यंदा कोणालाच जन्माष्टमीच्या शुभेच्छा देता आल्या नाहीत आणि संध्याकाळी बाहेर पडल्यावर जो धुडगुस पाहिला त्यामुळे त्या दिल्या नाहीत तेच बरं केलं असं वाटलं. आधी दिसले ते बसेस, मिनिबसेस, ट्रक्समधून कर्णकर्कश आवाजातली गाणी लावून आरडाओरडा करत जाणारे किंवा तिघांच्या संख्येने बाईक्सवरून जाणारे गोविंदा. दोघांत साम्य एकच - लाल सिग्नल असतानाही कोणाचीही परवा न करता सिग्नल तोडून बेदरकारपणे पुढे जाणे. त्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. पार्कच्या कडेचे सर्व बांध जेवणारया गोविंदा पथकांनी काबीज केले होते. जिकडे पहावं तिकडे थर्माकोलच्या त्या ३ कप्पे असलेल्या थाळीत पावभाजी खाणारे गोविंदा. जिथून लोक चालतात त्या आतल्या रस्त्यांवर बटाटे, पावाचे तुकडे, टोमेटो सांडलेले. ते येणारयाजाणाऱ्या लोकांच्या पायाखाली येत होते. केव्हढा हा अन्नाचा अपव्यय आणि अपमान! एके ठिकाणी तर लोकांच्या चालायच्या वाटेवर पूर्वी लग्नाच्या पंगतीत बसायचे तसे समोरासमोर २ रांगा करून गोविंदा बसलेले आणि त्यांना वाढणारे स्वयंसेवक. वयोवृद्ध मंडळी, छोट्यांना फिरायला घेऊन आलेल्या बायका, लहान मुलं सगळे चिखल झालेल्या मैदानातून कसेबसे वाट काढत चालले होते. आणि हे लोक बेशरमपणे आपण दहीहंडी फोडतोय म्हणजे आपल्याला हवं तसं वागायचा मक्ता मिळालाय अश्या थाटात बसलेले पाहून डोक्यात तिडीक गेली. कोणी दिला ह्या लोकांना हा हक्क? आणि पोलीस उद्यान गणेशाच्या मंदिरासमोर 'रक्ष रक्ष परमेश्वरा' करत बसलेले. नुसती चिडचिड झाली. १-२ ठिकाणी काही कुठल्यातरी मंडळाचे टी-शर्ट घातलेले गोविंदा इथेतिथे पसरले होते. दमून झोपले असतील असं वाटावं अशी सध्याची परिस्थिती नाही आणि तेव्हढा भाबडेपणाही आता उरला नाही. 'पिऊन पडलेत मेले' असच वाटलं. कसले दिवस आलेत?
मला एकदम लहानपणीचा शाळेतला दहीहंडीचा कार्यक्रम आठवला. अगदी सगळे तपशील आता आठवत नाहीत. पण कॉमन हॉलमध्ये कृष्णाच्या बाळरुपाचा एक मनमोहक फोटो ठेवलेला असायचा, मग 'गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा' चा गजर करत हंडी फोडली जायची. फुटलेल्या मडक्याचे तुकडे गोळा करायला झुंबड व्हायची. हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले की घरात दहीदुधाची कधीच कमतरता भासत नाही असा एक समज होता त्यावेळी. खरं पाहिलं तर तेव्हा घरात कधीच दह्यादुधाची कमतरता नव्हती. आई दर वर्षी ते तुकडे फेकून देते हे माहीत असूनही का कोणास ठाऊक मी ते दरवर्षी घरी आणायचे. आता मोठी झाले. जरा जास्तच मोठी झाले. आता तो निरागसपणा नाही तर भोळसटपणा वाटतो. 'किती अनहायजिनिक असेल ते' असं वाटतं. आणि तरीही कधी काळी टाईम मशीनची सोय झालीच तर पुन्हा एकदा शाळेतल्या दहीहंडीला जावं असंच वाटतं.
आजूबाजूला काय घडतंय ते पाहून, वाचून कधीकधी खूप भीती वाटते. ब्रेक फेल झालेल्या गाडीत बसून आपला समाज अगदी उताराला लागलाय असं वाटतं. आपण नुसते थिजून बसलोय. ह्या रस्त्याच्या शेवटी सर्वनाश लिहिलाय हे माहीत असूनही वेळ आहे तोवर दार उघडून बाहेर उडी मारायची हे कोणालाच सुचत नाहीये.
कदाचित 'संभवामि युगे युगे' चं वचन खरं व्हायची वेळ आली आहे.

No comments:
Post a Comment