Thursday, September 5, 2013

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:

आज सकाळी हा श्लोक एसएमएस मधून आला आणि मन खूप मागे भूतकाळात गेलं - शाळेच्या दिवसात. शिक्षकदिनाच्या निमित्ताने तेव्हाचे अनेक शिक्षक-शिक्षिका आठवले. आपल्याला त्यांना कुठेही पाहिलं तरी त्यांना ओळखता येतं. पण त्यांच्या हाताखालून एव्हढे विद्यार्थी गेलेले असतात की त्यांना सगळे आठवणं अशक्यच असतं. वर तेव्हाचे आपण आणि आत्ताचे इतक्या वर्षांनंतरचे आपण ह्यात नाही म्हटलं तरी खूप फरक पडलेला असतो.

बालमोहन मधल्या माझ्या शिक्षकांत मला सर्वप्रथम आठवतात त्या चौबळ बाई. मजा म्हणजे तेव्हा मला त्यांचा खूप राग यायचा. कारण त्या नेहमी आम्हा सगळ्यांना मराठीचा धडा शिकवताना 'तुम्ही अमुक पुस्तक वाचलं का? तमुक पुस्तक वाचलं का?' असं विचारायच्या आणि मग 'वाचलं नसेलच' असं म्हणायच्या. 'माहीत आहे तर विचारतात कशाला?" असं तेव्हा वाटायचं. आता कळतं की त्यांच्या परीने आम्हा ठोंब्याना चांगलं काहीतरी वाचायला प्रेरित करायची त्यांची ती पध्दत होती. कधी दसऱ्याला शाळेत जायला जमलं तर लायब्ररी पाहून आपण तेव्हा ह्यातलं काहीसुध्दा वाचलं नाही ह्याची खंत वाटते. मराठीच्या बालभारतीतले धडे आता आठवत नसले तरी प्रत्येक पानापानांवर जमेल तितक्या बारीक अक्षरात पुस्तकांची नावं, नोट्स असं कायकाय लिहिलेलं अजूनही आठवतं.

मराठीची अशीच गोडी नववी-दहावीच्या वर्षात आठल्ये क्लासच्या विजयाताई पटवर्धन बाईंनी (आम्ही त्यांना विजुताई म्हणायचो) लावली. माझे दहावीचे सगळे मराठी विषयाचे सराव पेपर्स त्यांनी न कंटाळता कसे तपासले ते त्यांचं त्यांनाच माहीत. आठल्ये सरांनी नववी-दहावीला जे संस्कृत शिकवलं त्याचा उपयोग मला आता गीतेतले मूळ श्लोक वाचताना होतोय. सगळं वाचता येतंय अश्यातला भाग नाही. २ वर्षांच्या शिदोरीवर ते शक्यही नाही. पण श्लोकाचा मतितार्थ संस्कृत शिकून इतकी वर्षं लोटली तरी लक्षात येतोय ते फक्त त्यांच्या शिकवण्यामुळे. पुस्तकातल्या धड्यांच्या पलिकडे जाऊन इतिहास शिकवला तो गांधी सर् आणि गांधीबाईंनी. इतिहास हा विषय कधीच कंटाळवाणा वाटला नाही तो त्यांच्यामुळे. गोडसे सरांमुळे भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) ह्यात मी पास झाले. :-)

माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेत झालं - अगदी विज्ञान आणि गणित सुध्दा शुध्द मराठीत. तरी कॉलेजमध्ये गेल्यावर अगदीच 'ततपप' झालं नाही ही शाळेतल्या भट बाईंची कृपा.  'पो ओ सी के ई टी पॉकेट' आणि 'ही गोज शी गोज दे गो' चा सार्वजनिक गजर अजून आठवतो. :-) आठल्ये क्लासमध्ये ह्यापुढचं इंग्लिश व्याकरण पक्कं करून घेतलेल्या बाईंचं नाव आता मला आठवत नाही हा माझा कपाळकरंटेपणा :-(

शाळेतल्या आणखी २ प्रिय शिक्षिका म्हणजे शैला परळकर आणि श्यामाताई. दोघींकडे गोष्टी सांगायची विलक्षण हातोटी होती. एखाद्या ऑफ पिरियडला त्या वर्ग सांभाळायला आल्या की आम्हाला खूप आनंद व्हायचा. मग एखादी थ्रिलर गोष्ट ऐकताना तास कधी संपला तेसुद्धा कळत नसे. त्यातल्या २ गोष्टी मला अजून आठवतात. एका गोष्टीत एका मुलाला त्याच्या पूर्वजांच्या जुन्या हवेलीत बोलावलेलं असतं. सोबत म्हणून तो आपल्या एका मित्राला नेतो. रात्री त्या मित्राला एका बाईचा कोणी माणूस खून करत आहे असं दिसतं. तो सकाळी उठून ती गोष्ट त्यांना भेटायला आलेल्या वकिलाला सांगतो आणि तो वकील त्याला खरा वारसदार म्हणून घोषित करतो. दर पिढीत मोठ्या मुलाला पूर्वी कधीतरी घडलेली ती घटना दिसत असते. आता तो मित्र त्या मुलाचा मोठा भाऊ कसा ह्याचं स्पष्टीकरण त्याच्या बाबांनी घरातल्या मोलकरणीशी लग्न केलेलं असतं असं तेव्हा मिळालं होतं हे आठवलं की आज हसू येतं. :-) दुसरी गोष्ट लपाछपीच्या खेळात एका खोलीत पेटीत जाऊन लपलेल्या आणि पेटी बंद झाल्याने आत अडकून मृत्यू झालेल्या छोट्या मुलाच्या आत्म्याची होती.

बीजगणित (अल्जिब्रा) शी माझं सख्य असलं तरी भूमिती (जॉमेट्री) हा मोठ्ठा शत्रू होता. विजया चौधरी बाईंनी भूमिती आणि जीवशास्त्र (बाप रे! कित्ती दिवसांनी हा शब्द वापरला) म्हणजे बायोलॉजी एकदम सोप्पे केले होते. बायोलॉजी माझा आवडता (आणि स्कोरिंग) विषय होण्याचं सारं श्रेय चौधरीबाईंचंच.

आमच्या शाळेत कार्यानुभव, शिवण, फिजिकल ट्रेनिंग (अर्थात पी.टी.), गायन आणि चित्रकला हे विषय सुध्दा होते. पण त्यातल्या एकातही मला फारशी गती नव्हती. तसंही ह्या विषयात नैपुण्य आणि त्यामुळे आवड असणारया विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्गात कमी असणार हे सांगायला नको. पण त्यामुळे त्या शिक्षकांचं महत्त्व कमी होत नाही. त्या सगळ्यांनी ते विषय तेव्हढ्याच तळमळीने शिकवले हे नक्की.

रुपारेल मध्ये मी २ च वर्ष होते त्यामुळे तिथल्या शिक्षकांशी फार जुळलं नाही किंवा जुळायला वेळ मिळाला नाही असंही असेल. पण फारसं कोणी आठवत नाही ही वस्तुस्थिती आहे.

व्हीजेटीआय मधले ३ शिक्षक प्रकर्षाने आठवतात - तिघेही पहिल्या वर्षीचे.  कम्युनिकेशन स्किल्स शिकवणाऱ्या मेडम - ह्यांचं नाव आता आठवत नाही. इंजिनीयरिंग Drawing सोपा करणारे वेणुगोपाल सर् आणि इंजिनीयरिंग Mechanics शिकवणारे जोशी सर.

आयएसबी मध्ये Options and Futures शिकवणारे आमचे तेव्हाचे डीन प्रोफेसर राममोहन राव, प्रोफेसर रवी बाफना, Accounting चे प्रोफेसर मार्क फिन, मार्केटिंग शिकवणारे प्रोफेसर जगमोहन राजू हे खास करून आठवतात. फायनान्स म्हणजे रटाळ कठिण प्रकार आहे असं वाटणार्या मला स्वत:च्या इन्व्हेस्टमेंटस् स्वत: मेनेज करायचा विश्वास आयएसबी मधल्या फायनान्सच्या प्रोफेसर्समुळेच मिळाला.

काय मजा असते ना? जेव्हा आपले शिकायचे दिवस असतात तेव्हा एखादा दिवस का होईना पण पिरीयड बंक करावेसे वाटतात. आणि आज वाटतंय की पुन्हा एकदा विद्यार्थी व्हावं आणि ह्या शिक्षकांचा एक तरी पिरीयड अटेंड करायला मिळावा.

जीना इसीका नाम है :-)

No comments: