Monday, February 1, 2016

दोन स्पेशल

'इश्क होता नही सभीके लिये' - मला वाटतं काही वर्षांपूर्वी आलेल्या 'जॉगर्स पार्क' मध्ये एका गाण्यांत हे शब्द होते. पूर्ण नाटकभर मला ते आठवत राहिले. गोष्ट म्हटली तर स्वप्ना आणि मिलिंद ह्यांच्या दशकभरापूर्वीच्या अधुरया कहाणीची. म्हटली तर बदलत्या जगाची आणि त्यासोबत बदलत गेलेल्या पत्रकारितेतल्या मूल्यांची. एका वर्तमानपत्रात उपसंपादक असलेला मिलिंद रात्रपाळीला ऑफिसात असतो. शहरात नुकतं बांधकाम सुरु झालेल्या सांस्कृतिक केंद्राची भिंत पडून त्यात एका तान्ह्या बाळासह काही मजूर ठार होतात आणि ही बातमी फ्रंट पेजवर पुराव्यासकट छापायची अगदी जय्यत तयारी त्याने केलेली असते. पण म्हणतात ना Man proposes and God disposes. रात्रपाळीला कोण आहे ह्याची चौकशी करत एक बाई ऑफिसात घुसते आणि ती दुसरीतिसरी कोणी नसून जी आपल्याला दहा वर्षांपूर्वी सोडून गेली होती ती आपली प्रेयसी स्वप्ना आहे हे मिलिंदला कळतं तेव्हा तो हडबडतो. पण त्याहून मोठा धक्का त्याला तेव्हा बसतो जेव्हा त्याला कळतं की ती भिंत पडली त्या बिल्डिंगचं बांधकाम करणारया बिल्डरच्या कंपनीत स्वप्ना पब्लिक रिलेशनचं काम करतेय आणि त्या बातमीत कंपनीचं नाव छापून येऊ नये म्हणून प्रयत्न करायला ती आलेय. मग नाटक विणलं जातं ते दोन प्रकारच्या तणावाच्या धाग्यांनी - एक त्यांच्यातल्या तुटलेल्या नात्यातला आणि दुसरा त्यांच्या मूल्यातल्या संघर्षाचा.

खरं तर जे लोक एकमेकांपासून काही कारणाने वेगळे झालेत त्यांनी आयुष्यात पुन्हा भेटूच नये ह्या मताची मी. किती नाही म्हटलं तरी भूतकाळ डोकावणारच. एव्हढंसं आपलं आयुष्य, त्यात जे घडूनही अनेक वर्षं झाली आहेत, जे बदलता येत नाही त्याविषयी चर्चा करण्यात, वाद घालण्यात आणि एकमेकांना ओरबाडण्यात वेळ का घालवावा माणसाने? पण आपल्या तंत्राने चालेल ते आयुष्य कुठलं? स्वप्ना आणि मिलिंदचं नेमकं हेच होतं - जे पूर्वी झालंय त्याबद्दल न बोलण्याचा ते आधी कसोशीने खूप प्रयत्न करतात. आता वर्तमानकाळात जो मुद्दा आहे त्याबद्दलची आपापली बाजू एकमेकांना पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करतात. पण एक क्षण असा येतो की पूर्वी जे झालं त्याबद्दलचा कडवटपणा मिलिंद दूर ठेवू शकत नाही. मग वर्तमान बाजूलाच राहतो आणि सगळे बांध फुटल्यासारखे दोघं भूतकाळाबद्दल बोलत रहातात - कधी एकमेकांना समजून घेत तर कधी एकमेकांना ओरबाडत. नाटकात हा संघर्ष खूप सुरेख पद्धतीने दाखवलाय. इतका की शेवटी मिलिंद काय करणार ह्याबद्दल आपल्याला अपार उत्सुकता वाटते.

आणि नेमकं इथेच सगळं भरकटतं. नाटकाचा शेवट एक पळवाट वाटते. एक convenient पळवाट. अर्थात लेखकाने मिलिंद बातमीत बिल्डरचं नाव छापतो असं दाखवलं असतं तर काही प्रेक्षकांना तो आजच्या युगात न खपणारा आदर्शवाद वाटला असता. तो नाव छापत नाही असं दाखवलं असतं तर काहींना त्याच्यातल्या पत्रकाराचा पराजय आवडला नसता. पण दोन्हीपैकी एक करून लेखकाने एक भूमिका तरी घेतली असती. इथे ते होत नाही. त्यामुळे निदान मला तरी नाटकाच्या शेवटी फसवल्यासारखं वाटलं. बरं आज बातमी छापली नाही म्हणून उद्या त्यावर अधिक काही लिहून येणार नाही असं थोडंच असतं? त्यातून ही घटना घडते ८९ मध्ये. तेव्हा देशांतर्गत किंवा शहरातल्या बातम्या पेपरात जास्त असणार. मग ह्या बातमीचं आयुष्य एक दिवसाचंच कसं? पण ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून कुठेतरी असमाधानी वाटतं.

असो. जितेंद्र जोशी आणि गिरिजा ओक-गोडबोले दोघांनी खूप छान काम केलंय. जितेंद्र जोशीला तर आजवर मी विनोदी भूमिकेतच पाहिलं होतं. गंभीर भूमिकेत पहाण्याचा पहिलाच प्रसंग. भोसलेचं काम करणारा कलाकार सुध्दा सुरेख काम करून गेलाय. मराठी नाटकांत नेपथ्य नेहमीच छान असतं तसं इथेही आहे - अगदी आजकाल नामशेष झालेल्या केसेट प्लेयरपासून ते गार पाण्याच्या माठापर्यंत. पण त्याहीपेक्षा मला आवडला तो नाटकाचा साउंड इफेक्ट - मग तो रात्री ओरडणारया टिटवी किंवा कुत्र्याचा आवाज असो नाहीतर मिलिंदच्या सांगण्यावरून बंद आणि चालू झालेल्या प्रेसचा. खरोखर स्पेशल :-)

No comments: