Saturday, March 17, 2012

जानेवारीत एका मित्राकडे गेले असताना 'तुझं गाण्यांचं कलेक्शन दाखव पाहू' म्हटल्यावर त्याने हिंदी गाणी आहेत बरीच असं म्हटलं. 'ती नकोत. माझी मी बरीच डाउनलोड केली आहेत. मराठी आहेत का काही' असं विचारलं. खरं तर तोवर निघायची वेळ झाली होती. तरी त्याने आणून दिलेल्या सीडीजच्या ढिगातून गडबडीने ३-४ सीडीज उपसून काढल्या. काही भजनं, आरत्या, काही भावगीतं असं कायकाय हाती लागलं. संदीप खरे- सलिल कुलकर्णी द्वयीची गाणी दिसली त्यामुळे तीसुध्दा Laptop मध्ये भरून घेतली. ओळखीची भावगीतं मनमुराद ऐकून झाल्यावर संदीप - सलिलची आठवण झाली. त्यांचा 'आयुष्यावर बोलू काही' दोनदा पाहिलाय. त्यामुळे उत्सुकतेने ऐकायला लागले. पण का कोणास ठाऊक पहिल्या ८-१० गाण्यातली फक्त दोन - अजून थोडे सोस मना रे आणि चल जीवा रात झाली - सोडली तर बाकी काहीच आवडलं नाही आणि मग पुढे ऐकायचा उत्साहच मावळला. :-( काही दिवसांपूर्वीच मित्राचा फोन आला तेव्हा 'ऐकलीस का गं गाणी?" असं त्याने विचारलं तेव्हा 'संदीप - सलिलची' गाणी आवडली नाहीत रे असं सांगायचं धैर्य मात्र झालं नाही.

No comments: