खूप दिवसांपासून भगवदगीता वाचायची असं ठरवत होते. पण बेत काही तडीस जात नव्हता. मग पुस्तक समोरच काढून ठेवलं. आता काय बिशाद लागली आहे दुर्लक्ष करण्याची? हे पुस्तक आहे भगवद गीता As it is. सुरुवातीच्या Introduction मधला बराचसा भाग डोक्याच्या खूप उंचावरून गेला. ’कर्म’ ही आजकाल आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची गोष्ट झाली आहे. पण प्रकृती आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या काही व्याख्या एव्हढ्या बाऊन्सर गेल्या की आता आठवू म्हटलं तरी आठ्वत नाहियेत. :-( त्यातून अश्या बाबतीत अस्मादिकांचं डोकं चाळणीलाही लाजवणारं. गळती होत होत शेवटपर्यंत किती उरतंय ते त्या श्रीकृष्णालाच ठाऊक.
शाळेत असताना आठवी ते दहावी संस्कृत घेतलं होतं. त्यामुळे आता मूळ संस्कृतातले श्लोक वाचून अर्थ लावायचा प्रयत्न करतेय - कधी जमतंय, कधी नाही. जमलं की एखाद्या लहान मुलासारखा आनंद होतोय. मग मी गीता विसरून क्षणभर आपण पुन्हा संस्कृतच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे अश्या दिवास्वप्नात रंगून जातेय. देवा रे! ह्या ओढाळ मनाकडून तूच हे गीतावाचन करून घे आता. पूर्वी अमेरिकेत असताना २ का ३ अध्याय पाठ झाले होते. सहज म्हणून कुठले अध्याय होते ते पहायचा प्रयत्न केला. १ ते १० अध्याय चाळून पाहिले तर एकही श्लोक ओळखीचा दिसेना. धसकलेच एकदम. एव्हढं विसरायला झालंय? पण अकरावा अध्याय उघडला आणि एकदम ओळख पटली. काही दिवस वाचत राहिले तर हा पुन्हा पाठ होईलसं वाटतंय. मग थोडी पुढे गेले आणि पंधरावा अध्याय दिसला. तोही ओळखीचा. ह्यापुढे मात्र गाडी जाईना. दोनच अध्याय पाठ होते का तिसराही होता आणि आता आठ्वत नाहिये? कोणास ठाऊक.
काल सगळी Introduction वाचून संपली. खरं सांगायचं तर त्यातला काही भाग खटकला. एक तर गीता ही अनुभवी, जाणत्या माणसांकडूनच ऐकावी इथपर्यंत ठीक आहे. पण ती disciplic succession मधल्या एखाद्या माणसाकडूनच ऐकावी हा अट्टाहास का ते कळलं नाही. ह्या परंपरेत नसलेली एखादी व्यक्तिही गीतेचा अर्थ जाणून असेल, नाही का? तसंच देवाने सांगितलं आहे म्हणून विश्वास ठेवा हे म्हणणंही पटलं नाही. शेवटची एक गोष्ट म्हणजे एका श्लोकात कृष्णाने असं म्हटलं आहे की माझं नाव घेतल्याने शूद्र, वैश्य किंवा स्त्रियाही मोक्षप्राप्ती करू शकतील. प्रत्यक्ष देवाने त्याच्या लेकरात असा भेदभाव करावा हे विचित्र वाटतं. आपण म्हणतो ना देवाला सगळी सारखीच. मग हे शब्द देवाच्या तोंडचे का वर्णव्यवस्था मानणाया आणखी कोणी नंतर पदरचे घातले?
ह्या सगळ्या प्रश्नांच्या गुंत्यातच आता अध्याय वाचायला सुरु करतेय. मूळ संस्कृतातले श्लोक वाचून अर्थ लावून मग इंग्लीश ट्रान्सलेशन वाचायचं म्हणजे बराच वेळ लागेल. हरकत नाही. सुरुवात केली ही अर्धी लढाई जिंकली. आता रोज वाचत रहाणं ही उरलेली अर्धी. आम्हा सामान्यांना कृष्णासारखा सारथी मिळण्याचं अर्जुनाचं भाग्य नाही पण ’तू ना जाने आसपास है खुदा’ ह्यावर विश्वास आहे. नसेना का माझ्या चर्मचक्षुंना दिसत पण आसपास कुठेतरी माझा कॄष्ण आहे हेच तेव्हढी ताकद द्यायला पुरेसं आहे.
Thursday, November 3, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment