Monday, January 6, 2020

६. कालनिर्णय (दिवाळी अंक २०१९) (रुपये १४०)


कालनिर्णयचा अंक घ्यायचं माझं पहिलंच वर्ष. मेजेस्तिकमध्ये अंक घ्यायला गेले तेव्हा सहज म्हणून चाळला. इंटरेस्टीन्ग वाटला म्हणून विकत घेतला. वाचायला आत्ता मुहूर्त लागला.

खरं तर पहिल्याच लेखाचं शीर्षक वाचून पोटात धडकी भरली होती – गीता आणि गांधी. ह्या दोन्ही विषयांवर व्हॉटसएप युनिव्हर्सिटीमध्ये एव्हढं भरभरून येतं की आणखी काही वाचायलाच नको. पण प्रथम ग्रासे मक्षिकापात: असला प्रकार नको म्हणून लेख वाचायला घेतला. गांधीजींच्या गीतेविषयीच्या भुमिकेसोबतच डॉक्टर आंबेडकर, विनोबा भावे, विवेकानंद आदींच्या त्याबाबतच्या विचारांचा उत्तम उहापोह लेखात केलाय. लेखाच्या शेवटी एक संदर्भग्रंथांची छोटी सूचीही आहे. त्याचा वापर करायची वेळ ह्या जन्मात येणार नाही ही खात्री असल्याने त्याचा फोटो काढून घ्यायच्या भानगडीत अस्मादिक पडले नाहीत. J आंतरराष्ट्रीय (आणि आजकाल देशीसुध्दा) राजकारण हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय असल्याने ‘सेक्युलेरीझ्म कालबाह्य होत आहे का?’ हा लेख उत्तर माहित असूनही वाचला. तरी अजूनही काही मुद्दे ह्यात घेता आले असते असं वाटून गेलं.

पुढले काही लेख व्यक्तीचित्रणात्मक. ह्यात रामदास फुटाणे, परमवीर चक्र डिझाईन करणार्या मूळच्या स्विस असलेल्या सावित्री खानोलकर (हेही ज्ञान व्हॉटसएप युनिव्हर्सिटीतून मिळालेलं!), ना.धों. महानोर, महेश काळे अश्या परिचित व्यक्तीसोबत धोंड मास्तर, शशिकांत धोत्रे, डॉक्टर शरच्चंद्र विष्णू गोखले, छत्तीसगढमधली पंडवानी शैलीची गायनकला प्रसिध्द करणाऱ्या तिजनबाई, सत्तरच्या दशकातले प्रसिद्ध रहस्यकथा लेखक दिवाकर नेमाडे अश्या निदान मला तर अपरिचित असलेल्या व्यक्तींबद्दल छान माहिती मिळाली. सावित्री खानोलकर ह्यांच्यावरील लेखात इंद्रवज्राबद्दल बरीच माहिती असली तरी त्यामुळे लेख सावित्रीबाईंवरचा का इंद्रवज्रावरचा असा प्रश्न पडलाच. शशिकांत धोत्रेची चित्रं पाहून लहानपणी चित्रकलेच्या शिक्षकांवर उपकार म्हणून काढलेल्या महाभयानक चित्रांची आठवण होऊन हसू आलं.

आर्ट डेको हा शब्द बर्याच वेळा वाचनात आलेला असूनही तो गुगल करून पहाण्याची तसदी मी घेतली नव्हती. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे प्रसिद्ध आर्किटेक्ट कामू अय्यर ह्यांच्या मुलाखतीत समजतं. हेल्वेटीका हे फोन्टसच्या लिस्टमध्ये अनेक वर्षं पाहिलेलं नाव. पण त्याच्या जन्माची कथा त्यावरला लेख वाचून कळली. सुचित्रा सेनवरचा बुरोशिवा दासगुप्तांचा लेख तिच्याबद्दल बरंच काही सांगून जातो. लदाखवरची महेंद्र सिंग ह्यांची छायाचित्रं सुरेख. इथं जायचं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. ‘रानभूल आणि चकवा’ हा नारायण डोंगरवार-पाटील ह्यांचा त्यांचे वडील माधवराव ह्यांना अरण्यात आलेल्या अनुभवांवरचा लेख खूप आवडला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हा लेख मेट्रोच्या कारशेडसाठी रात्री अपरात्री झाडं तोडणार्या ‘मी परत येणार’ छाप लोकांना वाचायला दिला पाहिजे. तरीही अक्कल येईल असं वाटत नाही.

कवितांचं आणि माझं कधी पटलं नाही ही बाब मी दिवाळी अंकांच्या परीक्षणात ह्याआधीही नमूद केली आहे. असं असूनही शिवकन्या शशी ह्यांची ‘काहीच नाही म्हणता म्हणता’ आणि ‘काचेवर थांबलेला पक्षी’ ही शर्मिला रानडे ह्यांची अश्या दोन्ही कविता फार भिडल्या. ‘आज पु. लं. असते तर’ ह्या भागातली व्यंगचित्रं भावली. पु.लं. खरंच असायला हवे होते असं वाटून गेलं. :-(

‘कालनिर्णय पाकनिर्णय २०२०’ मधल्या पाककृती मात्र निराशाजनक वाटल्या. एकही करून पहायची इच्छा झाली नाही. दिवाळी अंकातल्या कथा मला फारश्या आवडत नाहीत. ह्या अंकातल्या कथाही, एक ‘टेक्नोसेव्ही कुसुम’ सोडली तर, अपवाद नव्हत्या.

एकंदरीत वेगळ्या विषयावरचे लेख घेऊन आलेला अंक आवडला. पुढल्या वर्षी नक्की घेईन म्हणते.