Saturday, February 17, 2024

१०. लोकमत दीपोत्सव (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये २९९)

दरवर्षी लोकमतचा अंक मी सर्वात शेवटी वाचते कारण त्यात डोक्याला भुंगा लावणारे रिपोर्ताज आणि लेख असतात. वाचून त्यावर विचार करायला वेळ मिळतो त्यामुळे. पण खरं सांगते - ह्या वर्षीच्या अंकावरचे 'पुरुष "अस्वस्थ" रहस्याचा शोध' हे शब्द - tagline म्हणा हवं तर - वाचले आणि पोटात गोळाच आला. आता काय वाचायला लागणार ह्याचा. आणि मग काही अगदी जवळचे 'पुरुष' मित्र आठवले. खरं तर जवळचे मित्र-मैत्रीण पुरुष का स्त्री हे आपली दृष्टीने कधी महत्वाचं नसतंच. पण आज कधी नव्हे ते त्यांच्या ह्या ओळखीला महत्त्व आलं. आपण काय वाचणार त्यावरून आपला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर? पण अंकात काय आहे हे वाचायची उत्सुकताही होतीच. ही धाकधूक + उत्सुकता मनात घेऊनच अंक उघडला.

अंकाच्या सुरुवातीलाच अपर्णा वेलणकरांची एक संपादक म्हणून ह्या विषयावरची भूमिका मानणारा लेख आहे. हा विषय मागची अनेक वर्षं घ्यायचा ठरवून घेतला गेला नव्हता हे वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. 

अपर्णा वेलणकरांची भूमिका समजून घेतल्यावर मनातली धाकधूक थोडी कमी झाली खरी. पण सतीश तांबेंचा 'पुरुषपण भार रे देवा' हा वाचून ती पुन्हा सुरु झाली. मुळात मला हा लेख पटला नाही. पुरुषांच्या वखवखलेपणाचं जस्टिफिकेशन केल्यासारखं वाटलं. आणि पुन्हा मनात हेही येऊ लागलं की आपले जे पुरुष सहकारी किंवा मित्र 'सज्जन' किंवा 'त्यातले नाहीत' असे समजत होतो तेही तसेच आहेत का काय? नर आणि मादी ह्यांवाचून दुसरं कुठलंही नातं शक्यच नाही? मला तरी हे पटत नाही. हे सहकारी किंवा मित्र त्यातलेच असतील तर एक तर मी त्यांना ओळखण्यात कमी पडलेय किंवा ते अव्वल दर्जाचे नट आहेत :-( त्यामानाने डॉ. प्रदीप पाटकर ह्यांचा पुरुषांच्या आक्रमकतेचं विश्लेषण करणारा लेख संतुलित वाटला. मंदार भारदे ह्यांनी लिहिलेला 'शहरातल्या हतबल पुरुषाची गोची' हा लेख वाचून हे आपल्या कधीच कसं लक्षात आलं नाही हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला. गावातल्या मध्यमवयीन पुरुषांच्या आयुष्यावर बोलणारा 'अजगराने गिळलेला धूळमातीतला पुरुष' हा लेख शहरात राहणार्या स्त्रिया आणि पुरुष ह्या दोघांनाही सारखाच अस्वस्थ करेल. 

शहरात आपल्याला ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक, भाजीवाले,फळवाले, इस्त्रीवाले वगैरें दिसतात. आपल्या कुटुंबापासून दूर कसे राहात असतील हा प्रश्न आपल्या मनात येतोच पण जगण्याच्या रोजच्या रेट्यात आपण तो विसरून जातो. 'एकटे पुरुष' हा लेख आपल्या ह्या प्रश्नांची पुन्हा आठवण करून देतो. 'स्साली जबान चलाती है' आणि 'हसबेण्डका काम क्याह होता हेई? कमाना!' हे लेख वाचून तर मी महाराष्ट्रातल्या मुलगा-मुलगी असा भेदभाव न करणाऱ्या घरात जन्माला आले ह्याबद्दल मी नियतीचे, देवाचे अक्षरश: आभार मानले. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' ह्या घोषणेला सत्यात यायला किती अवकाश आहे हे समजायला आपल्या राजकारणी लोकांना हे लेख वाचायला द्यायला हवेत. 

'बाईची नजर' हा शर्मिला फडके ह्यांचा लेख स्त्री चित्रकारांनी पुरुषाचं न्यूड शरीर आपल्या चित्रांत कसे दाखवले आहे ह्याबद्दल सांगतो. एरव्ही तुम्ही आम्ही ह्या विषयावर काही वाचणं अशक्यच. 'थँक यु पेद्राम' हा रेणुका खोत ह्यांचा लेख वेगळा विचार मांडतो तो मुळातूनच वाचायला हवा. 'समानता मानता मानता' हा योगेश गायकवाड ह्यांचा लेखही आवडला.  'He की She? हा शर्मिष्ठा भोसले ह्यांचा लेख खरं तर दोन transmenआणि दोन transwoman ह्यांची कहाणी सांगणारा. पण त्यात transwoman - तेही सायशा शिंदे ह्या सेलेब्रिटी transwoman वर जास्त लिहिलं गेलंय. दुसऱ्या transwoman विजया वसावे आणि दोन transmen रंकन आणि श्रेयांश वर लेखात फार काही नाही हे खटकलं. 

'पत्नीपीडित' हा गौरी पटवर्धन यांचा लेख हा बाईच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा गैरवापर करून नवऱ्याला आणि सासरच्यांना जेरीला आणण्याच्या सध्या बोकाळत चाललेल्या घटनांवर परखड भाष्य करतो. 'मर्दानगीची कटकट' ही अनुराग कश्यपची छोटेखानी मुलाखतसुद्धा खास. 

अंकाचा मूळ विषय 'पुरुष' असला तरी अंकात बाकी अनेक विषयावर सुरेख लेख आहेत - मालेगावच्या युट्युबर्स आणि इन्फ्लुएन्सर बद्दल सांगणारा 'अपनी स्टोरी आपुन बेचेगा', 'AI माणसाला खाईल?' हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचा, 'बकासुर' हा 'मुळशी पेटर्न' ह्या चित्रपटात जे दाखवलं आहे त्या वास्तवाचे आणखी पापुद्रे उलगडून दाखवणारा आणि 'इष्काचा विडा' हा लावणीच्या जगावरचा.

थोडक्यात काय तर, अंक नेहेमीप्रमाणेच पैसे वसूल. आत्तापासूनच ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय काय असेल ह्याची उत्सुकता आहे :-)


९. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ४००)

'ट्रेकिंगवरचा पहिला दिवाळी अंक' अशी ओळख असणाऱ्या ह्या दिवाळी अंकाचा हा बारावा अंक. म्हणजे अंक सुरु होऊन एक तप पूर्ण झालं. 'दिवाळी अंक' हा मराठी माणसाचा चकली-चिवडा आणि नाटक ह्यांइतकाच वीक पॉईट असला तरी आजकालच्या जमान्यात कोणी पुस्तक वाचायला जात नाही अशी सार्वत्रिक ओरड नेहमीच ऐकू येते. ह्या परिस्थितीत अंकाचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. मी कधीपासून अंक आणायला सुरुवात केली ते ह्या ब्लॉगच्या जुन्या नोंदी पाहून मला कळेलच पण अंक प्रथम वाचला त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आणलाच बहुतेक. 'किल्ला' चा अंक दार दिवाळीला जपून ठेवते. 'दुर्गांच्या देशातून' चा अंक आजवर ठेवला नाही. पण ह्या वर्षीचा मात्र ठेवणार आहे. ह्याला कारण ह्या वर्षीच्या अंकात आधी कधी न वाचलेल्या किल्ल्यांबाबत भरपूर माहिती आहे. आणि कधी न कधी तरी वेळ काढून हे सर्व किल्ले डोळस नजरेने पाहायचे हा आयुष्यातल्या टू-डू लिस्टमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असो.

अंकात आधी ज्यांनी कधी लिहिलेलं नाही शक्यतो अश्या लेखकांना संधी द्यायचा आपला शिरस्ता ह्या वर्षीही अंकाने पाळलेला दिसतो हे संपादकीयातून समजतं. ह्या वर्षीच्या अंकात लिहीणार्या लेखकांची संख्या ३२ आहे हेही कळतं. पण ह्या ३२ लेखांविषयी दोन शब्द लिहिल्याचा नादात संपादकीय चांगलं ६ पानी झालेलं आहे. मी सुरुवातीचं एक पान वाचलं. मग शेवटचं पान वाचलं आणि सरळ लेखांकडे वळले. मला असं वाटतं की ह्याऐवजी प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला त्या लेखक-लेखिकेबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. 

तर नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर आता अंकातल्या मला आवडलेल्या लेखांकडे वळते. 

'हे आपल्याच्याने ह्या जन्मी तरी होणे नाही' अशी गोष्ट म्हणजे गिर्यारोहण. त्यामुळे बाकीच्यांनी केलेल्या मोहिमेबद्दल वाचण्याची उत्सुकता असतेच. 'अष्टहजारी मोहिमांचा थरार' हा जितेंद्र गवारे ह्यांचा लेख ह्यावर भरपूर माहिती देतो. आणि ह्या असल्या कठीण मोहिमा करून ही गिरिशिखरं सर करणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. आपण जिथे राहातो त्या परिसरातले किल्ले आपल्या शाळेतल्या मुलांनाही दाखवले पाहिजेत ह्या ध्यासातून ही कल्पना सत्यात उतरवणाऱ्या ३ शिक्षकांच्या उपक्रमाची माहिती शिवराज पिंपुडे ह्यांच्या 'दुर्गजागर' ह्या लेखातून मिळते. त्यातून प्रेरणा घेऊन अधिक शिक्षक असे उपक्रम राबवतील अशी आशा वाटते. 'Mountains Memoirs' हा लेख मॅरेथॉन धावपटू असलेल्या सुविधा कडलग ह्यांच्या सह्याद्रीतल्या आणि हिमालयातल्या गिर्यारोहणावरचा लेख छान आहे. पण तो इंग्लिशमधून का आहे हे कोडं काही उलगडलं नाही. पन्हाळा, लोहगड आणि तोरणा ह्या ३ किल्ल्यावर लिहिलेला सुनील लिमये ह्यांचा 'गडकोटांच्या सान्निध्यात' हा छोटेखानी लेखही मला आवडला. एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जायचं एक वेडं स्वप्न मी अनेक वर्षं उराशी बाळगून आहे. त्यामुळे एव्हरेस्ट चढाईवरचा शिवाजी ननवरे ह्यांचा 'माझा एव्हरेस्ट प्रवास' हा लेख आवडला. 

'चक्रम हायकर्स' हे नाव कधी त्यांनी आयोजित केलेले उपक्रम किंवा त्यांनी यशस्वी केलेली रेस्क्यू ह्यामुळे पेपरातून वाचून अनेकांना माहितीचं असेल. अश्या लोकांना 'गिरिभ्रमण कळे कौतुक' हा समीर कर्वे ह्यांचा लेख आवडेल. तीन संस्कृत श्लोकांच्या आद्याक्षरांतून 'चक्रम' हे नाव तयार झालंय हे वाचून आश्चर्य वाटतं. रायगड माहीत नाही असा मराठी माणूस विरळा. स्वराज्यातल्या ह्या महत्वाच्या किल्ल्यावर मयूर खोपकर ह्यांनी 'महाराजांच्या दृष्टिकोनातून राजगडाचे महत्व' हा छान माहितीपूर्ण लेख लिहिलेला आहे.  डॉ. नितीन हडप ह्यांनी प्रतापगड आणि रायगड ह्यांचं नातं उलगडून दाखवलेलं आहे. अशीच माहिती पुरंदर ह्या किल्ल्याबद्दल यशोधन जोशी ह्यांच्या 'डॉ. हरमान गोएटस ह्यांच्या नजरेतून पुरंदर' ह्या लेखातून मिळते. 

साल्हेरच्या लढाईवर सुभाष फासे ह्यांच्या 'साल्हेर स्ट्रॅटेजिकल सर्जिकल स्ट्राईक' ह्या लेखातून बरीच माहिती मिळते. पंकज समेळ ह्यांचा लेख धारावी, वसई, घोडबंदर, ठाणे, पारसिक, दुर्गाडी ह्या किल्ल्यांची माहिती देतो. डॉ. राहुल वारंगे हयांनी रसाळगड, सुमारगड आणि महीपतगड  ह्या दुर्गत्रयीवर लिहिलंय. अशीच माहिती सूरज गुरव (नांदेडचा नंदगिरी), विजय माने (पदरगड सह्याद्रीच्या कुशीतली अनोखी किमया), प्राची पालकर (रामगड), शिवाजी आंधळे (सुधागड) ह्यांच्या लेखातून मिळते. शिल्पा पिसाळ ह्यांचा 'देवतिब्बा' च्या ट्रेकवरचा लेख आणि संकेत शिंदे ह्यांचा 'कुंभेघाट ते ठिबठिबा नाळ' हे लेख वाचून वाचकालाही तिथे जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. किमया देशपान्डे ह्यांनी पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरच्या मंदिरांवर माहितीपूर्ण लेख लिहिलाय. 

अंकातले शेवटचे काही लेख शिवनेरी, सामानगड आणि कलानिधीगड ह्यांच्या संवर्धनाविषयी माहिती देतात. उठसुठ शिवाजीमहाराजांचं नाव घेणारे राजकारणी ज्या महाराष्ट्रदेशात आहेत तिथे प्राचीन किल्ल्यांचं असं संवर्धन करायची वेळ येते ह्याबद्दल खंत वाटते. पण सरकारी मदतीची वाट न बघता स्थानिक लोक आणि संस्था ह्यात पुढाकार घेत आहेत हे चित्र आशादायक वाटतं. 

ज्या वर्षी स्वराज्यातल्या प्रत्येक गडावर दसरा-दिवाळीच्या दिवशी दिवे लागतील, रांगोळ्या काढल्या जातील, पाडव्याला गुढी उभारली जाईल आणि बाकी वर्षभर पर्यावरणाचं, निसर्गाचं आणि इतिहासाचं भान राखून माणसांचा राबता चालू होईल तो सुदिन. तो लवकर यावा ही देवाजवळ कळकळीची प्रार्थना. 

Saturday, February 10, 2024

८. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ३००)

ह्या वर्षीच्या 'ऋतुरंग' च्या अंकाचा विषय 'आपलं माणूस'. ह्यावर आधारित भरपूर लेख अंकात आहेत. पैकी मला गुलजार, जावेद अख्तर, दिलीप माजगावकर, विश्वास पाटील, शुभदा चौकर, समीर गायकवाड आणि प्रगती बाणखेले ह्यांनी लिहिलेले लेख खास आवडले. 'त्रिमूर्ती' ह्या सदरात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावरील लेख आहेत पण त्यातून फारसं नवं हाती लागलं नाही. 'सातासमुद्रापलीकडे' ह्या सदरात परदेशी लोकांशी झालेल्या मैत्रीवर अनेक लेख आहेत. आजच्या काळात धर्मावरून, जातीवरून, भाषेवरून देशादेशात आणि देशांतर्गत चाललेल्या भांडणांच्या बातम्या वाचून जीव विटलेला असताना हे लेख धीर देतात, अजूनही आशा आहे हा विश्वास देतात. अंकात जागोजागी असलेली रेखाटने उत्तम. 

7. भवताल (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ३००)

डोळे झाकून दरवर्षी घ्यावेत अश्या मोजक्या दिवाळी अंकांपैकी एक म्हणजे भवताल. प्रत्येक अंकात एका वेगळ्या विषयावर खूप मनोरंजक माहिती मिळते. खरं तर आता मला आधीच्या वर्षीचे अंक जपून न ठेवल्याचा खूप पश्चात्ताप होतोय.

असो. तर ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय आहे - माळराने. प्रवासात आपण सगळेच अश्या जागा बघतो जिथे मोठमोठे वृक्ष नसतात की हिरवीगार कुरणं नसतात. आपल्या नजरेला काही खुरटी झुडपं, गवत असं काहीबाही दिसतं आणि मग वाटून जातं की अरे इथे झाडं लावायला पाहिजेत. पण ही विचारसरणीच मुळात कशी चुकीची आहे हे हा अंक आपल्याला समजावून देतो. कारण अश्या ओसाड पडीक वाटणाऱ्या जागेची आपली म्हणून एक परिसंस्था, एक इकोसिस्टिम असते. खुरट्या वाटणाऱ्या झाडाची आपली वैशिष्टयं असतात. 'गवत' अश्या सामान्य नावाने बोळवण केली तरी त्यात नानाविध प्रकार असतात जे पट्टीच्या वनस्पतीशास्त्रतज्ज्ञालासुद्धा घाम फोडू शकतात. इथे ह्यासोबत नांदणारी आपली म्हणून एक जीवसृष्टी असते. हे सगळं लक्षात न घेता सगळं काही 'सुजलाम सुफलाम' करण्याच्या प्रयत्नात आपण पर्यावरणाची किती भरून न येणारी हानी करू शकतो ते हा अंक वाचून आपल्या लक्षात येतं. 

अंकात माळरानांशी संबंधित अनेक विषयावर लेख आहेत - जगात आढळणारे गवताळ प्रदेश, आपल्या महाराष्ट्रातले गवताळ प्रदेश,माणसाच्या उत्क्रान्तीचा, विकासाचा आणि माळरानाचा संबंध, माळरानांवर पडलेला विविध काळातल्या राजसत्तांचा प्रभाव, विदर्भातली माळराने, गायराने, राखणरानाची पद्धत, माळरानावर आढळणारे विविध प्राणी, वनस्पती, गवताच्या अनेक प्रजाती, माळरानाशी घट्ट नाळ जोडून असलेले धनगर, नंदगवळी हे समाज, धुळ्यातल्या कुरणांच्या पुनरूज्जीवनाची गोष्ट, हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीकाठच्या गावात गवताचं पीक घेणाऱ्या १२ गावांची गोष्ट, चारा नियोजन, डेक्कन कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन, दख्खनच्या पठारावरील लांडगे आणि बिबटे, गवताळ प्रदेशांचे संवर्धन आणि माळरानं सुधारण्याचा पुणे जिल्ह्यातल्या केंदूर इथला प्रयोग. एकदा अंक हाती घेतला की खाली ठेवणं कठीण. ह्या वर्षीपासून हे अंक जपून ठेवायचे का असा मी सिरियसली विचार करते आहे. मागल्या सगळ्या वर्षीचे अंक मिळतात का तेही पाहायला हवं. 

आणि हो, 'भवताल इकोटूर्स' आणि 'भवताल' च्या अन्य उपक्रमांची माहिती हवी असल्यास ९५४५३५०८६२ ह्या क्रमांकावर 'Bhavatal updates' असा मेसेज पाठवा किंवा bhavatal@gmail.com वर ईमेल करा. 

Monday, January 22, 2024

६. धनंजय (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ४००)

खरं तर गेल्या काही दिवाळीपासून नवलसोबतच धनंजयचे अंक घ्यायचं मी बंद केलं होतं. कारण मला त्यातल्या कथा फारश्या आवडल्या नव्हत्या आणि काही काही तर उगाच अस्वस्थ करणाऱ्या वाटून गेल्या होत्या. पण ह्या यावर्षी लोकसत्तामधलं परीक्षण वाचून अंक आणून बघायचा ठरवलं. 

अंक भरगच्च दिसत होता तरी पहिली काही पानं जाहिरातींनी भरलेली पाहून वैतागच आला. अंकाची व्यावसायिक आणि आर्थिक गणितं सांभाळायला हे गरजेचं आहे ते पटतं. पण तरी मजकुरापेक्षा जाहिराती जास्त होऊ नयेत असं वाटतंच. ह्यांनंतर मात्र तितकीच भरगच्च अनुक्रमणिका पाहून बरं वाटलं. अंकातल्या कथा एकूण १५ विभागात विभागल्या आहेत. 

'हनीट्रॅप' (बाळ फोंडके) वैज्ञानिकदृष्ट्या संभवनीय तरी थोडी अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 'नजर' (किरण क्षीरसागर), काळोखाचे विश्व (सुशील अत्रे) अस्वस्थ करणाऱ्या कथापैकी. 'राणीचा चंद्रहार' (गिरीश देसाई) ही कथा पटली नाही. कुठल्याही संशोधनाची वैज्ञानिक जगात व्यवस्थित चिकित्सा होते. कुठल्याही क्षेत्रात कोणाच्याही नावाचा दबदबा असल्यामुळे ते म्हणतात ते काही चिकित्सा न करता मान्य होईल हेच मुळात पटत नाही. 

'केतन काळेचं कोणी काय केलं?' (सागर कुलकर्णी) प्रेडिक्टेबल होती तरी आवडली कारण कथेच्या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं लेखकाने टाळलंय. प्रत्येक वाचकाने आपल्याला हवा तो शेवट करावा. किंवा एकापेक्षा जास्त शेवट कल्पावेत. आजकाल बऱ्याचदा कथेत नक्की काय होणार आहे ह्याचा अंदाज वाचकाला लवकर येतो. पण अश्या ओपन एंडेड कथा असतील तर आपण आपली कल्पनाशक्ती लावू शकतो. 

'पाठवणी' (बशीर मुजावर) आवडली. तरी वाड्यात नक्की काय झालंय ह्याचा अंदाज असूनही लोक तिथे कामावर यायला तयार होतात हे पटलं नाही. शेवटी 'सर सलामत तो पगडी पचास'. 'त्यानंतर' (मेघश्री दळवी) थोडी किचकट वाटली. 'गज सैरंध्री' (अरुण हेबळेकर) ही अरण्यकथा रहस्यमयी कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या अंकात कशी समाविष्ट झाली हे गूढ काही उकललं नाही. 'अरण्यकथा' हा विषय घेऊन गुढकथा होऊ शकते. तीच गोष्ट 'कृष्णपर्यटन' (डॉ. संजीव कुलकर्णी) ह्या कथेची. 'लव्ह एन्ड डेथ इन द आफ्टरनून ' (अरुण नेरुरकर) ही कथा 'मोसाद' या पुस्तकातून साभार घेतली आहे असा उल्लेख आहे. ही अनुवादित कथा अंकात घेण्याचं प्रयोजनसुद्धा कळलं नाही. 

'सूर तेचि छेडीता' (संजय काळे), मुंग्या (माधव गोविंद धारप), 'राधानाथ चाकलादार यांची अखेरची रात्र' (चंचलकुमार घोष), इन्क्वीझिसाव (मेघा मराठे). मेजवानी (शैलेंद्र दिनकर शिर्के), 'अधिवास' (प्रतिभा सराफ), 'काट्यानं काटा' (र. अ. नेलेकर), 'शिटीफुक्या' (रवींद्र भयवाल). 'समांतर तपास' (अमोल भिमरावजी सांडे), 'अबाधित' (रामदास खरे). 'रात्र पावसाळी' (अपर्णा देशपांडे), 'द सक्सेसफुल फेल्युअर' (सुनील जावळे) आणि 'गाळवणकर चाळ' (शरद पुराणिक) ह्या कथा आवडल्या. 

'धनंजय' (पुरुषोत्तम रामदासी) ही कथा रहस्यकथेपेक्षा जास्त रोमँटीक आणि थोडी फिल्मी टाईप्स वाटली. 'बहुरूपी' (असीम अमोल चाफळकर) वाचून मिशन इम्पॉसिबल चित्रपटाची आठवण झाली. ' चलो रतन' (आशिष महाबळ) वाचून असं वाटलं की धर्माच्या नावाखाली बजबजपुरी माजविणाऱ्या सगळ्या संतमहंतांना अशी सद्बुद्धी झाली तर किती बरं होईल. 'देशी व्हाया फॉरेन' (मुकुंद नवरे) ह्या कथेतून लेखकाला नक्की काय सांगायचं होतं  ते निदान मला तरी कळलं नाही. 'रक्त तहान' (राजीव तांबे) कळली नाही. 'सुखवितो मधुमास हा' (गिरीश केशव पळशीकर) आणि 'अवतार मोहन बाबा' (डॉ. प्रमोद कोलवाडकर), 'वशीकरण' (मिलिंद जोशी) पटल्या नाहीत. 'मॉस्को शहरातील एना' (मूळ लेखक लूक वेसन) काही खास वाटली नाही. 

'बंदी' (स्मिता पोतनीस) वाचून शहारायला झालं. करोनानंतर साथीच्या रोगांवर आधारित कथानक असलेले हॉलिवूडचे चित्रपट पाहायला नको वाटायचं तसंच वाटलं. हवामानात वेगाने होणारे बदल पाहता पाण्याखाली जाणारी शहरं ही विज्ञानकथातली कल्पना ना राहता सत्यघटना होऊही शकते ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. 'पासवर्ड' (डॉ. सुनील विभुते), 'रूम नंबर ६९' (विनय खंडागळे), 'त्रयस्थ' (राजश्री बर्वे) प्रेडिक्टेबल वाटल्या. 'दृश्यम' (श्रीराम बापट) आणि 'ललित बाबुराव डहाणूकर' (अजय गोविंद जयवंत) प्रेडिक्टेबल असूनही आवडल्या.

'पाच गूढ चोऱ्यांचं प्रकरण' ही अनुवादित कथा मूळची अल्फ्रेड हिचकॉकची आहे हे वाचून धक्का बसला इतकी ती सरधोपट आहे. बहुरूप्यांचा राजा (मूळ लेखक रॉबर्ट क्लिंटव) ही कथाही मला फारशी आवडली नाही. 'मोक्ष' (राजश्री राजवाडे काळे), 'लोभ: पापस्य कारणम' (श्रीनिवास शारंगपाणी). 'रोझीमामीचा आरसा' (मृणालिनी केळकर). 'उष:काल होता होता' (अरुण मनोहर), 'कॅंसर वॉर्ड' (वासंती फडके) ठीकठाक वाटल्या. 

'हंगल साहेब थोडं हसा ना' (मूळ लेखक हरी मृदुल) आवडली नाही. एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातल्या शेवटच्या दिवसातल्या त्याच्या केविलवाण्या अवस्थेचं आणि त्याचं भांडवल करणाऱ्या निगरगट्ट समाजाचं चित्रीकरण करायचंच होतं तर त्यासाठी ए. के. हंगल ह्या खऱ्याखुऱ्या कलाकाराला वापरलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. 'मार्जाराख्यान' (मूळ लेखक एच. पी. लव्हक्राफ्ट) ह्या कथेच्या सुरुवातीच्या भागानेच इतकं अस्वस्थ केलं की मी बाकीची कथा सरळ स्किप केली.

ह्या वर्षीचा अंक एकूणात आवडला हे खरं असलं तरी तरी पुढल्या वर्षी लोकसत्तातलं परीक्षण वाचल्याशिवाय अंक घेणार नाही हेही तितकंच खरं.

Monday, January 1, 2024

४. दीपावली (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ३००)

दीपावलीचा अंक मी निदान मागच्या दिवाळीला तरी घेतला नव्हता. ह्या वर्षी लोकसत्तामधलं परीक्षण वाचून आणला.

अंकाची सुरूवात झालेय ती सुहास बहुळकर ह्यांच्या श्रीशिवकाव्य ह्या पोथीवरच्या लेखाने. लेखात खूप माहिती आहे. पण काही चित्रांचे क्रमांक आणि माहिती ह्यात गल्लत झालेय. काही चित्रांबद्दल माहिती आहे पण ती चित्रं लेखात समाविष्ट केली गेलेली नाहीत. त्यामुळे वाचताना थोडा हिरमोड होतो.

भारतीय संगीतातलं - मग ते शास्त्रीय असो की लोकसंगीत - मला फारसं कळत नाही. त्यामुळे कुमार गंधर्व आणि त्यांची गायकी ह्याबद्दल नुसतं ऐकून आहे. तरी ह्यावरच अरुण खोपकर ह्यांचा 'शिवपुत्राचे इंद्रधनुष्य' हा लेख उत्सुकतेने वाचला. ह्यात त्यांनी कुमारांच्या 'गीतवर्षा' ह्या पावसाशी संबंधित लोकगीतांवरच्या कार्यक्रमाबद्दल विस्ताराने लिहिलं आहे. संगीतावर किती खोल विचार केला जाऊ शकतो ह्यासोबत एक रसिक बनायला किती आणि काय काय माहीत असावं लागत त्याची जाणीव हा लेख करून देतो. लेख वाचून युट्युबवर सर्च केलं तेव्हा ह्याची काही रेकॉर्डिंग सापडली. वेळ काढून ती ऐकायला हवीत. 'गंधवार्ता' हा डॉ. बाळ फोंडके ह्यांचा गंधांच्या दुनियेवरचा लेख थोडा शास्त्रीय भाषेतला असला तरी इंटरेस्टिंग आहे. 'मणिपूर आणि मेंदू' मधून मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यावरचा एका वेगळ्या अंगाने केलेला विचार सुबोध जावडेकर ह्यांनी मांडलाय. पण लेखाच्या शेवटचं 'स्त्रियांकडे व्यक्ती म्हणून बघायला शिकलं पाहिजे' हे विधान किती वाचून असलं तरी ते कितपत शक्य होतील ह्याची शंका वाटते. 

'जेआरडींची पत्रं' ह्या लेखातून अंबरीश मिश्र ह्यांनी टाटांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनासहित उलगडून दाखवले आहेत. लेख वाचून जेआरडींचं चरित्र आणि हे 'लेटर्स' हे पुस्तक वाचायच्या पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालं.

'केमेरा' ही मिलिंद बोकील ह्यांची कथा वाचून जे आपलयाला समजलंय तेच लेखकाला सांगायचं होतं का आणखी काहीतरी हा प्रश्न पडला. विवेक गोविलकरांची 'स्वीकार' कळलीही नाही आणि आवडलीही नाही. गणेश मतकरींची 'थाप' मात्र आवडली. 'शेरलॉक होम्स आणि कसब्यातला हस्तसामुद्रिक' ही  हृषीकेश गुप्ते ह्यांची दीर्घकथा आवडली. पण एव्हढे मराठमोळे शेरलॉक आणि वोटसन आर्थर कोनन डॉयल सोडाच पण दस्तुरखुद्द पुणेकरांनासुद्धा किती चालतील हा प्रश्न आहे :-) असीम चाफळकर ह्यांची 'ड्रोनाचार्य' ठीक वाटली. 'यंक्याच्या आईचे रहस्य' गोष्टीच्या सुरुवातीसच लक्षात आलं होतं तरीही किरण क्षीरसागर ह्यांची ही कथा आवडली. 'लाव्हा आणि फुलं' (उज्ज्वल राणे) विज्ञानकथा म्हणून ठीक वाटली. 

 'कविता' विभागाने मात्र सुखद धक्का दिला. कवितेचं आणि माझं फारसं जमत नाही. पण ह्या विभागातल्या बऱ्याच कविता कळल्या आणि त्यामुळे आवडल्या देखील. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो पुढील कवितांचा - चित्र आणि नाटक (हेमंत जोगळेकर), इमारत (उत्तम कोळगावकर), झाडं (वसंत आबाजी डहाके), मित्रा (नीरजा), सीतेने लिहिलेलं पात्र (किरण येले), सापडणं (कल्पना दुधाळ, इतकेच पुरेसे आहे (प्रतिभा सराफ), गझल (चंद्रशेखर सानेकर), गोष्ट शहाण्या सश्याची (हर्षदा सुंठणकर) आणि आईचा रस्ता (ऐश्वर्य पाटेकर).

'धर्माचा रंग काळा' हा डॉ. प्रतिभा राय ह्यांच्या लेखाचा राधा जोगळेकर ह्यांनी केलेला अनुवाद वाचून सुन्न झाले. लेखिकेचं ओडिया भाषेतलं आत्मचरित्र अनुवादित असेल तर वाचायला आवडेल. पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जायची इच्छा मात्र आता होईल असं वाटत नाही. दाग देहलवी ह्या शायरावरचा नंदिनी आत्मसिद्ध ह्यांचा लेख आवडला. शेरोशायरी हा एक रिटायर झाल्यावर अभ्यास करायच्या यादीत टाकलेला विषय आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव ह्या लेखाच्या निमित्ताने झाली. पहिल्या व्यवसायीक स्त्री डॉक्टर कोण ह्यावर लिहिलेला अंजली कीर्तने ह्यांचा लेख आवडला. 'क्रेझी हॉर्स' ह्या अमेरिकेतल्या बनत असलेल्या मॉन्युमेंटवरचा अरुणा गर्गे ह्यांचा छोटेखानी लेख माहितीपूर्ण. मला ह्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. 

'आहे लोकशाही तरीही...' हे शीर्षक वाचून ह्या विभागात काय लेख असतील ह्याचा अंदाज आला. पैकी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, मोहन हिराबाई हिरालाल, दीपक करंजीकर आणि उत्पल व. बा. ह्यांचे लेख वाचले. डॉ. भालचंद्र मुणगेकर ह्यांचा लेख मला झेपला नाही. त्यामुळे तो वरवर वाचला हे लिहायला लाज वाटतेय. 'मोदीविरोध आणि वैचारिक अस्पृश्यता' असलं शीर्षक असलेला लेख विनय सहस्त्रबुध्दे ह्यांनी लिहिला आहे. ह्यांचे लोकसत्तातले लेख वाचून लेखात काय असेल ह्याचा पक्का अंदाज असल्याने सरळ स्किप केला.

'किचनक्रांती' ही प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं खूप आवडली. 

एकुणात काय तर परीक्षण वाचून अंक आणल्याचं चीज झालं. 

Saturday, December 30, 2023

५. किल्ला (दिवाळी अंक २०२३) (किंमत ४५० रुपये)

किल्ल्याचा दरवर्षीचा दिवाळी अंक मोठ्या उत्सुकतेने उघडते. ह्या वर्षीही तसंच झालं. पण ह्या वर्षीच्या अंकाने थोडी निराशा केली असं म्हणावं लागेल. कदाचित काही लेख नेहमीप्रमाणे एखादा विशिष्ट किल्ला किंवा शिवकालीन घटना किंवा शिवकाळातील एखादा विषय ह्यावर आधारित नव्हते म्हणून असेल कदाचित.

उदा. 'शिवपूर्वकाळ' वर डॉ. अजित आपटे ह्यांनी लेख लिहिला आहे. ह्यातली काही माहिती नवी असली तरी बरीचशी बऱ्याच मराठी माणसांना माहीत असलेली. तसाच एक जोडलेख शिवोत्तर काळ ह्या विषयावर लिहिला असता तर कदाचित तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने बरं झालं असतं. 'छत्रपती एक अदभूत कारकीर्द' हा संदीप तापकीर ह्यांचा लेखही असाच जेनेरिक वाटला. 

अपवाद काही लेखांचा. त्यातील पहिला आदिशक्ती श्रीतुळजाभवानी वरचा डॉ. मंजिरी भालेराव ह्यांचा. प्रतापगडावरील मूर्तीपासून देवीची अनेक तीर्थं, तिथले लेख आणि स्थापत्य याविषयी माहिती ह्या लेखातून मिळते. दुसरा लेख पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा 'शिवकाळातील चलन व्यवस्था' ह्या विषयावरचा. ह्यातल्या अनेक नाण्यांविषयी वाचून लोक रोजच्या जीवनात आर्थिक व्यवहार कसे करायचे हा प्रश्न पडला :-) शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांच्या मदतीने शिवराज्यकोष कसा निर्माण केला ह्याविषयीची मनोरंजक माहिती सुहास सोनावणे ह्यांच्या लेखातून मिळते. 'भरडधान्य' ह्या विषयावर आजकाल बरंच लिहिलं जातंय. पण हेच भरडधान्य मराठा सैन्याला कसं उपयुक्त ठरत होतं ह्याविषयी एड. सीमंतिनी नूलकर ह्यांचा लेख वाचून कळतं. तेव्हाच्या काळातल्या भरडधान्य वापरून केलेल्या काही पाककृती दिल्या असत्या तर लेख अधिक परिपूर्ण झाला असता. 

किल्ले पदमदुर्ग ह्याची रचना, दुर्ग निर्मितीतले घटक ह्याविषयी सविस्तर माहिती चंद्रशेखर बुरांडे ह्यांच्या लेखातून मिळते. शिवकाळातील कर म्हणजे औरंगजेबाने हिंदूंवर लादलेला जिझिया एव्हढीच माहिती होती. त्यापलीकडे जाऊन स्वराज्यातला महसूल विभाग, त्यातले अधिकारी,महसुलाचे मुख्य स्रोत, ३ प्रकारचे कर (प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि संकीर्ण) ह्याविषयी साद्यन्त माहिती 'शिवरायांची करप्रणाली' मधून प्रवीण गायकवाड आपल्याला देतात. लाल महालात शिरून महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली हा इतिहास सर्वाना माहीत आहे. पण त्या घटनेबद्दल बरीच वेगळी माहिती उदा. मोहीमपूर्व तयारी, प्रत्यक्ष कारवाई आणि ह्या घटनेचे झालेले परिणाम प्रा. अविनाश कोल्हे ह्यांच्या 'लाल महालातील थरार' ह्या लेखातून मिळते. तीच गोष्ट 'मुरारबाजी' वरच्या डॉ. सचिन पोवार ह्यांच्या लेखाची. पुरंदरची लढाई शर्थीने लढणाऱ्या मुरारबाजीबद्दल सर्व मराठी माणसांना माहित आहे. पण त्यांचं घराणं, पुरंदर किल्ला, प्रत्यक्ष लढाई आणि मुरारबाजी ह्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारा बद्दल बरीच माहिती हा लेख देतो. 

मला सर्वात आवडलेला अंकातील लेख म्हणजे संजय तळेकर ह्यांनी लिहिलेला उंबरखिंडीच्या लढाईवरचा. ह्या लढाईबद्दल मला तरी खास माहिती नव्हती. पण लढाईची पूर्वपीठिका, कारतलब खानाचं सैन्य, त्याचा प्रवासाचा मार्ग, महाराजांनी केलेली व्यूहरचना आणि प्रत्यक्ष युद्ध ह्याबद्दल वाचताना खरोखर मजा आली. त्यामानाने लेखाचा 'शरणागती' हा शेवटला भाग घाईघाईत गुंडाळल्यासारखा वाटलं. लेखाची शब्दमर्यादा ओलांडली गेल्यामुळे असं झालं असावं का? ह्या लढाईच्या दूरगामी परिणामांबद्दल वाचायला नक्कीच आवडलं असतं. भास्कर सगर ह्यांची रायगडाची रेखाचित्रं आवडली. 

असो. मुख्यत्वेकरून शिवकालीन चलन आणि करप्रणाली ह्याविषयीच्या माहितीसाठी हा अंक दर वर्षीप्रमाणे जपून ठेवते आहे. मोडी लिपीचा सखोल अभ्यास जेव्हा करता येईल तेव्हा ह्या लेखांचा उपयोग होईल असं वाटतं.