Sunday, April 6, 2014

मराठी बाणा - महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर

रविवारचा दिवस, वेळ दुपारची, आणि बाहेर एप्रिलचं रणरणतं उन्ह. फक्त देव 'वत्सा, तुजप्रत कल्याण असो' असं म्हणत 'मागशील ते देईन' ह्या हमीसकट पृथ्वीतलावर अवतीर्ण होणार असेल तरच बाहेर पडायचं हे मी १ एप्रिललाच ठरवून ठेवलेलं. :-) पण मला कधीपासून 'मराठी बाणा' बघायचं होतं. माझ्या मित्रमंडळीपैकी अनेकांनी ह्या कार्यक्रमाची तोंड फाटेपर्यंत स्तुती केलेली आहे. आजवर २ वेळा संधी येऊनही मला हा कार्यक्रम बघता आलेला नव्हता. ह्यावेळी मात्र काही झालं तरी चुकवायचा नव्हता.

पहिली गोष्ट मला जाणवली ती ही की कार्यक्रम अगदी वेळेवर सुरु झाला. आणि जेव्हा पडदा वर गेला तेव्हा माझी अवस्था थोडीशी खजिन्याच्या गुहेत शिरलेल्या अलीबाबासारखी झाली एव्हढं समोर दिसलेलं दृश्य सुरेख होतं. एका गावातल्या घरांचा backdrop आणि त्या पार्श्वभूमीवर उभी असलेली पारंपारिक रंगीबेरंगी वेशभूषेतली कलाकार मंडळी पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं. माझ्या एका मैत्रिणीने हा कार्यक्रम दूरच्या रांगेत बसून पहायचा सल्ला दिला होता. पण तो न मानण्याचा माझा निर्णय बरोबर होता. दूरच्या रांगेतून नेपथ्यातल्या अनेक बारकाईच्या गोष्टी माझ्या नजरेतून निसटल्या असत्या.

सुरुवातीच्या 'उठी उठी गोपाळा' च्या सुरांनी सगळं वातावरण अगदी मंगलमय करून टाकलं. दळणारया, तुळशीला पाणी घालणाऱ्या, सडासंमार्जन करणारया बायका, शेतावर निघालेले लोक, भजनं म्हणणारे वासुदेव असं सगळं बघून आता काळाच्या कुशीत गडप झालेलं महाराष्ट्रातलं एखादं जुनं गाव कसं असेल ह्याची कल्पना आली आणि कधीकाळी time travel शक्य झालंच तर तिथे जायला आवडेल असंही वाटून गेलं.

आणि मग मध्यंतरापर्यंतचा पुढचा दीड तास कसा गेला ते कळलंच नाही. बोलावा विठ्ठल, कोळीगीतं (एकविरा आई, मी हाये कोली, कोळ्याची पोर कशी झोकात चालली), माळ्याच्या मळ्यामंदी, लखलख चंदेरी अशी अनेक गाणी सादर झाली. 'आम्ही ठाकर ठाकर' ह्या गाण्याचं सादरीकरण करणारया कलाकारांचं टीमवर्क आणि उत्साह दोन्ही अफलातून होते. तीच गोष्ट 'विठोबाचा डोंगूर आभाळी गेला' ची. ह्याला तर वन्समोअर मिळाला. आणि तोही जराही वेळ न दवडता त्या कलाकारांनी तितक्याच ताकदीने पुन्हा सादर केला हे खरंच 'काबिल-ए-तारीफ' आहे. Hats Off To Them! सद्यस्थितीवर परखड भाष्य करणारं भारुड कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते सादरही अतिशय प्रभावी रीतीने केलं गेलं.

तमाशा हा प्रकार मला कधीच आवडला नाही. कदाचित चित्रपटांतून त्याचं झालेलं सवंग चित्रण पाहिल्यामुळे असेल. सुरुवातीचा ढोलकीचा अप्रतिम पीस सोडल्यास सादर केलेल्या लावण्या मला कार्यक्रमाशी अत्यंत विजोड वाटल्या. अर्थात 'तमाशा' हा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असल्याने त्याचा ह्या कार्यक्रमात समावेश होणं जरुरीचं आहे पण तरीही एखादीच लावणी, तीही जरा शालीन पध्दतीने, सादर केली आणि जुन्या मराठी चित्रपटातून असायचा तसा सवाल-जवाबाचा एखादा भाग समाविष्ट केला गेला तर चांगलं होईल असं वाटतं. खरं तर 'जोगवा' चित्रपट फक्त १५ मिनिटं पाहण्याचं धाडस मी जेमतेम गोळा करू शकले होते. पण तेव्हढाही चित्रपट पहाताना जशी विषण्णता आली होती तीच अंबेच्या जोगव्यात नाचणारे जोगते पाहून पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांच्या जीवनावरची आनंदी गाणी पहाताना नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या आठवल्या :-( कार्यक्रमात एखादा पोवाडाही असायला हवा असं प्रकर्षाने वाटलं.

मध्यंतरानंतर लग्न, मंगळागौर अश्या अनेक प्रसंगांवरची गाणी सादर झाली. प्रत्येक गाण्याच्या वेळेस गायक, नृत्य सादर करणारे कलाकार आणि वादक ह्यांचा उत्तम मेळ असल्याचं पदोपदी जाणवत होतं. एकदाही कुठेही बारीकशीही चूक नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या टीमचा उत्साह लाजवाब. फक्त बऱ्याच वेळा संगीत थोडं वरच्या पट्टीत असल्याने गाण्याचे शब्द कळत नव्हते. :-(

महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या ह्या कार्यक्रमात एकदा तरी तुतारी ऐकायला मिळावी ही माझी इच्छा शेवटी 'मराठी पाउल पडते पुढे' ह्या गाण्याच्या वेळी पूर्ण झाली. :-) रविवारची दुपार सत्कारणी लागली हे वेगळं सांगायला नकोच.

No comments: