Tuesday, December 5, 2017

४. मुशाफिरी (दिवाळी अंक २०१७)

भटकंती ह्या विषयावरचा कुठलाही अंक माझा खास आवडीचा. म्हणून मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतला.

सगळ्यात आवडलेला लेख म्हणजे अर्निका परांजपेचा 'हादगा'. तसा तिचा ब्लॉग मी अधूनमधून वाचत असल्याने तिच्या लेखनशैलीचा परिचय आहेच. हत्तींचा सांभाळ केला जातो अश्या ठिकाणी काम करायला ही मुलगी गेली ह्याचं खूप कौतुक वाटलं मला. तिथले अनुभवसुध्दा तिने छान मांडलेत. ‘भूतान' ह्या देशाविषयी खास आकर्षण असल्याने 'अस्पर्श भूतान' हा लेखही आवडला. तीच गोष्ट 'इस्त्रायल' वरच्या 'मरुभूमी, इस्त्रायलची' ह्या लेखाची. भूतान आणि इस्त्रायल दोन्ही देश एकदा पाहायचेच असं पुन्हा एकदा ठरवलं.

एव्हरेस्टबद्दल बरंच वाचलंय. तिथे चढाई करायची वगैरे ह्या जन्मी तरी शक्य नाही. पण निदान बेसकेम्प पर्यंत तरी जाऊन यायला हवं असं (एक अशक्य वाटणारं!) स्वप्न आहे. थिएटरमध्ये एसी जास्त असेल तरी लगेच सर्दी होणार्या मला हे कसं जमणार हा कळीचा मुद्दा असला तरी एखादं तरी अशक्य स्वप्न असल्याशिवाय आयुष्याला मजा नाही. हो की नाही? पण ह्याच कारणाने 'एव्हरेस्टच्या पायथ्याशी' हा सायली महाराव हिचा लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. तिने एक शेरपा सोबत घेऊन एकटीने हा ट्रेक पूर्ण केला हे वाचून आश्चर्य नाही वाटलं. बायका मनात आणलं तर काहीही करू शकतात ह्यावर ठाम विश्वास आहे. खूप कौतुक जरूर वाटलं.

‘व्हिएतनामाची जादुई झलक', ‘रंग रशिया' आणि 'नैरोबी - अशी आणि तशी' ह्या लेखांनी ३ नवे देश माझ्या लिस्टमध्ये समाविष्ट केले. ‘सागर दुभंगतो तेव्हा' मध्ये साउथ कोरियातल्या sea-parting ह्या अनोख्या निसर्गचमत्काराबद्दल वाचून एकदा तिथेही जाऊन यायला हवं असं वाटतंय.  :-)

‘दुर्गम किब्बरमधले चार दिवस', कोलकात्याच्या कॉलेज स्ट्रीटवरचा 'कोलकात्याच्या इतिहासाकडे नेणारा रस्ता' हे लेख माहितीपूर्ण. तर 'आश्चर्य सह्याद्रीच्या आडवाटावरची', ‘तिलारीच्या जंगलात' आणि 'सांधण घळीच्या पोटात' वाचून आपल्या 'दगडांच्या देशा' महाराष्ट्राबद्दल नवी माहिती मिळाली. ‘व्हेली ऑफ फ्लॉवर्स' माझ्या 'Places to visit before you die’ लिस्टमध्ये असल्यामुळे 'पुष्पविश्वाचा सोहळा' हा लेख मोठया उत्सुकतेने वाचला.

‘संगम सफारी' हा नद्यांच्या संगमांची माहिती देणारा, ‘सूर्यमंदिराची अनोखी कहाणी' हा देशातल्या सूर्यमंदिरांवर आधारित, ‘चित्रकाराच्या गावा जावे' हा हिरोनिमस बॉश ह्या डच चित्रकाराच्या कलाकृतीची माहिती देणारा असे सगळे लेख अतिशय वाचनीय. ‘देवळांच्या देशा' ही महाराष्ट्रातल्या देवळांची फोटोमुशाफिरी आवडली. खादाडी हा अतिशय प्रिय विषय असल्याने 'पुणे-सोलापूर रोडवरची खादाडी' भावला.

पूर्ण अंकात फक्त ‘लेह, लदाख, आणि स्वत:शीच संवाद' वाचून थोडी चिडचिड झाली. लेखिका पुण्याची असल्याने असेल का? ;-) विनोदाचा भाग सोडला तर लेखिकेने एकुणात लेख 'बघा मी एकटीने जाऊन कसा प्रवास केला, अमुक केलं, तमुक केलं' ह्या आविर्भावात लिहिलाय असं वाटलं. पूर्ण लेखभर मला कशाची भीती वाटत नाही,  मी पाण्यात आत्मविश्वासाने वावरते, मी खमकी आहे, मी एक बाई असून हा प्रवास केला असं माझ्या मनातसुध्दा आलं नाही अशी स्वत:ची एव्हढी टिमकी वाजवली आहे की वाचायलासुध्दा कंटाळा आला शेवटी. एकंदरीत हा असला स्वभाव घेऊन ह्या बाई एकट्याच सगळीकडे जातात ते बाकीच्यांवर उपकारच आहेत म्हणायचं.

असो. पुढल्या वर्षी हा अंक नक्की घेणार.

No comments: