Wednesday, March 26, 2014

मुसाफिर - अच्युत गोडबोले

खरं तर मी लायब्ररीत गेले होते ते Mary Higgins Clark चं पुढचं पुस्तक घ्यायला. ह्या वर्षी मराठी पुस्तकं वाचायची असं ठरवलं असलं तरी अजून त्या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली नाही. पण मला पाहिजे ते पुस्तक घेऊन झालं तरी मी थोडी पुस्तकं चाळत होते. काउन्टरवर जे काका बसतात, म्हणजे खरं तर लायब्ररी त्यांचीच आहे, त्यांनी मला अचानक हाक मारली आणि अच्युत गोडबोलेंची पुस्तकं मी वाचली आहेत का म्हणून विचारलं. काही वर्षांपूर्वी गोडबोलेंनी लोकसत्तात केलेलं स्तंभलेखन मी वाचलं होतं. पण त्याबद्दल आता फारसं काही आठवत नव्हतं. त्यांची बोर्डरूम आणि अर्थात अशी काही पुस्तकं आहेत हे वाचलं होतं. पण ह्यापलीकडे त्यांच्याबद्द्ल मला फारशी माहिती नव्हती. तसंही माझं मराठी पुस्तकांचं वाचन तसं कमीच आहे आणि त्याबद्दल मी माझ्या मित्रमंडळीकडून शिव्याही खाल्ल्या आहेत. एक महाराष्टीयन म्हणून ही काही अभिमानाने सांगायची गोष्ट नव्हे. पण ठरवूनही वाचन होत नाही हे खरंय.

त्यामुळे काकांच्या प्रश्नाला मी नाही असं उत्तर दिलं. 'चांगली आहेत त्यांची पुस्तकं' असं म्हणून त्यांनी मदतनीस मुलीला गोडबोलेंचं आत्मचरित्र काढायला सांगितलं. 'हे वाच' असं म्हणून त्यांनी ते माझ्यासमोर धरताच माझ्या पोटात गोळा आला. बाप रे! आत्मचरित्र वगैरे म्हटलं की लहानपणापासूनच मला ते पुस्तक उघडायची भीती वाटते. उगाच एखाद्याच्या खासगी आयुष्यात आपण डोकावतोय असं वाटत रहातं. परत एखादा वाईट अनुभव वाचताना 'हे असं काही होत नाही' ही फिक्शन वाचताना कामी येणारी सबब इथे उपयोगी पडत नाही. त्यात विचारमंथन वगैरे केलेलं असलं तर मला ते अजिबात झेपत नाही. मी काही पानं चाळल्यासारखं केलं. 'फार गंभीर नाही ना हे. टीव्हीवर तेच, पेपरात तेच. परत पुस्तकात तेच नको वाचायला' मी अगदी कळवळून म्हणाले. 'नाही, तसं काही नाही ह्यात' काकांनी आश्वासन दिलं. मला त्यांचं मन मोडवेना. "वडीलधारा माणूस आपण होऊन काही सांगतोय, कशाला मन मोडा' असा विचार करून मी पुस्तक उचललं. 'तुम्ही म्हणताय तर वाचून बघते' असंही म्हणाले. 'नाही आवडलं तर आण परत. बदलून देऊ. काही प्रॉब्लेम नाही' ते हसत म्हणाले.

मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि अक्षरश: काकांना धन्यवाद दिले. हा माणूस काय अफाट चीज आहे हे पानापानांतून जाणवत होतं. सोलापूरसारख्या छोट्या शहरातून थेट मुंबईत, ते पण आयआयटीसारख्या ठिकाणी, येऊन जम बसवणं काही खायचं काम नाही. इंग्रजीवर प्रभुत्त्व नसल्यामुळे झालेली चेष्टा मनाला लागल्याने त्यांनी ती भाषा आत्मसात करायचा चंग बांधला. पुढे तीच गोष्ट अकाउंटिंगबाबत झाली. माणसाने एकदा मनावर घेतलं की तो काय करू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आयआयटीत असतानाही शास्त्रीय संगीत, फिलॉसॉफी, समाजवाद, चळवळी वगैरे अनेक विषयांवर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेल्या अभ्यासाबद्दल वाचून मला माझे व्हीजेटीआयचे दिवस आठवले. नुसत्या असाईनमेंटस् पूर्ण करताना आमच्या तोंडाला फेस यायचा. ह्यांना हे सगळं कसं जमलं असेल? त्यावेळी त्यां सगळ्यांनी केलेल्या गमतीजमती वाचून हसायलाही आलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शहाद्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. तिथे आलेले अनुभव तर विलक्षण आहेत. हे असलं काही करायचा विचार माझ्याच काय पण माझ्या batch मधल्या कोणाच्याही डोक्यात आला नसेल ह्याची मला खात्री आहे. ते सुध्दा आम्ही सगळे चांगल्या खात्या-पित्या घरचे असताना. मी आयटीमध्ये काम करत असल्याने त्या क्षेत्राबाबतची ८०च्या दशकातली माहिती वाचून अवाक व्हायला झालं. भारतात आयबीएममध्ये असतानाचे दिवस, पुढे अमेरिकेत आऊटसोर्सिंगची काम मिळवताना करावे लागणारे प्रयास, प्रोजेक्ट्स वर इथून मुलं पाठवताना त्यांना manage करताना आलेले विविध अनुभव ह्या क्षेत्रातल्या कोणीही वाचावेत असेच आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक वेळा खचून जायचे प्रसंग आले तरी ह्या माणसाने जिद्द ना सोडता प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलं. त्याने खरंच मला खूप स्फूर्ती मिळाली.

Project Manager म्हणून काम करताना टीम मध्ये माणसांची निवड करणे हेही एक महत्त्वाचं काम मला करावं लागतं. पण एक Project Manager म्हणून स्वत:च्या अंगी काय गुण असावेत हे मला त्यांनी Manager निवडण्यासाठी जे निकष दिलेत त्यावरून लक्षात आले. त्यांची लिस्ट मी इथे देतेय:

तंत्रज्ञानाची पक्की ओळख आहे का?
टीमवर्क किती चांगलं आहे? का एकलकोंडे आहेत?
व्यक्तिमत्त्व कसं आहे? बोलतात कसे?
दुसऱ्यांशी जुळवून घेतात की नाही? प्रसन्नपणे वावरतात का सतत कपाळावर आठ्या आणि चिंतेत असतात?
किती ताण सहन करू शकतात? ताण वाढला तर खालच्या लोकांनाही देतात का?
काम चांगलं झालं तर स्वत: श्रेय घेतात का खालच्यांना देतात?
चूक झाली तर उघडपणे मान्य करतात का? त्यापासून शिकतात का?
नवं शिकायला तयार असतात का? किती उत्साही आणि आनंदी असतात?
जबाबदार्या पार पाडू शकतात का?
स्वत:चे निर्णय त्यांच्या परिणामांसकट स्वत:च घेतात का? छोट्या छोट्या गोष्टींसाठी बॉसकडे धावतात का?
कामाचं वाटप योग्य तऱ्हेने करतात की नाही?
हाताखालच्या लोकांना कसं वागवतात?

आठवड्याभराने पुस्तक रिटर्न करताना मी ते खूप आवडल्याचं काकांना सांगितलं. सध्या जरी मी Mary Higgins Clark चं पुस्तक वाचत असले तरी ते वाचून झालं की बोर्डरूम आणि अर्थात  वाचायचं असं ठरवलंय. आणखी एक - शास्त्रीय संगीताची ओळख करून घ्यायची, मग किती का वेळ लागेना.

No comments: