Thursday, January 21, 2021

3. भवताल (दिवाळी अंक २०२०)

भवतालचा अंक गेल्या काही दिवाळीपासून विकत घेतेय आणि प्रत्येक वर्षी खूप आवडलेलाही आहे. त्यामुळे ह्या दिवाळीलाही डोळे झाकून आणला. पण वाचायला सुरुवात केली तेव्हा काहीसा विरस झाला.

एक तर आजच्या कोविड-१९च्या धुमाकुळाला अनुसरून अंकाचा विषय म्हणजे सूक्ष्मजीव. एरव्ही हा विषय मनोरंजक वाटला असता पण जीवाणू, विषाणू, लशीकरण, प्रतिजैविकं ह्यावर गेले काही महिने, जवळपास वर्षच म्हणा ना, इतकं काही वाचलंय आणि ऐकलंय की हा विषय नको वाटतो. पण तरी नेटाने वाचायला सुरुवात केली. तेव्हा एक लक्षात आलं की अंकाचा विषय दिला असला तरी कदाचित लेखकांनी कोणते विषय घेतले आहेत ते नीट तपासून पाहिलं गेलं नाही किंवा निरनिराळे विषय वाटून दिले गेले नाहीत. कदाचित अंकाचा विषय थोडा घाईत बदलावा लागला म्हणूनही असेल कदाचित. पण त्यामुळे झालंय काय की वेगवेगळ्या लेखांत विषयांची पुनरावृत्ती झालेय. 

बरं अंक मराठी म्हणून इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय वापरण्याच्या नादात लेख क्लिष्ट बनलेत. 'प्रतिपिंड' म्हणजे 'अँटीबॉडीज' हे सांगितल्यावर ह्या मराठी शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी हे लक्षात येत असलं तरी आधी कळत नाही. एक पूर्ण लेख मी हा अर्थ माहित नसताना वाचला. पुढल्या लेखात शब्दाचा अर्थ कळल्यावर संगती लागली. 

तिसरा मुद्दा हा की वैज्ञानिक ज्ञान सोपं आणि इंटरेस्टींग कसं करावं ही हातोटी सगळ्यांच्याकडेच असते असं नाही. ज्यांना ते जमलं नाही त्यांचे लेख कंटाळवाणे आणि माहितीचं भरताड असलेले झाले. 

असो. तर एव्हढं सांगितल्यावर अंकातले आवडलेले लेख कोणते हेही लिहायला हवं, नाही का? तर ह्या मालिकेतला पहिला लेख ('उत्क्रांतीचे मेरुमणी') हा सजीवांच्या उत्क्रांतीवरचा डॉ. मिलिंद वाटवे ह्यांचा. डॉ. जयंत नारळीकर हे नाव सर्वांच्याच परिचयाचं. त्यांचाही लेख ('पृथ्वीवर सजीव उपराच?') डोक्यावरून जातो की काय ही भीती मनात घेऊन वाचायला सुरुवात केली. पण डॉक्टर नारळीकरांनी सहजसोप्या आणि मनोरंजक पध्दतीने पृथ्वीबाहेरचे सूक्ष्मजीव शोधून काढायच्या प्रयोगांबद्दल लिहिलंय. 'फोल्डस्कोप' ह्या सिंगल-लेन्स पेपर मायक्रोस्कोपवरचा डॉ. प्रवीण राठींचा छोटासा लेखही असाच वाचनीय.

इतिहासात आलेल्या संसर्गजन्य रोगांच्या साथींबद्दल डॉ. सुभाष वाळिंबेनी लिहिलंय. माणसाच्या पोटातसुध्दा अनेक जीवाणू असतात हे प्रथम ऐकलं तेव्हा कसंसंच झालं होतं. आणि त्यातले तर चक्क काही परोपकारी असतात हे वाचून तर थक्क झाले होते. अश्याच जीवाणूंवर डॉ. राहुल बोडखे ह्यांनी 'माणसाच्या पोटाचर अधिराज्य' हा लेख लिहिलाय. साथींचा समाजमनावर कसा परिणाम होतो हे कोव्हिडकाळात आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे. त्यावर डॉ. प्रदीप आवटेंनी विस्ताराने लिहिलं आहे.

'जिन टॉनिक' बद्दल आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकलं असेल. ही भानगड नक्की आहे काय हे 'टॉनिक नावाच्या औषधाची गोष्ट!' हा 'टीम भवताल' ने लिहिलेला छोटेखानी मस्त लेख समजावून देतो. Antibiotic Resistance बद्दलही आजकाल पेपरात बरंच काही छापून येतं. त्याबद्दल माहिती देणारा डॉ. निषाद मटंगे ह्यांचा 'औषधाचा मृत्यू' हा लेख आवर्जून वाचण्याजोगा आहे. रोगांच्या हद्दपारीवरल्या पाचव्या विभागात 'देवी'च्या उच्चाटनाबद्द्ल ओंकार गोडसे ह्यांचा, 'एका विषाणूचे उत्खनन' हा डॉ. योगेश शौचे ह्यांचा तर पोलिओच्या उच्चाटनाबद्द्ल डॉ. जगदीश देशपांडे ह्यांचा हे ३ लेख विशेष उल्लेखनीय.

अंकाच्या सहाव्या विभागात ह्या क्षेत्रातल्या विविध संस्थांबद्दल छोटेखानी लेख आहेत. त्यात हाफकिनबद्दल वाचून अभिमान वाटतो तर हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या सरकारी अनास्थेमुळे झालेल्या दुर्दशेबद्दल वाचून वाईट वाटतं. कोव्हिडच्या साथेमुळे सरकारला सुबुध्दी प्राप्त होवो आणि ह्या संस्थेला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होवो अशी मनापासून इच्छा.