गीतेचा पहिला अध्याय काल वाचून संपला. त्यातून Takeaway काय असं जेव्हा मी माझ्या मनाला विचारलं तेव्हा एकच गोष्ट आठवली. अर्जुन कृष्णाला म्हणतो की सगळं सोडून देवाचं नाव घेत बसणं मला शक्य होणार नाही. अगदी खरं आहे ते. मीही पूर्वी बसमधून जाताना बयाचदा काही लोकांना वहीत रामनाम किंवा एखादा श्लोक पुन्हा पुन्हा लिहिताना पाहिलंय. हे मला कधी जमणार नाही आणि का कोणास ठाऊक पण पटतही नाहिये. का ते नेमकं नाही सांगता येणार. ह्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो की मी असं सांगतच नाहिये की तू सगळं कामधाम सोडून देवाची प्रार्थना करत बस. तुझं नेहमीचं काम कर पण त्याचबरोबर देवाचीही आठवण ठेव. हे प्रॆक्टिकल वाटतं खरं पण महाकठिण. माझंच बघा ना, सकाळी ऒफ़िसच्या आधी देवाची पूजा करून निघालं की देव एकदम संध्याकाळी सूर्यास्तानंतर उदबत्ती लावताना आठवतो आणि मग रात्री अंथरुणाला पाठ टेकल्यावर. बाकीचा दिवस आयुष्य नावाचं यंत्र कशाकशाची म्हणून आठवण राहूच देत नाही. मग कुठला देव आणि कुठलं काय? :-( कसं जमवायचं हे सगळं?
पुन्हा एक गोष्ट खटकली. एका श्लोकात अर्जुन म्हणतो की घरात मोठी माणसं नसतील तर कुळातली माणसं बिघडायला वेळ लागत नाही. म्हणून मी इथल्या वडिलधाया माणसांना मारु शकत नाही. हे इथपर्यंत ठीक आहे. (तेव्हाच्या काळात झी वरच्या ’पवित्र रिश्ता’ मधल्या मानवच्या आईसारखे वडिलधारे नसतील बहुतेक!) पण पुढे असा उल्लेख आहे की कुलस्त्रिया बिघडल्या की कुलाच्या धार्मिक रीती वगैरेंचा नाश होतो, वर्णसंकर होतो. ह्या सगळ्यात फ़क्त स्त्रीचीच चूक का? वर्णसंकर करायला फ़क्त एक स्त्रीच जबाबदार असते का? त्यात पुरुषाचा हातभार असतोच ना? मग तो दोषी नाही? का बरं?
बरं, ह्यावरच्या विवरणात हे जे स्वामी प्रभुपाद आहेत त्यांनी म्हटलं आहे की स्त्रिया पुरुषात मिसळू नयेत आणि त्यांचं अध:पतन होऊ नये म्हणून त्यांना धार्मिक कर्मकांडांत गुंतवावं. तसंच स्त्रिया बुध्दिमान नसल्याने त्यांना सदोदित वडिलधाया मंडळींचं मार्गदर्शन असावं. हे वाचून मी फ़क्त ’हरे राम’ एव्हढंच म्हटलं. :-(
Tuesday, November 8, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment