दरवर्षी हा अंक घ्यावा का घेऊ नये असा मला प्रश्न पडतो. मागच्या एका वर्षीच्या अंकातली बरीच भाषांतरं मला कृत्रिम वाटली होती. मूळची कथा त्यामुळे दुर्बोध झाली असावी असंही वाटून गेलं होतं. पण ह्या वर्षी एकदा पुन्हा वाचून पाहावा म्हणून घेऊन आले. पण ह्या वर्षीही तसाच काहीसा अनुभव आला. त्यामुळे फक्त आवडलेल्या कथांबद्दल इथे लिहीते.
त्यातली पहिली गोष्ट ऑस्कर वाईल्डची 'मतलबी राक्षस'. लहान मुलांसाठीच्या गोष्टी वाचूनही अनेक वर्ष झाली आहेत. आता वाचल्या तर बऱ्याच गोष्टी अर्थातच बालिश वाटतात. पण ही गोष्ट आवडली. कदाचित खऱ्या परिकथेची, बालकथेची ओळख हीच असावी का? कुठल्याही वयात वाचली तरी आवडू शकेल अशी?
मला आवडलेली दुसरी गोष्ट डबल्यू सॉमरसेट मॉमची 'आजीवन ऐषोआरामाची कहाणी'. असं वाटलं की वयाच्या ४० किंवा ५० व्या वर्षी रिटायर्ड व्हायचं आहे तर किती सेव्हिंग्ज असावं हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्या लोकांनी ती वाचायला हवी.
तिसरी गोष्ट अर्थात एगथा ख्रिस्तीचं 'द माउसट्रॅप' हे नाटक. मुळात इंग्रजीतून वाचायला आवडलं असतं. पण आता समोर आलंच तर वाचून टाकलं. मजा म्हणजे खुनी कोण ह्याचा संशय आधीच आला होता. कदाचित काही वर्षं आधी वाचलं असतं तर आला नसता. आता इतक्या रहस्यकथा वाचनात येतात की 'व्यासोच्छिष्टम जगद सर्वम' का काय म्हणतात त्यातला प्रकार झाला आहे.
तामिकी हारा ह्यांची 'भग्न अवशेषांमधून' ही हिरोशिमा-नागासाकी वरच्या हल्ल्यानंतरची भयाण परिस्थिती वर्णन करणारी गोष्ट वाचून हादरायला झालं. एकटी अमेरिका अण्वस्त्रसज्ज असताना ही गत तर आता जवळपास प्रत्येक राष्ट्र असली अस्त्रं बाळगून असताना एक ठिणगी पडली तर जगाचं काय होईल हा विचारसुद्धा करवत नाही. एलिस मन्रोची 'मुलगे आणि मुली' ही गोष्ट वाचून 'मुलीची जात' ही कल्पना जगात सगळीकडे थोड्याफार फरकाने तशीच आहे हे जाणवलं. पण शेवटचं वाक्य विचार करायला लावणारं आहे हे निश्चित.
'इकाल आणि त्याची शाळा' (जेव्हीअर पेनालोसा) ही मला आवडलेली आणखी एक गोष्ट. ती सुखांतिका आहे हे आणखी एक विशेष. मला ट्रॅजेडीज आवडत नाहीत.
मला आवडलेली ह्या अंकातली शेवटची कथा म्हणजे सर आर्थर क्किलर काऊचची 'फ्योडोर हिमकॉफने पाठविलेल्या भेटवस्तू'.
'कविता' विभागातली एक कविता मात्र प्रचंड अस्वस्थ करून गेली. इतकी की 'कोण बाबा हा रमिन मजहर' म्हणून गुगलून पाहिलं. तर मूळचा अफगाणिस्थानचा असलेला आणि आता पेरीसमध्ये राहात असलेला हा कवी आणि पत्रकार. फारसीमधून लिहितो. त्याची 'मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर' ही कविता अशी:
मी माझ्या मातृभूमीला परत जाऊ शकलो तर
मी माझी पुस्तके गोळा करेन
माझे आवडते कपडे
माझी रोजनिशी, फोटोंचा आल्बम
खिडकीच्या चौकटीत सुकून गेलेली फुले
आणि बरोबर घेईन माझा जन्मदाखला
पण माझ्या मित्रांची थडगी?