Thursday, May 11, 2017

आज एका मैत्रिणीने व्होट्सएप वर 'भज गोविंदम' पाठवलं. संस्कृतात लिहिलेली स्तोत्रं शब्दांची फोड करत अर्थ जुळवत वाचायला मजा आली. तेव्हढीच संस्कृतची उजळणी. कधी जमलं, कधी अजिबातच जमलं नाही. बाकी सगळ्यात तोच एक संदेश - हा भवसागर सोडा, ईश्वरभक्ती करा वगैरे. हेच करायचं होतं तर देवाने आपल्याला ह्या भवसागरात जन्माला कशाला घातलं हा माझा एकमेव प्रश्न आहे. पृथ्वीवर सगळे आश्रम ठेवायचे होते आणि त्यात जन्माला घालायचं होतं. केली असती ईशभक्ती आयुष्यभर. शिक्षण, नोकरी, लग्न, मुलंबाळं हे चक्र कशाला मग निर्माण केलं? अजून ह्याचं उत्तर मिळायचं आहे.

असो. लिहायचं कारण की एका श्लोकात 'स्त्री ही मुक्तीच्या मार्गातली धोंड' छाप संदेश वाचून मात्र तिळपापड झाला. पुरुषांना काय बायका आमंत्रण द्यायला येतात आमच्याशी लग्न करा म्हणून? लग्न करून ह्यांचं घर, मुलं, आईवडील सगळं बघायचं. आणि वर बायको 'मुक्तीच्या मार्गातली धोंड'??? अजब न्याय आहे. मग पुरुष का नाही बायकांच्या मुक्तीच्या मार्गातली धोंड? का बाईला मुक्तीचा हक्क नाही? फुकट चडफड झाली. संस्कृत वाचताना झालेला सगळा आनंद गायब झाला. तोंडात एक कडवट चव मात्र राहिली.

मग माझ्या शाळेच्या दिवसात क्लासमध्ये शिकवणाऱ्या सरांनी 'चेन मेसेज' म्हणता येईल असा मेसेज पाठवला. अर्थात त्यांनी तो चांगल्या हेतूने पाठवला होता हे माहीत आहे पण तरी मूळ मेसेज पाठवणाऱ्याचा राग आला. काय तर म्हणे सीमेवर, अतिरेक्यांशी लढणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी साठी हा मंत्र म्हणा - महामृत्युजय मंत्राच्या ओळी होत्या त्या - आणि मी सोडून (!) दहा लोकांना फोरवर्ड करा. नसेल करायचं तर मला तसं सांगा म्हणजे चेन तुटणार नाही. मी नम्रपणे सरांना लिहिलं की मी स्वत: ही प्रार्थना म्हणेन पण मी चेन मेसेजेस फोरवर्ड करत नाही. जवानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांनी घ्यायची ते सरकार गायींची अभयारण्ये, गायींना आधार नंबर असल्या कामात गुंग आहे. मग महामृत्युजय मंत्र म्हणून काय होणार? 'दुनिया वेड्यांचा बाजार' आहे की नाही मला ठाऊक नाही पण माझा देश मात्र त्याच दिशेने चाललाय असं आजकाल मला वाटू लागलंय.

No comments: