Saturday, November 16, 2013

Offbeat Diwali

सह्याद्रीच्या डोंगर रांगातून  भटकंती करणार्या ट्रेकर्सनी  साजरी केलेली अनोखी दिवाळी - ऑफबीट  दिवाळी

Sunday, November 10, 2013

The end comes when we no longer talk with ourselves. It's the end of genuine thinking and the beginning of the final loneliness.

-- Edward Gibbon

चैत्राली - दिवाळी अंक २०१३

मागच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे ३-४ ठिकाणी शोधाशोध करून 'चैत्राली' चा दिवाळी अंक पदरात पाडून घेतला कारण पेपरात आलेल्या परीक्षणावरून तो चांगला असावा असं वाटत होतं. काही लेखांचा अपवाद वगळता अंकाने मात्र निराशा केली.

अंकातला पहिला लेख डॉ. शोभा अभ्यंकर ह्यांचा - मराठी भावगीतांबद्दलचा. लेखात माहिती आणि विश्लेषण भरपूर ह्यात वादच नाही. पण मांडणी अतिशय विस्कळीत वाटली. खूप माहिती वाचकांना देण्याच्या प्रयत्नात लेखाचं गोडाऊन झालंय. पहिलाच लेख अर्धवट कसा सोडायचा म्हणून मी नेटाने वाचला खरा पण शेवट येईतो कंटाळून जायला झालं. दिवाळी अंकातला लेख हा वेगवेगळ्या तऱ्हेच्या वाचकांपर्यंत पोचतो त्यामुळे त्यांना तो मनोरंजक वाटावा अश्या पध्दतीने मांडायला हवा ह्याचा विसर पडल्याने पी.एच. डी. चा प्रबंध वाचतोय की काय अशी शंका यावी असं लेखाचं एकदंरीत रुपडं आहे.

ह्यापुढला लेख डॉ. विजय ढवळे (कंसातलं "ओटावा- केनडा" हे वाचून खूप करमणूक झाली) ह्यांचा 'स्टायलिश अमिताभ'. अमिताभच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासात त्याची वेशभूषा कशी राहिली ह्याचा आढावा लेखकाने चांगल्या पद्धतीने घेतला आहे पण अनेक ठिकाणी व्याकरणाच्या चुका आहेत. वाक्याची सुरुवात आणि शेवट ह्यात काही ताळमेळ नाही असं बऱ्याच ठिकाणी झालंय. उदा. हे एक वाक्य 'रेखा व ज्या बच्चन ह्याना एकाच घरात राज्यसभेत - एकत्र आणणे!' ह्या वाक्याचा अर्थ काय आणि लेखाशी त्याचा संबध काय हे मला विचार करूनही कळलं नाही. ह्या अश्या चुका प्रसिद्ध झालेल्या अंकात रहाव्यात हे दुर्दैव आहे. त्यांचा कंगना राणावत वरचा लेख मागच्या वर्षी लिहिला आहे की काय अशी शंका "'आय लव्ह न्यूयॉर्क' हा तिचा सनी देओल बरोबरचा सिनेमा २०१२ च्या शेवटापर्यंत तयार होऊन प्रदर्शित केला जाईल' हे वाक्य वाचून आली.

'मला उमजलेले अण्णा' हा भालजी पेंढारकर ह्यांच्या कन्या सौ. गिरिजा काटकर ह्यांनी लिहिलेला लेख उत्सुकतेने वाचायला घेतला कारण भालजींचं नाव ऐकलेलं असलं तरी त्यांच्याविषयी खूप माहिती मला नाही. परंतु जेमतेम दोन पानी असलेल्या लेखाने मोठी निराशा केली. :-(

एव्हाना अंक वाचायचा माझा उत्साह पुरता मावळला होता. पण तरी नेटाने पुढे वाचत राहिले. मेघश्री दळवी ह्यांचा मराठीत सायन्स फिक्शन चित्रपट का निघत ह्यावरचा लेख वाचनीय वाटला. आणि त्यापुढचा सौ अपर्णा आणि रामदास पाध्ये ह्यांचा विष्णुदासांच्या लाकडी बाहुल्यांवर आधारित नाटकं करायच्या प्रयत्नांबद्दलचा लेख तर खूपच आवडला. मी पाध्येंचं 'लहान माझी भावली' वाचलंय. आधी तर त्याच पुस्तकातून घेतलेलं हे प्रकरण आहे की काय असं मला वाटलं कारण माझ्या आठवणीप्रमाणे त्याही पुस्तकात ह्या बाहुल्यांचा उल्लेख आहे. पण बहुधा तसं नसावं.

'गडकरी वाचावेसे वाटतात' हा विनायक गंधेंचा लेख अपुरा वाटला. ५-६ मुद्दे घेऊन त्या अनुषंगाने गडकरींच्या नाटकांचा उहापोह झाला असता तर लेख अधिक माहितीपूर्ण झाला असता असं मला वाटलं. 'तेच माझं माहेर' ह्या रमेश पाटील ह्यांच्या कथेत दिवाळी अंकात सामील करण्याजोगं काय आहे हे मला अजिबात समजलं नाही.

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिच्यावरच्या डॉ. निशिकांत श्रोत्री ह्यांनी लिहिलेल्या लेखाने मला आधी गोंधळात टाकलं. ह्या पूर्ण लेखात स्मिताविषयीचे उल्लेख वर्तमानकाळातील आहेत. पुढे लक्षात आलं की स्मिता हयात असताना लिहिला गेलेला हा लेख आहे. असे लेख वाचण्याची संधी क्वचीतच मिळते. लॉरेन्स ऑफ अरेबिया वरच्या स्टेनली गोन्साल्वीस ह्यांच्या लेखाने हा चित्रपट पहायचाच आहे ह्याची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव करून दिली. 'आधुनिक मराठी नाटकांतील स्त्री प्रतिमा' हा सौ. मधुरा कोरान्ने ह्यांचा लेख आवडला आणि अनेक जुन्या नाटकांबद्दल बरीच माहितीही मिळाली. ही नाटकं पुन्हा रंगभूमीवर आली तर पहायला नक्की आवडतील. 'छेड सखी सरगम' हा स्व. सी. रामचंद्र ह्यांच्यावर लिहिलेला लेख, डॉ. अरुण मांडेंचा इंग्रजी चित्रपटांच्या आठवणीवरचा लेख, 'कानून' ह्या बी. आर. चोप्रांच्या चित्रपटाविषयीचा लेख, 'पुराने फिर भी सुहाने', 'छोडकें जाने कें लिये आ', 'आगळेवेगळे', 'सफाईदार रिमेक', मदनमोहन, अशोक कुमार, नितीन बोस, राजेश खन्ना, श्रीकांत साठे ह्यांच्यावरचे लेख आवडले. रजनी हिराळकर ह्यांचा 'यादे' हा लेख विषयाच्या मानाने छोटा वाटला. तीच गोष्ट 'नायिका प्रधान हिंदी चित्रपटातल्या तारका'  ह्या लेखाची.

अंकातले काही लेख मात्र वाचले नाहीत कारण काही विषयांत मला फारसा रस नाही तर काही लेखांचा थोडा भाग वाचल्यावर हे लेख म्हणजे माहितीचं भरताड आहेत हे लक्षात आलं. ह्यात 'काव्येषु नाटकं रम्यं', 'कलावंतांचे देहबोलीतील गुह्य अंतरंग', 'बरसे मेघ मल्हार', 'बंदिश एक चिंतन', 'चिरश्रवणीय भारतीय शास्त्रीय संगीत', 'संगीत रंगभूमी काल, आज आणि उद्या' हे लेख येतात.

मराठी संगीत रंगभूमीवरचा डॉ. शोभा अभ्यंकर ह्यांचा लेख वाचायची हिम्मत झाली नाही. 'वेडा' ही अनुवादित कथा वेगळी वाटली. पण 'फलं भाग्यानुसारत', 'निराधाराचा आधार' ह्या कथांत काही वेगळं वाटलं नाही.

मला कवितांतलं फारसं काही कळत नाही. पण 'उध्वस्त' आणि 'काजळवेळी' ह्या कविता सोडल्यास बाकी कविता आवडल्या नाहीत. अंकात ठिकठिकाणी विखुरलेली व्यंगचित्रेही सुमारच वाटली. बऱ्याच लेखांत व्याकरणाच्या चुका आढळल्या.

एकंदरीत पुढल्या वर्षी ह्या अंकाच्या वाटेला मी जाणार नाही हे नक्की.
दिवाळी अंकातल्या एका कथेत हा संस्कृत श्लोक वाचला.

पितारत्नकरो यस्य, लक्ष्मीर्यस्य सहोदरी
शंखो भिक्षाटनं कुर्यात फलं भाग्यानुसारत

रत्नांचा साठा असलेला समुद्र ज्याचा पिता आणि संपत्तीची देवी लक्ष्मी ज्याची बहिण असा शंख मात्र बैरागी, गोसाई ह्यांच्यासोबत दारोदार भिक्षा मागून पोट भरतो. ज्याचं जसं भाग्य तसं फळ त्याला मिळतं.
The strongest man in the world is he who stands alone

-- Henrik Ibsen
बेस्ट तोट्यात चालत असल्याने कर्मचार्‍यांना ह्यावर्षीही दिवाळीचा बोनस मिळाला नाही हे वाचून वाईट वाटलं. खरं तर ह्या तोट्याला सरकारची कचखाऊ वृत्ती आणि बेस्ट प्रशासनाचा भोंगळपणा सर्वस्वी जबाबदार आहेत. सकाळी व संध्याकाळी peak time ला रस्त्यावर एक नजर टाकली तर २-३ गोष्टी लक्षात येतात. एक तर केवळ एक ड्रायव्हर असलेल्या खाजगी गाडया एकामागून एक ओळीने उभ्या असतात. काही बेस्ट बसेस मध्ये मुंगी शिरायला जागा नसेल एव्हढी खच्चून गर्दी असते तर एसी बेस्ट बसेस रिकाम्या धावत असतात.

'मी माझ्या गाडीने ऑफिसाला येतो' ह्या स्टेट्स सिंबल साठी अनेक लोक आपल्या गाडीने प्रवास करतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे car pool हा प्रकारच अस्तित्वात नाही. पेट्रोलचे दर निवडणुकांवर नजर न ठेवता निश्चित केले तर त्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांना एव्हढा तोटा होणार नाहीच. पण नुसतं मिरवायला म्हणून गाडी वापरणाऱ्या लोकांना चाप बसून car pool अथवा एसी बसेस ने प्रवासाची शक्यता वाढेल.

नॉन-एसी बसेस मध्ये निदान peak time ला तरी खूप गर्दी असते. तरी तोट्याचा कारभार चालू आहे ह्याचाच अर्थ तिकीटदर वाढवायला हवेत. अर्थात ही सेवा सरकारी असल्याने सर्वसामान्य माणसाच्या सोयीसाठी आहे म्हणून भाडेवाढीला मर्यादा येतात हे मान्य. जरा भाडेवाढ झाली की इथूनतिथून बोंबाबोंब होते हेही मान्य. ते काय कांद्याचे दर वाढले तरी झाली. म्हणून ती दरवाढ व्हायची थांबली का? मग हा नियम इथेच कां लागू आहे? शिवाय बस मध्ये गर्दी असेल तर विदाउट तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असणार हे सांगायला नकोच. सटीसामाशी दिसणारे टीसी नित्यनेमाने दिसू लागले तर हा प्रकार कमी व्हायला नक्की मदत होईल.

तिसरी गोष्ट म्हणजे route planning. एसी बसेस मुख्यत्वे करून ऑफिसला जाणारे लोक वापरणार हे नक्की. त्यामुळे सकाळी ७:३० ते ९:३० आणि संध्याकाळी ५:३० ते ८ ह्या वेळा सोडून तसंच शनिवार-रविवार ह्या बसेस चालवण्यात काहीही अर्थ नाही हे जेव्हा बेस्ट प्रशासनाला कळेल तेव्हा सोनियाचा दिनु. सकाळी उपनगरातून दक्षिण मुंबईकडे आणि संध्याकाळी दक्षिण मुंबईतून उपनगराकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त असते तेव्हा उलट्या बाजूने धावणाऱ्या एसी बसेस ताबडतोब बंद करायला हव्यात.

पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? ह्याचा फटका बसला तो मात्र वाहतुकीचे कोणतेही नियम ना पाळणाऱ्या मुंबईच्या बेशिस्त रस्त्यांवरून बसेस चालवायची अवघड कसरत करणारया ड्रायव्हर-कंडक्टरना. अजब सरकार आहे!