Tuesday, February 15, 2022

८. दुर्ग (दिवाळी अंक २०२१) (किंमत २५० रुपये)

गड-किल्ले हा माझ्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं तर रायगड, सिंहगड आणि प्रतापगड एव्हढेच किल्ले अजूनपर्यंत पाहिलेत. सांगायला लाज वाटते की तेही एखाद्या टुरिस्टसारखे पाहिले होते. ना त्यात इतिहासाची जाण होती ना दुर्गस्थापत्याबद्दल कुतूहल. आता जेव्हा हे किल्ले पाहायचा योग येईल तेव्हा ते पाहायची नजर अगदी प्रगल्भ वगैरे झालेली नसली तरी बऱ्यापैकी बदललेली असेल. ते होईल तेव्हा होईल. पण तोवर त्याची बेगमी म्हणून दार वर्षी 'किल्ला' आणि 'दुर्ग' हे दोन अंक दर दिवाळीला आवर्जून घेते आहे. दरवर्षी किल्लाचा अंक जपून ठेवते. ह्या वर्षीचा दुर्गचा अंकही  ठेवणार आहे. तर आता अंकाविषयी.

नेहमीप्रमाणेच अंकाचं मुखपृष्ठ देखणं - ह्या वर्षी हडपसर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराने सजलं आहे. पहिल्या लेखात अमोल सांडे हयांनी राजस्थानमधल्या नागौरच्या किल्ल्याविषयी लिहिले आहे. कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांनी काही किल्ले उभारले तर काही आधीच अस्तित्त्वात असलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली. त्याबद्दल संतोष जाधव ह्यांच्या लेखातून माहिती मिळते. नुकतेच दिवंगत झालेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अवघ्या महाराष्ट्राला माहीत. त्यांच्याविषयी कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी लिहिलं आहे. 'जावळी' म्हटलं रे म्हटलं की इतिहासाच्या पानांतून चंद्रराव मोरे ह्यांचं नाव आठवतं. ह्या जावळीच्या दाट जंगलात सप्तशिवालयं आहेत ही माहिती निदान मला तरी नवी होती. डॉ. राहुल वारंगे ह्यांच्या लेखातून ह्या मंदिरांबद्दल वाचून तिथे जायची अनिवार इच्छा होते. विदर्भातल्या 'आमनेर' किल्ल्यावर ओंकार वर्तले हयांचा लेख वाचून नुसत्या महाराष्ट्रातच बघायचे किती किल्ले आहेत ह्याची जाणीव होऊन उर दडपून जातो.

समुद्र हा माझा फारसा कौतुकाचा विषय नाही. दुरून डोंगर साजरे ह्या म्हणीनुसार मी किनार्यावर शंख-शिंपले गोळा करत आनंदाने हिंडेन. पण बोटीतून कुठे जायचं म्हटलं की पोटात धस्स होतं. तेव्हा काका हरदास ह्यांच्या जलदुर्ग सफारीचा वृत्तांत वाचून त्यांना खरोखर हात जोडले. हे असलं काही आपल्याकडून व्हायचं नाही. 'शिर सलामत तो सदोबा पचास' (डॉ. हेमंत बोरसे) आणि भटकंती समृद्ध करणारी हरिश्चंद्रगड परिक्रमा (साईप्रकाश बेलसरे) वाचून आपणही लेखकांसोबत ही  भटकंती केली असं वाटतं :-) मिशन अन्नपूर्णा हा उमेष झिरपे ह्यांचा लेख आधी वाचल्यासारखा वाटला . बहुतेक किल्लाच्या अंकात वाचला असेल.

कोहोज (श्रीकांत कासट), शिवछत्रपतींनी गौरवलेला अहिवंत (प्रा. नितीन जाधव), चाकणचा भुईकोट (दीपक पटेकर), कर्नाळा (अंबरीश राघव), किल्ले हातगड (गौरव गाजरे), विस्मयकारी भुयाराचा कल्याणगड किंवा नांदगिरी (रेणुका काळे), राजस्थानचं काश्मीर - दुर्ग अलवर (अरविंद देशपान्डे), ब्रह्मगिरीच्या शृंगावरील त्र्यंबकगड (अंकुर काळे), गोमंतकातील दोन किल्ले - रेईश मागुश व अलोर्ना (संदीप मुळीक) आणि उत्तर फिरंगण्यातील दुर्गांच्या शोधात (जगदीश धानमेहेर) हे सर्व लेख ह्या किल्ल्यांवर कसं जायचं आणि काय पाहायचं ही माहिती अगदी सविस्तर देतात. पुन्हा एकदा किती पाहायचं आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. :-)

अंकाचा शेवट छत्रपती संभाजीमहाराजांवर मकरंद भागवत धवन हयांनी लिहिलेल्या 'तखत त्यजो अवरंग' ह्या कवितेने झालाय हे उचितच.

7. भयकथा (दिवाळी विशेषांक २०२१) (किंमत २५० रुपये)

हा अंक पाहिल्यावर विकत घ्यायचा की नाही ह्या संभ्रमात पडले होते. भयकथा वाचायला तर आवडतात पण वाचल्यावर भीतीही वाटते. :-) शेवटी घेऊन तर पाहू यात ह्या निष्कर्षाप्रत येऊन अंक घेऊन आले. तरी काही दिवस तो उघडून वाचायचा धीर होत नव्हता :-)

खरं सांगायचं तर अंकाने थोडी निराशाच केली. बऱ्याचशा कथांची सुरुवात वाचून पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज येत होता. तरी त्यातल्या त्यात आवडलेल्या कथा म्हणजे थांग (सचिन देशपांडे), स्किनटोन (सचिन भाऊसाहेब पाटील), बंध (उमेश पटवर्धन), रहनोम (हेमंत कोठीकर) आणि दुहेरी (गुरुदत्त सोनसुरकर).

'धूसर' (अनिरुद्ध फळणीकर) ही कथा फारच लांबल्यासारखी वाटली. 'मनबावरी' (सुनील जावळे) ही रोमँटिक म्हणावी अशी कथा ह्या अंकात कशी हे रहस्य उलगडलं नाही. 'मृगजळ' (राजीव काळे) ह्या कथेला फार्मा इंडस्ट्रीची पार्श्वभूमी असल्याने इंटरेस्टींग वाटली पण त्याचाही शेवट प्रेडिक्टेबल होता.  

अंकात नवोदित लेखकांबरोबरच गाजलेल्या रहस्यकथा लेखकांच्या कथाही समाविष्ट आहेत. पैकी 'बारा पस्तीस' ही रत्नाकर मतकरींची कथा आवडली तरी त्यात राधाकिशन किरीटला मारतो असा काही शेवट केला असता तर वेगळा ट्विस्ट झाला असता असं वाटून गेलं. 'होळी' ही  जी. ए. कुलकर्णी ह्यांची कथा शाळेत वाचलेली असल्याने पुन्हा वाचली नाही. 'रहस्य...एका श्रध्देचे!' ही श्रीकांत सिनकर ह्यांची कथा सत्यकथा होती का काल्पनिक ते कळलं नाही. नारायण धारप ह्यांची 'ते सर्वत्र आहेत' आणि सुहास शिरवळकर ह्यांची 'थ्री डायमेन्शल' आवडल्या नाहीत

हा अंक वाचताना असंही वाटून गेलं की अश्या कथा वाचायची आवड आता मला उरली नाही. अभद्र, अमंगल अशी वर्णनं आता वाचवत नाहीत. ह्या वर्षी कदाचित हा अंक घेणार नाही.