Saturday, March 17, 2012

'पर्व'चे दोन्ही भाग वाचून संपले. खरं सांगू? तापातून उठल्यावर कसं वाटतं ना तसं वाटलं काही वेळ. तुमचा काही गैरसमज व्हायच्या आधीच सांगते की हे मी वाईट अर्थाने नाही म्हणत. पण ताप उतरल्यावर कसं एकदम काही सुचेनासं होतं, काही करू नये, नुसतं बसून रहावंसं वाटतं ना तसं झालं. महाभारताची ही कथा लहानपणापासून वाचलेली. पुढे बी आर चोप्रांच्या कृपेने ते टीव्हीवरही पहायला मिळालं. तरी त्यातलं नाटय खर्या अर्थाने कधी जाणवलंच नव्हतं असं आता वाटायला लागलंय. महाभारताच्या ह्या रूपडयात 'सत्याची' म्हणून ओळखल्या जाणार्या पांडवांच्या बाजूच्या व्यक्तीरेखात अगदी रामायणाइतका नसला तरी आदर्शवाद होता. पण 'पर्व' मधले पांडव भलेही देवलोकातल्या रहिवाश्यांपासून नियोगाने जन्मलेले असतील, तरी पण आहेत माणसंच. त्यांचे पाय मातीचेच आहेत. खरं तर ह्यामुळे ते अधिक जवळचे वाटायला हवेत नाही का? पण निदान माझ्या बाबतीत तरी तसं झालं नाही. ह्या 'अश्या' लोकांसाठी कृष्णाने सारथ्य केलं? एव्हढा नरसंहार होऊ दिला? असंच वाटत राहिलं. काय मजा असते बघा, रामायणातला शुध्द आदर्शवादही पचत नाही आणि ह्या महाकाव्यातली माणसं माणसासारखी असलेलीही चालत नाहीत. हवंय काय मग?

पण मला सुन्न केलं ते ह्या गोष्टीने नाही. कौरव-पांडव खरंच होते का किंवा असतीलच तर कसे होते ह्याबद्दल कोणीच निश्चितपणे काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखा अशा असू देत नाही तर तश्या - त्याने एका मर्यादेपलीकडे जाउन फारसा फरक पडत नाही. मला कसंतरी झालं ते ह्यातल्या व्यक्तिरेखांचं दू:ख अंगावर आल्यासारखं झालं म्हणून. त्यातही वचनात अडकून ना धड संन्यासाश्रम ना धड गृहस्थाश्रम अश्या तिढ्यात अडकलेले भीष्म, सुडाचं ओझं जन्मभर वागवणारे द्रोण, मुलाच्या प्रेमात खरोखर आंधळा झालेला धृतराष्ट्र ही पुरुषपात्रं नव्याने समजली खरी. पण खरा पीळ पाडला तो बायकांच्या दू;खांनी - मग ती गांधारी असो, कुंती असो, माद्री असो नाहीतर द्रौपदी असो. किंवा नरकासुराच्या तावडीतून सुटका करून आणलेल्या कृष्णाने आपल्या म्हटलेल्या सोळा हजार शंभर बायका. किंवा क्षत्रिय राजांच्या पदरी असलेल्या दासी. किंवा कुरुक्षेत्रावर मरण पावलेल्या सैनिकांच्या विधवा. आता हेच बघा ना, पतीला काही दिसत नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली पतिव्रता म्हणूनच आपण सारे गांधारीला ओळखतो. पण तिच्या ह्या जाणूनबुजून पत्करलेल्या आंधळेपणामागे आणखीही कारण असू शकतं ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. कृष्णाने विवाह केलेल्या सोळा हजार शंभर बायकांचा उदरनिर्वाह कसा झाला असेल असंही कधी मनात आलं नाही. ह्या व्यक्तिरेखा खरोखरच अस्तित्त्वात होत्या की नाही हा प्रश्न ह्या स्त्री व्यक्तीरेखाच्या बाबतीतही गौण ठरतो. पण ज्या कारणांनी हे दू:ख त्यांना मिळालं त्या रीतीभाती - उदा. जो वाजवी किमत मोजेल अश्या कोणाशीही मुलीचं लग्न करून देणं, नियोग किंवा कानीन पध्दत, एकाच नवर्याच्या अनेक बायका असणं, एकाच स्त्रीचं अनेक भावांशी लग्न लावणं, युध्दात सैनिकांच्या मनोरंजनासाठी दासी नेणं - तेव्हाच्या काळात असतील आणि त्यामुळे आयुष्य बरबाद झालेल्या खर्याखुर्या बायका असतील ह्या विचाराने मला सुन्न केलं.

त्यांचं दू:ख एका बाजूला आणि कुरुक्षेत्रावरचं युद्ध एका बाजूला. काय अधिक भयानक हे इतक्या शतकांनंतर कोणी ठरवायचं आणि कसं? चोप्रांच्या महाभारतात ट्रिक फोटोग्राफीने दाखवलेले एका बाणातून निघालेले अनेक बाण, पुठ्ठ्याच्या गदा, डूगडूगणारे मुकुट आणि रथ सावरत लढणारे राजे आणि मागच्या बाजूला चाललेली एक्स्ट्रा लोकांची म्हणजे सैनिकांची लढाई पाहिली होती. त्यांना दोष देत नाही मी. तेव्हाच्या काळात तेव्हढच दाखवणं शक्य असेल कदाचित. पण त्यामुळे आधुनिक काळातली संहारक अस्त्रं नसतानाही पुरातन काळी युध्द किती भयानक असू शकलं असतं ह्याचा कधी अंदाजच आला नाही. किंवा असंही असेल की शब्दांची ताकद दृकश्राव्य माध्यमांपेक्षा जास्त असेल. काहीही असो. एक गोष्ट मात्र नक्की की ह्यापुढे 'कुरुक्षेत्र' म्हटलं की हातात धनुष्य घेतलेला गलितगात्र अर्जुन आणि युध्दभूमीवर बसून त्याला गीता सांगणारा कृष्ण असलं 'रोंमेन्टीसाईज्ड' दृश्य न् दिसता प्रेतांनी भरून गेल्यामुळे रोज बदलावी लागणारी युध्दाची जागा, कोल्ही-कुत्री-गिधाडं, रक्ताने माखलेली शस्त्रं, दाहसंस्काराचं भाग्यही न लाभलेले राजे आणि सैनिक हेच आठवतील. हे चांगलं का वाईट देव जाणे.

कादंबरीची शेवटची पानं वाचताना डोकं भणभणत होतं. विचारांची गर्दी उसळली होती. काही वेळ खिडकीत वारा घेत बसावंसं वाटत होतं. बरोबर आहे, रोजच्या जीवनाशी निगडीत नसलेल्या कुठल्याही गोष्टीवर एव्हढा खोलातून विचार करायची सवय कुठे असते आपल्याला? त्यातून मी फारसं गंभीर काही वाचतसुध्दा नाही. तरी नेटाने वाचत राहिले. आणि एकदम एका पानावर गांधारीने विदुराच्या घरी रहात असलेल्या कृष्णाला निरोप पाठवला. रणरणत्या उन्हात थंड सुगंधी वार्याची झुळूक यावी असं वाटलं मला. कृष्णाची तिलाच काय पण मलाही नितांत गरज होती त्या वेळी. मला एकदम जाणवलं की ह्या कादंबरीत कृष्णाचं अस्तित्व आहे पण मध्येमध्ये. त्याच्या तोंडी संवादही फारसे नाहीत. त्याने सगळी कादंबरी भारून टाकलेली नाही. कदाचित दुसर्या व्यक्तिरेखा झाकोळून जाऊ नयेत म्हणूनही लेखकाने तसं केलं असेल.

आणि मग मला वाटलं की कदाचित महाभारतातलं कृष्णाचं असणं हे नुसतं भगवदगीतेसाठी नव्हतंच कदाचित. युध्द होऊ नये ह्यासाठीच्या शिष्टाईसाठीही नव्हतं. ते होतं 'कुरुक्षेत्र' होऊन गेल्यानंतरच्या काळासाठी - त्यातून वाचलेल्यांना आधार आणि मार्गदर्शन देण्यासाठी. बरसणारा पाउस होऊन सगळं अमंगल धुवून टाकण्यासाठी. आजच्या भाषेत सांगायचं तर chaos मधून order आणण्यासाठी.

मी एव्हढंच म्हणेन की तुम्ही महाभारताची कथा अनेक वेळा अनेक रूपात वाचली असेल तरीही नाण्याची दुसरी बाजू पहाण्यासाठी, अनेक शतकांपूर्वी होऊन 'कदाचित' घडून गेलेल्या ह्या युध्दाविषयी विचार करण्यासाठी आणि अस्वस्थ होण्यासाठी 'पर्व' वाचाच.

No comments: