर ओझरता करतात नाहीतर चक्क टाळतात. माझ्यातल्या फुडीला हे फार खटकतं. तसंच स्थानिक म्युझिकबद्दलही त्या फारसं लिहीत नाहीत. भाषेचा अडथळा कबुल आहे पण चांगलं संगीत त्या अडचणीवर सुध्दा मात करतं, नाही का?

तेव्हा तुम्हाला मेक्सिकोबद्दल कुतूहल असेल, कधीकाळी भेट द्यायची इच्छा असेल तर हे पुस्तक अगदी नक्की वाचा.

ता. क. हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्पला भेट द्यायला हरकत नाही :-)

No comments: