Monday, October 17, 2011

ह्या फ़ुलांच्या गंधकोषी.....

आज सकाळचीच गोष्ट. देवाच्या पूजेची फ़ुलं संपत आली आहेत म्हणून ऒफ़िसला जाता जाता नेहमीच्या फ़ुलवालीकडे गेले. झेंडूची, जास्वंदीची, शेवंतीची फ़ुलं, दुर्वा, तुळस, बेल, निशिगंध - काय काय घेऊन बसली होती ती. मग ’बेल कमी घाला, झेंडूची छोटी फ़ुलं घाला, दुर्वा जास्त घाला’ वगैरे नेहमीच्या सूचना झाल्यावर फ़ुलं घेऊन मी बाहेर पडले.

ही फ़ुलं उगवतात कोणाच्या बागेत, मुंबईत कशी येतात, ह्या फ़ुलवालीकडे कोण आणतं असे प्रश्न कधी पडले नाहीत किंवा पडले तरी तिथून निघाल्यावर डोक्यात उरले नाहीत. आज लोकप्रभात एक लेख वाचला तेव्हा फ़ुलांच्या खरेदी-विक्रीचं एक कधी न बघितलेलं विश्वच डॊळ्यांसमोर उभं राहिलं. २० रुपयांची फ़ुलं माझ्या फ़ुलांच्या पिशवीत येण्यात आणि मग पुढले ७-८ दिवस देवघरातल्या देवांवर सजण्यात किती अदृष्य हात लागत असतील ह्याची तेव्हा कल्पना आली.

गेल्या काही महिन्यांपासून रोज रात्री झोपताना देवाकडे एक प्रार्थना करतेय - माझ्या पोटात अन्न जाण्यात ज्यांचा ज्यांचा हात आहे त्यांना सगळ्यांना सुखी ठेव अशी. आता रोजची पूजा करताना ह्या लोकांसाठीसुध्दा प्रार्थना करेन. फ़ुलांचा धंदा ही त्यांची रोजीरोटी असली तरी ते ती इमानेइतबारे करताहेत म्हणून तर माझी देवपूजा नीट चाललेय ना?

No comments: