Monday, October 3, 2016

कधीकधी देवाजी कृपा करतो आणि ToDo List वर अनेक वर्षं असलेली गोष्ट पटकन घडवून आणतो. रामदास पाध्येंचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पहावा असं कधीपासून मनात होतं. पण कधी संधीच मिळाली नाही. एक तर त्यांचे शोज परदेशात होतात किंवा भारतात झाले तर कॉर्पोरेट शोज होतात. सामान्य लोकांसाठी त्यांचे शोज आजवर झाले असतील तर निदान मी तरी कधी त्याची जाहिरात पाहिल्याचं आठवत नाही. पण मागच्या आठवड्यात अर्धवटरावला १०० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांचे शोज होत असल्याची बातमी वाचली आणि लगेच तिकीट काढून आणलं.

अर्धवटरावला १०० वर्षं पूर्ण झाली? माझ्याही मनात हाच विचार आला. हे कसं शक्य आहे? पण रामदास पाध्येंच्या वडिलांनी स्केच देऊन ब्रिटनमधल्या एका कंपनीकडून हा बाहुला खास बनवून घेतला होता तो १९१६ मध्ये. तेव्हा भारतात अश्या बाहुल्या बनवायचं तंत्र अजून विकसित झालेलं नव्हतं. म्हणजेच अर्धवटराव ह्या वर्षी चक्क शंभरीचा झाला :-)

शोच्या सुरुवातीला झालेलं गाणं पाहून हा शो फक्त मुलांसाठी आहे की काय अशी शंका आली. पण बरेचसे सिनियर सिटीझन्स आरामात बसलेले पाहून तसं नसावंसं वाटलं. आणि ते खरंही होतं. Tom The Terrific ह्या त्यांच्या नव्या भावल्याला घेऊन रामदास पाध्ये रंगमंचावर आले आणि पुढले अडीच तास त्यांनी मला माझं वय विसरायला लावलं. Tom The Terrific चा हजरजबाबीपणा, राजस्थानी कठपुतलीचा नाच (एकच बाहुली पण एकदा उलट केली तर बाहुली आणि पुन्हा उलट केली की बाहुला!), हाताची बोटं घालून वापरायचा छोट्या वाघोबाचा बाहुला, तेव्हढीच छोटी माऊ, हातरुमालाचा वापर करून अक्षरश: सेकंदात उभा केलेला छोटा ससूल्या आणि त्याच्यासोबत मोठा ससोबा, पाण्याखालच्या जगातले कासव, मासे, सीहॉर्स सारखे प्राणी - सगळ्यांनी नुसती धमाल उडवून दिली. माझ्या आसपासची बच्चेकंपनी टाळ्या पिटून नाचत होती. मध्यंतराआधी अर्धवटरावाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणारी एक छोटी फिल्म दाखवण्यात आली. मध्यंतरानंतर अर्धवटराव स्वत:च रंगमंचावर अवतरले. नंतर 'तात्या विंचू' ने सुध्दा एन्ट्री केली. रामदास पाध्येंच्या मोठ्या मुलाने, सत्यजितने सुध्दा छान कार्यक्रम सादर केला. खरं तर पत्नी अपर्णासोबत त्यांचं अख्खं घरच ह्या कार्यक्रमात छानपैकी सामील झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन ह्यांच्या बाहुल्यांचा भाग म्हणावा तितका रंगला नाही, थोडा लांबल्यासारखाही वाटला. १-२ अधिक सेलेब्रिटीजच्या बाहुल्या आणल्या तर हा भागही मनोरंजक होऊ शकतो. तसंच प्रेक्षकांत लहान मुलं बरीच होती त्यामुळे काही 'प्रौढांसाठी' असलेले विनोद टाळता आले असते. पण एकंदरीत रविवारच्या दुपारची झोप सोडून, तेही पाऊस पडत असताना, तंगडतोड करत गेल्याचं अगदी सार्थक झालं.

तेव्हा थोडक्यात सांगायचं तर घरात बच्चेकंपनी असेल तर हा शो बघायलाच हवाच. पण तुम्ही 'प्रौढत्वी निज शैशवास' जपणाऱ्यांपैकी असला तरी हा शो नक्की बघा.

No comments: