Tuesday, July 19, 2016

मध्यंतरी विविध भारतीवर प्रसिद्ध संगीतकार मदनमोहन ह्यांच्या दोन मुलांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकायचा योग आला. आपल्या वडिलांशी संबंधित अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यातल्या काही....

1. मदनमोहन ह्यांचं आपल्या गाडीवर खूप प्रेम होतं. तिला ते प्रेमाने 'बेबी' म्हणायचे. एकदा त्यांच्याकडे परदेशातून काही मित्र आले. त्यांना भारत फिरून दाखवावा म्हणून मदनमोहन गाडीतून घेऊन गेले. नाशिकजवळ एका निर्जन ठिकाणी गाडी अचानक बंद पडली. मेकेनिक सोडाच एखादा माणूससुध्दा दिसायची मारामार. मदनमोहन गाडीतून खाली उतरले आणि बोनेटजवळ जाऊन म्हणाले 'बेबी, माझ्या मित्रांसमोर तू माझी फजिती करणार? ते काय म्हणतील'. आणि दोन मिनिटांनी त्यांनी चावी फिरवली तेव्हा गाडी सुरु झाली.

2. दुसरा किस्सा मसुरीच्या सेव्होय हॉटेलचा....१९६७-६८ च्या काळातला. तेव्हाचं हे मसुरीतलं सर्वात प्रसिद्ध मोठं हॉटेल. मदनमोहन ह्यांची पत्नी आणि मुलं तिथे सुट्टी घालवायला आली. मदनमोहन मागाहून येणार होते. ते आले तेव्हा पूर्ण हॉटेल भरलेलं होतं....अंदाजे ३००-३५० लोक असावेत. पहिले २-३ दिवस घोडेस्वारी वगैरेत गेले. मग मदनमोहन आपल्या पत्नीला म्हणाले की इथे असलेल्या सगळ्या लोकांसाठी मला जेवण बनवायचं आहे. ती अवाक झाली. ते म्हणाले तुझी मैत्रीण ह्या हॉटेलची मालक आहे तेव्हा तिला चालेल का ते विचार. त्यांच्या पत्नीने विचारलं तेव्हा मालकीण म्हणाली की त्यांना काही त्रास होत नसेल तर तिला काही आक्षेप नाही. मग मदनमोहन ह्यांनी त्यांच्या घोडेवाल्याना तिथे चांगलं मटण कुठे मिळतं ते विचारून घेतलं आणि ते आणून टेनिस कोर्टवर चार मोठाल्या हंड्यात शिजवलं. मग प्रत्येक खोलीच्या दरवाजावर टकटक करून त्यानी लोकांना जेवायचं आमंत्रण दिलं. ही पार्टी झाल्यावर मग ते पत्नीला म्हणाले की माझी सुट्टी संपली, आता मी परत जातो, तू मुलांना घेऊन नंतर ये. स्वत:च्या घरी सुध्दा दर रविवारी बाजारातून भाजी, मटण आणून स्वत: स्वयंपाक करायचा आणि लोकांना जेवायला बोलवायचं हा त्यांचा आवडता शौक होता. Wrestling ची आवड होती त्यामुळे दारासिंगबरोबर मैत्री होती. क्रिकेट, बिलियर्डस ह्याचा शौक होता. ब्रेबॉर्नवर क्रिकेटचे सामने पहायला ते नेहमी जात.

3. 'नैनोमें बदरा छाये' ह्या 'मेरा साया' मधल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक किस्सा आहे. तेव्हा मल्टी-ट्रेक रेकॉर्डिंगची सोय नसल्याने वादक आणि गायक एकाच वेळेस वाजवत आणि गात असत. थोडी जरी चूक झाली तरी पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग करावं लागे. त्या दिवशी वादकांच्या ताफ्यातल्या कोणाची तरी चूक होत होती आणि पुन्हा पुन्हा रिटेक्स होत होते. १२-१३ वेळा असं झाल्यावर मदनमोहन भडकले आणि गायक आणि वादक ह्यांच्यामध्ये असलेल्या भिंतीच्या काचेवर त्यांनी रागाने हात मारला. काच तडकली आणि त्यांच्या हाताला जखम झाली. लोकांनी त्यांना हॉस्पिटलात जायचा सल्ला दिला. पण त्यांचं म्हणणं एकच - मी रेकॉर्डिंग पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही. लता मंगेशकरांनी ही आठवण सांगताना नमूद केलंय की खरं तर गाऊन गाऊन त्या खूप थकून गेल्या होत्या पण मदनमोहनांचा रुद्रावतार बघून सगळेच एव्हढे घाबरले होते की पुढच्याच टेकला गाणं ओके झालं. :-)

4. 'कदर जाने ना' हे त्यांचं गाणं बेगम अख्तरनी त्या दिल्लीला असताना ऐकलं. ते त्यांना एव्हढं आवडलं की त्यांनी तडक हॉटेलमधून मदनमोहनना ट्रंककॉल लावला. त्या आणि त्यांच्या खोलीत असलेले लोक सगळ्यांनी आळीपाळीने मदनमोहनजी कडून ते गाणं ऐकलं आणि तेव्हढा वेळ तो फोन चालू राहिला.

5. जहांआरा मधली तीन सोलो गाणी तलतला द्यायची असा मदनमोहनजींचा आग्रह होता. पण तलत तेव्हा फार गाणी गात नसत. आणि रफी फेमस होते. त्यामुळे प्रोड्युसर ओमप्रकाशने ती रफीकडून गाऊन घ्यायची असं ठरवलं. मदनमोहनजींनी त्याला ठणकावून सांगितलं की मी हवं तर ही फिल्म सोडतो नाहीतर ही गाणी माझ्या खर्चाने तलतच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतो. तुम्हाला फिल्ममध्ये ठेवायची तर ठेवा नाहीतर ती गाणी माझ्या मालकीची होतील. असाच आग्रह पुढे 'लैलामजनू' च्या वेळी त्यांनी धरला. फरक एव्हढाच की ह्या वेळी किशोरकुमार ऐवजी ऋषी कपूरसाठी काही गाणी रफीच्या आवाजात रेकॉर्ड करायचा त्यांचा निर्धार त्यांनी तडीस नेला.

6. 'मौसम' च्या गाण्यांचं रेकॉर्डिंग चालू होतं तेव्हाची गोष्ट. त्या काळात मदनमोहनजी लोणावळ्याला एक बंगला बांधत होते. शनिवार-रविवार त्या कामाची पहाणी करायला ते जात असतं. त्यांनी भूपिंदर आणि गुलजार दोघांना सांगून ठेवलं होतं की सोमवारी सकाळी ११ ला मी स्टुडीओत येतो मग ११:३० ला आपण सुरुवात करू. पण ११:२५ झाले तरी त्यांचा पत्ता नव्हता. खर तर ते दिलेली वेळ कधीच चुकवत नसत. भूपिंदर स्टुडीओच्या खाली उभे होते तेव्हा त्यांच्यासमोर एक ट्रक येऊन थांबला. ड्रायव्हर उतरला आणि त्याने दुसर्या बाजूने एकाला हात देऊन उतरवलं. भूपिंदरनी पाहिलं तर ते मदनमोहनजी होते. त्यांच्या गाडीला जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर अपघात होऊन गाडी दरीत कोसळली होती. त्यानाही खूप लागलं होतं. पण रेकॉर्डिंग पूर्ण झाल्याखेरीज त्यांनी हॉस्पिटलात जायला नकार दिला.

7. एकदा विलायत खान ह्यांनी आपला भाचा (किंवा पुतण्या) रईस खान छान सतार वाजवतो तेव्हा त्याला जमेल तर संधी दया म्हणून त्यांच्याकडे आणलं. मदनमोहनजीनी त्यांना मद्रासच्या एव्हीएम प्रोडक्शनच्या एका फिल्मचं नुकतंच रेकॉर्ड झालेलं गाणं ऐकवलं. त्यात शिवकुमारनी सतार वाजवली होती. रईस खान ह्यांनी जवळ असलेली सतार उचलून 'मी हे असं वाजवलं असतं' म्हणून वाजवून दाखवताच मदनमोहनजी एव्हडे खुश झाले की लगेच मद्रासला फोन करून हे गाणं पुन्हा रेकॉर्ड होईल असं त्यांनी जाहीर केलं. ह्यापुढले सगळे सतारचे पिसेस रईस खान ह्यांनी वाजवले हे वेगळं सांगायला नको. त्यांच्या मृत्यूनंतर मदनमोहनजीनी सतार फारशी वापरली नाही. पण नंतर पुढे ते स्वत: सतार वाजवायला शिकले असं त्यांच्या मुलाने सांगितलं. चित्रपट संगीत फारसं ऐकत नसलेले बिस्मिल्ला खान हेसुद्धा मदनमोहनजीच्या संगीताचे चाहते होते. एकदा मदनमोहनजीचा मुलगा त्यांच्या वाराणसीच्या घरात काही कामानिमित्त गेला असताना त्यांनी सनईचे सूर छेडून 'हर तरफ बजने लगी सेकडो शहनाइया' असं म्हणून त्याचं स्वागत केलं अशीही आठवण त्याने सांगितली.

8. मदनमोहनजी आणि लतादीदी ह्यांची पहिली भेट 'शहीद' ह्या फिल्मच्या वेळची. तेव्हा त्यांनी तिला आपण लवकरच संगीतकार होणार असं सांगितलं आणि आपल्या पहिल्या फिल्ममध्ये गायची विनंती केली जी दीदींनी मान्यही केली. पुढे काही कारणाने त्यांना त्या फिल्ममध्ये गाता आलं नाही. मग एक दिवस मदनमोहनजी त्यांच्या घरी आले आणि म्हणाले तुम्ही कबुल केल्याप्रमाणे माझ्या पहिल्या फिल्म मध्ये गायला नाहीत. असं म्हणून त्यांनी खिशातून राखी काढली आणि म्हणाले की आज रक्षाबंधन नाही पण तुम्ही ही राखी मला बांधावी अशी माझी इच्छा आहे. मग तुम्ही नक्की माझ्या फिल्म मध्ये गाल. पुढे हे कॉम्बिनेशन हिट झालं हे सर्वश्रुत आहे. दीदींना फारशी गाणी न देणाऱ्या ओ.पी. नय्यर ने सुद्धा कबुल केलं की बहुधा ह्या दोघांचा जन्म एक दुसरयासाठीच झाला असावा. दीदींच्या परदेशातल्या दौऱ्याच्या वेळी त्या मदनमोहनजीचं गाणं म्हणणार असं नुसतं जाहीर झालं तरी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि एव्हढ्या फर्माईशी येत की दौऱ्यावर त्यांना ह्या अधिक गाण्यांची रिहर्सल करावी लागे.
सकाळपासून वेगवेगळया ग्रुप्सवर मेसेज यायला सुरुवात झाल्यावर आज गुरुपौर्णिमा असल्याचं कळलं. त्या निमित्ताने आजवर भेटलेल्या सगळ्या शिक्षकांचं स्मरण करावं म्हणून बसले तर किती जण आठवले.

तसं पहायला गेलं तर चालायला आणि बोलायला शिकवणारा पहिला गुरु म्हणजे आईच. मग रूढार्थाने शिवाजीपार्कच्या समोर असलेल्या बालमोहनच्या छोट्या शाळेपासून माझं शिक्षण सुरु झालं. तिथे शिशुवर्गातल्या वासंतीताई आणि बालवर्गातल्या सुलभाताई आठवतात. पुढे मोठ्या शाळेत गेल्यावर पहिलीच्या शकुंतलाताई रांगणेकर, दुसरीच्या नर्मदाताई राजाध्यक्ष, तिसरीच्या प्रतिभाताई करंदीकर, चौथीच्या भारतीताई नवलकर, पाचवीच्या अनघाताई राजिवडेकर, सहावीच्या शैलाताई परळकर अश्या वर्गशिक्षिका आठवतात. दहावीला वर्गशिक्षिक मराठे सर होते. पण सातवी ते नववी च्या वर्गशिक्षिका नीट आठवत नाहीत हे अनाकलनीय आहे खरं. मराठीच्या खळेबाई, इंग्लिश-संस्कृत शिकवणाऱ्या कामतबाई, सायन्स आणि भूमिती घेणाऱ्या चौधरी बाई, ऑफ तासाला हॉरर गोष्टी सांगून आमची टरकावणारया शामाताई ह्यांच्यापैकी तिघी असणार हे नक्की. बाकीचे अनेक शिक्षक आठवले - गाण्याचे तास घेणाऱ्या दिपाताई आणि कुमुदताई (अजूनही अंबेचा जोगवा वाचला की त्यांची आठवण होते), छोटे आणि मोठे सावे सर, कार्यानुभव शिकवणारे एक सर (ह्यांचा चेहरा आठवतो पण दुर्दैवाने नाव काही केल्या आठवत नाहीये), फिजिकल ट्रेनिंगचे पापल सर, सविताताई, आणखी अजून एक उंच बाई होत्या (ह्याम्चाही चेहरा आठवतो पण नाव आठवत नाही), भूगोल शिकवणाऱ्या सावेबाई, हिंदीचे तास घेणाऱ्या परुळेकर बाई, मराठी शिकवणाऱ्या चौबळबाई, चौथीत असताना 'ही गोज, शी गोज' असं करतकरत इंग्लिशशी ओळख करून देणाऱ्या भटबाई, नाईक सर आणि नाईक बाई, हिंदीचे तास घेणाऱ्या किल्लेदार बाई, दसऱ्याला सुरेख अक्षरात फळ्यावर माहिती लिहिणारे दाभोळकरसर (हे गेल्याचं काही महिन्यांपूर्वी कळलं). शिवण हा प्रकार मला कधीच जमला नाही पण ते शिकवणाऱ्या दोन शिक्षिका मला अजूनही आठवतात. चित्रकला हा विषयसुध्दा नावडताच. त्यातून 'हैथोर, सुबेक' अश्या इजिप्शियन देवांबद्दल आम्हाला तेव्हा का शिकवत होते कोणास ठाऊक. पण ते शिकवणारे राजाध्यक्षसर होते. काही शिक्षक-शिक्षिकांना आम्ही दिलेली टोपणनावं आठवताहेत फक्त :-( दरवर्षी दसऱ्याला शाळेत जाते तेव्हा ह्यातलं कोणीतरी पुन्हा एकदा दिसावं असं नेहमी वाटतं.

शाळेच्या बाहेर क्लासेस् लावले होते त्यात सातवीच्या स्कॉलरशिपसाठी लावलेल्या क्लासचे रावलेसर, कोरगावकरसर आठवतात. नववी-दहावी साठी लावलेल्या आठ्यले क्लासचे गोडसेसर, मराठी शिकवणाऱ्या विजुताई पटवर्धन, आणखी एक बाई इंग्लिश शिकवायला होत्या त्यांचं नाव आठवत नाही, संस्कृत शिकवणारे आठल्येसर, गांधीसर आणि गांधीबाई. आठल्येसर गेले ते मला २-३ दिवसांनी कळलं. त्यांचं शेवटचं दर्शन घेता आलं नाही ही चुटपुट जन्मभर राहील. त्यांनी संस्कृतची खूप गोडी लावली होती. माझे किती पेपर्स त्यांनी न कंटाळता तपासले होते. अजूनही संस्कृत शिकावंसं वाटतं ह्याचं सारं श्रेय त्यांना.

पुढल्या काळात बारावीची तयारी करून घेणारे फिजिक्सचे पै सर, गणिताचे कारखानीससर आणि केमिस्ट्री शिकवणारे नाडकर्णीसर. रुपारेलला दोन वर्षं होते पण तिथले केमिस्ट्रीचे सोहोनी सर, चव्हाण सर, अल्जिब्रा शिकवणारया लोबो मॅडम आणि इलेक्ट्रॉनिकस शिकवणाऱ्या दोन मॅडम्स वगळता फारसं कोणी आठवत नाही. आठवीला जॉईन केलेल्या रेगे क्लासेस् मधलं तर कोणीच आठवत नाही. व्हीजेटीआयला मेकेनिक्स शिकवणारे जोशीसर, अय्यंगारसर, सिंगसर, कम्युनिकेशन्स शिकवणाऱ्या दोन मॅडम्स, इंजिनियरींग ड्रॉइंग शिकवणारे वेणूगोपाल सर असे काही शिक्षक अजून आठवतात. मजा अशी की लायब्ररीत बसलो आणि आमचा गलका खूप वाढला की तिथे काम करणाऱ्या एक मॅडम 'शेमलेस, टोटली शेमलेस' असं दटावायच्या हे अजून आठवतंय :-)  फॉर्मल शिक्षणाचा शेवटचा टप्पा अर्थात आय.एस.बी मधले सी. रंगराजन, भगवान चौधरी, मार्क फिन, कृष्ण कुमार.

अगदी अलीकडच्या काळातले गुरुवर्य म्हणजे स्पॅनिश शिकवणाऱ्या गजाला मॅडम आणि मोडी लिपी शिकवणारे राजेश खिलारी सर.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या सगळ्या शिक्षक-शिक्षिकांना मनापासून धन्यवाद. देव त्यांना आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो.