मराठीत ह्याआधी रहस्यप्रधान नाटकं होऊन गेली की नाही हे मला माहीत नाही. पण मी नाटकं बघायला सुरुवात केल्यापासून तरी मी अश्या नाटकांबद्द्दल फारसं वाचलेलं नाही. म्हणून 'लव्हबर्डस' बद्दल फार उत्सुकता होती.
नाटक सुरु होतंच ते देविकाला हॉस्पिटलातून आलेल्या एका फोनने. तिच्या नवर्याला, विश्वासाला, अपघात झालेला असतो. ह्या भयानक अपघातात त्याची स्मृती तर जातेच पण चेहेराही न ओळखण्याइतका विद्रूप होतो. plastic surgery च्या सहाय्याने देविका नवर्याला त्याचं पूर्वीचं रूप मिळवून देण्यात यशस्वी होते. पण स्मृतीचं काय?तरी देविका आणि ऑफिसातली सेक्रेटरी ह्या दोघींच्या मदतीने विश्वास आपल्या हरवलेल्या आयुश्याचे तुकडे जोडत असतो. आणि एके दिवशी त्याला एक बिल सापडतं - ५ लाख रुपयांचे लव्हबर्डस खरेदी केल्याचं. तो गोंधळून जातो. त्या लव्हबर्डसच्या दुकानात फोन केल्यावर त्याला दुकानाचे मालक साने भेटायला येतात. ते जे काही सांगतात त्याने विश्वासच्या पायांखालची जमीनच सरकते. असं काय सांगतात साने? हे लव्हबर्डसचं रहस्य काय असतं? :-)
खरं तर plastic surgery करून एखाद्याचा चेहेरा बदलायची कल्पना वापरून वापरून इतकी गुळगुळीत झाली आहे की त्यातलं रहस्य आधीच कळून जातं. पण तरी एखादा नवा ट्विस्ट असेल आणि तसं नसलं तरी एक बर्यापैकी रहस्यप्रधान नाटक पहायला मिळेल अशीच माझी अपेक्षा होती.ती काही अंशी नाटकाने पूर्ण केली. माझ्यासाठी नाटकातला सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला भाग म्हणजे साने झालेल्या गिरीश साळवींचा अभिनय. सानेची विशिष्ट पद्धतीने बोलायची लकब, हात हलवणं, रोखून पहाणं, विश्वासला मदत करायाची त्यांची धडपड सगळं त्यांनी अगदी चोख वठवलं. देविका झालेल्या अमृता सुभाषला आत्तापर्यंत एकदाच पाहिलं होतं ते टीव्हीवरच्या 'अवघाची संसार' नावाच्या रटाळ मालिकेतल्या आसावरी भोसलेच्या भूमिकेत. त्यात तिला टिपं गाळण्यापलीकडे फारसं काम नव्हतं. तिची बिनधास्त देविका आवडली. सगळ्यात निराशा केली ती अनिकेत विश्वासरावने. 'सूर्याची पिल्ले' मधला त्याचा अभिनय मला आवडला होता. पण ह्या नाटकात मात्र त्याच्या अभिनयक्षमतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्यासारख्या वाटल्या. नाटकात बऱ्याच ठिकाणी विश्वासच्या तोंडी विनोदी किंवा गंभीर परिणाम साधणारे संवाद आहेत पण दोन्ही वेळेस अभिनय मात्र त्रागा केल्यासारखा अपेक्षित आहे. हा अभिनय दोन्ही वेळेस त्याने एकाच पद्धतीने केला. त्यामुळे गंभीर संवादाच्या वेळी प्रेक्षक हसल्याचे जाणवलं.
विश्वासचं घर आणि ऑफिस दोन्हीचं नेपथ्य सुरेख वाटलं. तसेच काही प्रसंग आणि फोनवरचे संवाद पडद्यावर दाखवण्याची कल्पनाही मला आवडली. त्यामुळे प्रसंग अधिक परिणामकारक झाले. नाटकात वापरलेलं गूढ संगीतसुद्धा मस्तच. नेमकं हेच कथाबीज असलेला एक हिंदी चित्रपट पाहिल्यासारखं मला वाटतंय पण त्याचं नाव आठवत नाही. तो चित्रपट पाहिला नसता तर हे नाटक अजून आवडलं असतं ह्यात शंकाच नाही.
Sunday, January 29, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment