काल जन्माष्टमी! देवाच्या ह्या अवताराबद्दल मला नेहमीच एक कुतूहल आणि माया वाटत आली आहे। ह्या बाळाचा जन्मच कसला विलक्षण। कंसच्या लाडक्या बहिणीचं लग्न होतं काय, 'देवकिच्या पोटी जन्म घेणारा आठवा पुत्र तुझा वध करेल" अशी आकाशवाणी होते काय आणि कंस वासुदेव देवकिला कोठडित डाम्बतो काय। लहान असताना मला आपलं वाटायचं कंस पण मुर्खच - पहिलंच मूल जिवंत ठेवलं असतं तर आठवा मुलगा जन्माला आलाच असता कशाला? पण वय वाढलं आणि समजलं की देवाने निर्दालन करण्यासाठी दुष्टाचे पापाचे घडे पण पूर्ण भरावे लागतात। सनी किंवा बोबी देओलच्या पिक्चर्स सारखा "फैसला ऑन द स्पॉट " नसतो.
पण आठवा मुलगा जन्माला आला खरा। आणि कोठडीवरच्या पहारेकर्याना झोप लागली। कमबशीबी लेकाचे! साक्षात देवाचा जन्म पहायचे भाग्य लाभले असते पण तेव्हाच झोप लागली। कोठडीचे दरवाजे आपोआप उघडले ते मुठी चोखणार्या तान्ह्या बाळ्क्रुष्णाला गोकुलात नेणारया वसुदेवासाठी। वाटेत पसरलेली यमुना आणि तूफान पावसामुळे तिला आलेला पूर, देवाचे निळेशार पाय लागावेत म्हणून उंच उंच उसळणार्या तिच्या लाटा आणि सगळ्या जगावर मायेची पाखर घालणार्या देवावर छत करणारा शेषनाग! ज्या पंचमहाभूतांच्या तांडवाला ते द्रृष्य दिसले ते भाग्यवान!
मला क्रृष्णाच्या आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मात नेहमीच एक साम्य वाटत आलं आहे. तो गोठ्यात जन्माला आला आणि हा तुरुंगात. त्याला राजा हेरॉड पासून धोका होता. ह्याला कंसापासून. सगळंच अद्भुत!
एका जमिनीत रुजून दुसरीकडे वाढणार्या रोपट्यासारखं हे बाळ वाढलं ते गोकुळात. आणि मग सुरू झाल्या एकेक लीला - पूतनेचा वध, कालियामर्दन, गोवर्धन आणि लोण्याची चोरी. हातात लोण्याचा गोळा,चेहेर्यावर खेळतं मिश्किल हसू, कुरळया केसावर डुलणारं मोरपीस आणि कमरेला खोचलेली जगाला वेड लावणारी बासरी - ज्याना निर्गुणाची उपासना करायची त्याना करु देत. मला मात्र हे सगुण रूपच आवडतं.
मला स्वतःला रामावतार कधीच भावला नाही. इतकं सद्वर्तन फक्त देवाकडून होऊ शकतं, मर्त्य मानवाकडून नाही. पण माखनचोर क्रृष्ण मात्र हल्लीच्या भाषेत ज्याला "प्रॅक्टिकल" म्हणतात त्यातला. अर्जुन आणि दुर्योधन दोघेही युध्दासाठी मदत मागायला आले असताना पायाशी बसलेला अर्जुन ह्याला आधी दिसला. "अश्वत्त्थ मेला" अशी आवई उठवून द्रोणांना युध्दभूमीवरुन बाजूला केलं ते ह्याने. शिखंडीचा वापर करुन भीष्माना हटवलं. आणि ऐनवेळी गलितगात्र झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. सत्याला पण देवाची मदत लागतेच की.
काही महिन्यांपूर्वी माऊंट अबूमध्ये एका साध्वीचं निधन झाल्याची बातमी वाचली. ही साध्वी क्रृष्णभक्त होती. त्या लेखात असंही म्हटलं होतं की अनेकांनी स्वत:च्या कानांनी तिच्या खोलीतून पैंजणांचा आवाज आणि लहान मुलाचे बोबडे बोल ऐकले होते. चार पुस्तकं (जरा जास्तच!) शिकलेल्या माझया बुध्दीने भुवया उंचावल्या. पण शतकानुशतकांचे अद्रृश्य संस्कार ल्यालेलं मन लगेच म्हणालं "असेलही कदाचित. देव भक्तासाठी काहीही करतो म्हणतात."
क्रृष्णजन्माच्या शुभेच्छा - हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लालकी!
Friday, August 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment