Sunday, April 5, 2015

युगांत - इरावती कर्वे

इरावती कर्व्यांच्या 'युगांत' बद्दल माझं अज्ञान दोन प्रकारचं - एक तर हे पुस्तक म्हणजे द्रौपदीच्या दृष्टीकोणातून सांगितलेली महाभारताची कथा आणि दुसरं हे की हे पुस्तक चांगलंच जाडजूड असणार. पण लायब्ररीतल्या मदतनीस मुलीने ते पुस्तक काढून दिलं तेव्हा मी अवाक झाले. आपण बरोबर पुस्तक मागितलं ना असंही क्षणभर वाटून गेलं. पण अनुक्रमणिका चाळली तेव्हा महाभारतावरचे लेख असं ह्या पुस्तकाचं स्वरूप असल्याचं माझ्या ध्यानी आलं.

महाभारत हा खरं तर एक डोह, प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, इतकंच काय पण त्या व्यक्तीवर झालेले संस्कार, त्याला/तिला आयुष्यात आलेले अनुभव, इतकंच काय पण त्याला/तिला प्रिय असलेली जीवनमूल्यं ह्यानुसारही ह्या महाकथेचं त्या त्या व्यक्तीप्रमाणे मूल्यमापन होत असतं असं आपलं मला वाटतं. उदा. धर्म हा काहींच्या मते अगदी आदर्श राजा, पती, मुलगा. पण काहींच्या मते तो दुबळा किंवा 'हलवायाच्या घरावर तुळशीपत्र' ह्या न्यायाने राज्य गमावणारा भाऊ असू शकतो. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर द्रौपदीचं - पाच पांडवांची पत्नी असूनही प्रात:कालीन पूज्य अश्या पाच पतिव्रतामध्ये तिचं स्थान आहे हे मान्य. पण तरी 'मी सूतपुत्राला वरणार नाही' अशी भरसभेत कर्णाची निर्भत्सना करणारी ही पांचालकन्या मला कायम उद्धट वाटत आलेली आहे. त्यातून कृष्ण, भीष्म, दुर्योधन, द्रोण वगैरे व्यक्तीरेखांबद्दल आजवर बरंच काही लिहिलं गेलेलं आहे. पण ह्या व्यतिरिक्त अंबा, गांधारी, विदुर, धृतराष्ट्र आदी व्यक्तीरेखांवर फारसा विचार तुम्ही आम्ही करत नाही. त्यामुळे ह्याबाबत इरावतीबाई काय म्हणतात ते वाचायची मला फार उत्सुकता होती.

धृतराष्ट्र आणि गांधारी ह्यांच्या व्यक्तीरेखांबद्दल त्यांनी जे म्हटलं त्याबद्दल माझं तरी दुमत नाही. डोळ्याला पट्टी बांधून गांधारीने आपल्याच वंशाच्या नाशाची बीजं पेरली असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. अर्थात मुलांवर चांगले संस्कार करणं ही केवळ आईची जबाबदारी नसते. पण धृतराष्ट्राकडून ह्याबाबत काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसल्याने तिच्यावर जास्त जबाबदारी होती आणि ती तिने पार पाडली नाही हेही तितकंच खरं. पण एकाच राजवाड्यात असूनही गांधारी आणि शकुनी ह्या दोघातला एकाही संवाद महाभारतात नाही हे वाचून आश्चर्य वाटलं.

अर्जुन हा मला नेहमी रडीचा डाव खेळणारा भिडू वाटत आलेला आहे. त्या तुलनेने कर्णाच्या बाजूनेचं माझं माप कायम झुकतं राहिलेलं आहे. पण इरावतीबाईनी कर्णाची वेगळी बाजू माझ्यासमोर उभी केली. त्याच्यातले गुणही दाखवले आणि दोषही. तीच गोष्ट कृष्णाची. हा माझा लाडका देव. त्यामुळे त्याचे फक्त चांगले गुणच पाहायचे. पण विशेषत: खांडववन जाळण्याच्या बाबतीत झालेली कृष्णार्जुनांची चूक बाईंनी पुरेपूर त्यांच्या पदरात घातलेली आहे. वृंदावनात गोपींच्या खोड्या काढणारा कृष्ण महाभारताला ठाऊक नाही हेही वाचून आश्चर्य वाटलं.

द्रौपदीच्या बाबतीतलं बाईंचं एक मत मात्र मला अजिबात पटलं नाही. कौरवसभेत पांडव द्यूत हरल्यावर द्रौपदीला दू:शासनाने ओढत आणली तेव्हा 'स्वत: हरून दास झाला असताना युधिष्ठिराला मला पणाला लावायचा हक्क पोचलाच कसा' हा तिने विचारलेला प्रश्न बाईंना उध्दटपणाचा आणि मूर्खपणाचा वाटतो. ज्या बाईची अब्रू जायची पाळी आली असतानाही कोणी तिला वाचवायला येत नाही ती स्वत:ला वाचवायचा शक्य तेव्हढा प्रयत्न करत असताना तिच्याकडून सुसंगत तर्काला धरून अश्या बोलण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. निदान एका बाईने तरी अशी अपेक्षा करणं चुकीचं वाटतं :-(

पुस्तकांच्या शेवटच्या लेखांत बाईंनी मांडलेला विचार मात्र सर्वांनी मनात ठेवावा असाच - परिस्थिती बऱ्याचदा माणसाला एका विशिष्ट प्रकारे वागायला भाग पाडते. नियती म्हणा, नशिब म्हणा, ललाटीचा लेख म्हणा, प्रारब्ध म्हणा - जे काही असेल ते माणसाला एका ठरलेल्या शेवटाकडे घेऊन जात असतं. त्यातून कृष्णासारख्याची सुटका झाली नाही. तुमचीआमची तर गोष्टच सोडा. ह्याचा अर्थ असा नाही की आपण परिस्थिती बदलायला काहीच यत्न करायचा नाही. पण शक्य आहे ते ते सगळं करून झाल्यावर 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' म्हणणंचं श्रेयस्कर.

महाभारताबद्दल वेगळं असं काहीतरी वाचल्याचं समाधान हे पुस्तक देऊन गेलं ह्यात शंकाच नाही. आता इरावतीबाईंचंच 'भोवरा' वाचायला आणलंय.
Who would have thought that fortifying myself with a hearty breakfast would also result in learning a new thing or two? It so happened that the restaurant table had a printed paper the size of a table mat neatly laid out below each plate. On it were a few interesting facts people wouldn't normally know. Three of them caught my attention. Two have to do with Google. Rather than telling you what they are, I would say, type 'Do a barrel roll' in Google and see what the page does. If you like that, type in word 'tilt'. Cool, huh? The third fact was related to the Himalayan kingdom of Nepal. Know what shape its flag is? Rectangular, you say? Nope. "Rectangular" it isn't. Go check :-)

Master Creation 2015, National Handicraft Sale

28 March - 11 April, 11pm-8:30pm, Bandra Reclamation Ground