Saturday, January 30, 2016

2. मस्त भटकंती - दिवाळी अंक २०१५

खरं तर जानेवारीतच लायब्ररी एक महिना बंद करायची असं ठरवलं होतं. कारण दरवेळी कपाट उघडलं की मागच्या वर्षी घेऊन ठेवलेले दिवाळी अंक दिसायचे आणि ते वाचायचे राहून गेलेत ह्याची आठवण व्हायची. पण का कोणास ठाऊक, रोज पुस्तकाची काही पानं वाचली नाहीत तर चुकल्याचुकल्यासारखं वाटत रहातं. म्हणून जानेवारीत लायब्ररीतून पुस्तकं आणली. आता मात्र पण केलाय की फेब्रुवारीत लायब्ररी बंद करायची म्हणजे करायची. हा पण पुरा करायला सुरुवात म्हणून 'मस्त भटकंती' वाचायला घेतला.

लेखांचे विषय मस्तच वाटत होते आणि पर्यटन हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पण 'प्रथमग्रासे मक्षिकापात:' अश्यातला प्रकार झाला. Canada मधल्या बुटचार्ट गार्डन्स वरचा पहिलाच लेख वाचायला घेतला आणि जेमतेम ३-४ परिच्छेदानंतर पानाच्या शेवटी 'पान ६६ वर...' हे शब्द दृष्टीस पडले. पानं उलटून तो लेख पूर्ण केला. पण दुसर्या लेखाचं तेच. आता मात्र मी वैतागले. एखाद-दुसर्या लेखाचं ठीक आहे पण प्रत्येक लेखासाठी अशी पानं उलटत बसायचं म्हणजे तापच की. त्यात लेखाचं एक पान आणि एक जाहिरात असं प्रमाण. व्यावसायिक तडजोडीचा भाग म्हणून एका ठराविक मर्यादेपर्यंत जाहिराती समजू शकतो पण इथे मात्र अतिरेक झाल्यासारखा वाटला हे नक्की. लेख वाचताना आणखी एक लक्षात आलं ते असं की काही काही लेखांत त्या पर्यटन स्थळाविषयी नुसती माहिती आहे. अशी माहिती काय आजकाल नेटवर कुठेही मिळते. पर्यटन विषयक लेखांत लेखकाची स्वत:ची मतं, निरीक्षणं, एखादा मजेशीर किंवा हृद्य अनुभव असं काही असेल तर तो वाचनीय होतो. वाचकाला आपण त्या जागी स्वत: फिरतोय असं वाटलं पाहिजे. पण हे भान फार थोड्या लेखक-लेखिकांना आहे असं दिसलं.

मला आवडलेले लेख म्हणजे 'ले गया दिल साकुरा जपान का', 'जलस्मारकं' ह्या विभागातले सर्व लेख, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे चा हिमालयातल्या ट्रेकिंग वरचा लेख, जयराज साळगांवकर ह्यांचा 'बुलावा आया और', 'ऑरोराचा भुलभुलैय्या', 'सिक्कीममधल्या टुमदार घरात', 'पाताळगुहा आणि जंगलं', 'विदर्भातील खजुराहो' आणि 'रुपीन पास'. मी कधीही ट्रेकिंगला वगैरे गेले नसले तरी मलाही हिमालयाचं विलक्षण आकर्षण आहे. कधीकाळी बेस केम्प पर्यंत जाऊन यायची इच्छा मीही बाळगून आहे. मृण्मयी देशपांडे आणि साळगांवकर ह्यांच्या लेखांनी त्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली आहे. :-) 'उद्याने-देशांतर्गत' मधून कोलकात्याचं वनस्पती उद्यान आणि पैठणचं ज्ञानेश्वर उद्यान ह्यांची माहिती मिळाली. 'मुक्काम आकाशात' ह्या जयश्री देसाई ह्यांच्या लेखातून साहसी पर्यटनात नवं काय चाललंय ते समजलं. कोकणातल्या बकासुराच्या वाड्याबद्दल वाचून मजा वाटली. 'देव मामलेदारांचं देऊळ' लेखाने एका वेगळ्या देवळाबद्दल सांगितलं खरं पण लोकांनी देऊळ बांधावं इतकं काय चांगलं कार्य १९ व्या शतकातल्या त्या मामलेदाराने सटाण्यात केलं ते लेखातून पुरेसं स्पष्ट झालं नाही. सज्जनगडावर स्वामी समर्थांचं थीम पार्क झालंय हे वाचून थोडं विचित्र वाटलं पण खरं तर ते एक म्युझियम आहे. तिथे जायची उत्सुकता वाढली आहे. मेक्सिकन केरेबियन समुद्रातल्या अंडरवॉटर म्युझियमची चित्रसफर मस्त.

एकंदरीत काय तर अंकाची मांडणी अधिक घट्ट केली आणि लेखकांच्या भाषाशैलीत थोडे बदल आणले तर हा अंक अधिक वाचनीय होईल.

असो. हा अंक वाचल्याने माझ्या पर्यटनस्थळाच्या यादीत आणखी काही जागा समाविष्ट झाल्या आहेत:

जपान चेरी ब्लॉसमच्या दिवसांत
पीटरहॉप गार्डन, रशिया
बारा मोटेची विहीर, सातारा
रानी की बाव, गुजरात
चांद बावडी, राजस्थान
कुंडी भंडारा, दापोली
पैठणचं ज्ञानेश्वर उद्यान
कोलकात्याचं वनस्पती उद्यान
मेघालय पाताळगुहा आणि जिवंत मुळाचे पूल
ऑरोरा, पोलर नाईटस्, मिडनाईट सन
मार्कंडदेव मंदिरे, चंद्रपूर

कधी आणि कसं जमतं ते पाहायचं :-)

No comments: