Wednesday, February 24, 2021

४. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२०)

 'भवताल' चा अंक वाचून संपवला आणि वाचनातली गोडी आटल्यासारखी झाली. अर्थात त्याचा त्या अंकाशी काही संबंध नाही हे सांगितलेलं बरं.  :-) रोजचं काम संपवून कधी एकदा पुस्तक / अंक हातात घेतो ह्याची वाट पहाणार्या मला पुस्तक डोळ्यांसमोर नको वाटायला लागलं. मग ठरवलं की काही दिवस पुस्तकांपासून दूर रहायचं. पॉडकास्टस ऐकण्यावर जास्त भर दिला. आणि मग एक दिवस अचानक परत पुस्तकांची ओढ लागली. मग कपाटातला त्यातल्या त्यात कमी जाडजूड अंक काढला तो लोकसत्ताचा. 

लहानपणापासून लोकसत्ता वाचायचा नाद होताच. पण सध्या काही वर्षांपासून देशात जे चाललंय त्यावर 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करण्यात भल्याभल्यांत अहमहमिका लागलेली असताना जे आहे त्यावर परखडपणे व्यक्त होणारा लोकसत्ता अजूनच आवडायला लागला. तर ते असो.

अंकातला पहिला लेख - प्रताप भानू मेहता ह्यांचा 'धर्म, राष्ट्रवाद आणि हिंसा' ह्या शीर्षकाचा - मोठ्या उत्सुकतेने वाचायला घेतला. सुरुवातीला कळला, पटला पण पुढेपुढे क्लिष्ट वाटत गेला. त्यामुळे फारसा भावला नाही. कदाचित ह्या विषयावरची माझी समज तोकडी असावी. किंवा एव्हढं शुध्द अनुवादित मराठी झेपलं नसावं :-) ह्या अनुभवाने सावध होऊन त्यापुढला 'तारखेचा न्याय' हा अ‍ॅड अभिनव चंद्रचूड ह्यांचा 'हेबिअस कॉर्पस' वरचा लेख भीतभीतच वाचायला घेतला. कारण हा शब्द आजवर फक्त वर्तमानपत्रांत वाचलाय. त्यातून कायदा वगैरे भाग एकूण न झेपणार्‍यातला. पण हा लेख समजला आणि आवडला देखील. हे  'हेबिअस कॉर्पस' प्रकरण आहे तरी काय ते प्रथम समजलं.

त्यापुढला लेख साहिर लुधियानवीचा 'देवेंद्र सत्यार्थी' या समकालीन कवीवरचा. हिंदी साहित्याचा आणि माझा संबंध इयत्ता सातवीनंतर तुटलेला. त्यामुळे ह्या कवीबद्दल काही माहिती असणं शक्यच नव्हतं. पण साहिरने रेखाटलेल्या ह्या सुंदर शब्दचित्राच्या निमित्ताने बंगाली कळत नाही म्हणून मूळ भाषेतून त्यातलं साहित्य वाचता येत नाही म्हणून उसासे टाकण्याऐवजी हिंदी बर्‍यापैकी कळतं तर त्यातलं साहित्य वाचायला हवं हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. आंतरराष्ट्रीय राजकारण हा आवडीचा विषय त्यामुळे 'अरबी वसंत आणि आफ्रिकेतील आग' हा गिरिश कुबेर ह्यांचा लेख जाम आवडला.

श्याम मनोहर ह्यांचं लेखन वाचलेलं नसलं तरी त्यांचं नाव ऐकून माहित. पण त्यांचा 'टीपः माझी मलाच सूचना' ही भलीमोठी कथा ना कळली, ना आवडली. मध्येमध्ये ते नेमकं कश्याबद्दल भाष्य करू इच्छित आहेत ह्याची पुसट कल्पना यायची. पण तरी मला ही कथा कळली असं म्हणता मात्र येणार नाही. गोल्डन एरामधली गाणी सर्वांना - अगदी पिढीचं अंतर ओलांडूनही - का आवडतात आणि गुणगुणावीशी वाटतात ह्याची मीमांसा करणारा डॉ. आशुतोष जावडेकरांचा 'कधी गीत कधी नाद' हा लेख वाचनीय आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणा इतकाच 'नाटक' हा दुसरा जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे सुहास जोशींचा 'आठवणींची स्मृतीचित्रे' हा लेख मन लावून वाचला. त्यात प्रतिमा कुलकर्णींनी स्मृतिचित्रांच्या तालमीच्या वेळेस केलेल्या एका प्रयोगाबद्दल त्या लिहितात. त्यात एखाद्या प्रसंगात महत्त्वाचं पात्र कोणतं ते ठरवून ती व्यक्ती जो आंगिक अभिनय करेल तसा करतानाच दुसर्‍या पात्राचे संवाद त्या पात्राच्या आवाजात म्हणायचे असा हा प्रयोग. मी हौशी नाटक करणर्या माझ्या एका मैत्रिणीला ह्याबद्दल व्हॉटसॅपवर लिहिलं तर तिचं लगेच उत्तर आलं की हे कुठल्या पुस्तकात वाचलंस.म्हटलं पुस्तक नाही लेख आहे. हे काम किती कठीण असेल ते वाचूनच लक्षात आलं. 'नाटक' ह्याच विषयावरचा 'राजा आणि अरुप रतन' ह्या रविंद्रनाथ टागोरांच्या नाटकावरचा प्रा. शरद देशपांडे ह्यांचा लेख मात्र फारसा आवडला नाही. कदाचित नाटकातले संवाद अनुवादित स्वरुपात दिले असल्याने असेल.

ह्यापुढला विभाग ग्रामीण भागातल्या लेखकांच्या लेखनाविषयीचा आहे. माझं मराठी वाचन अत्यंत तोकडं असल्याने ह्यातल्या एकाही लेखकाचं लिखाण मी वाचलं नसणार ह्यची मला खात्री होती. पण डॉ. दासू वैद्य, नवनाथ गोरे, सदानंद देशमुख ('बारोमास' हे ऐकलं तरी आहे हे त्यातल्या त्यात समाधान!), राजकुमार तांगडे ('शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' मात्र पाहिलंय!) आणि शिल्पा कांबळे ह्यांची ओळख तरी झाली. अर्थात हे एव्हढं वास्तववादी वाचणं अपने बसकी बात नही हे मला ठाऊक आहे. त्यामुळे 'भवताल जर इतका जीवघेणा आहे तर परत तेच वास्तवाच्या नावाखाली का लिहावं' हे शिल्पा कांबळे ह्यंचं मत वाचून मी मनातल्या मनात 'द्या टाळी' म्हटलं. :-)

मंगला नारळीकर ह्यांचा 'भागम भाग भागाकार' हा भागाकार सोपं करून सांगितलेला लेख छोट्यांसाठी असला तरी वाचला. :-)

बंगाली संस्कृतीबद्दल एक कमालीचं आकर्षण मी बाळगून आहे. कधीकाळी शांतीनिकेतनला जायची इच्छाही आहे. त्यामुळे 'सत्यजित रेंच्या शोधात...शांतीनिकेतनात' हा विजय पाडळकर ह्यांचा लेख उत्सुकतेने वाचला. रे शांतीनिकेतनला शिकायला होते हे मला माहित नव्हतं. 'हिंदी सिनेमा सज्ञान होतोय' हा रेखा देशपांडे ह्यांचा लेख व्यावसायिक आणि समांतर ह्या दोन्हीचा मिलाफ घडवून आणणारे चित्रपट सध्या कसे बनत आहेत ह्यावर प्रकाश टाकतो. 'प्रांजळ पं. रविशंकर' हा रमेश गंगोळी ह्यांचा लेख वाचनीय.

अंजली चिपलकट्टी ह्यांनी हायपेशिया ह्या प्राचीन इजिप्तमधल्या गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ स्त्रीबद्दल लिहिलेला लेख आवर्जून वाचण्याजोगा.

'वुहानमधले ते दिवस' ह्या लेखात अश्विनी पाटील ह्यांनी करोनाच्या भर उद्रेकाच्या काळात वुहानमध्ये अडकल्याच्या अनुभवावर लिहिलं आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट हे नाव निदान भारतात तरी सर्वांच्या परिचयाचं. भवतालच्या लेखात त्याच्या सद्य स्थितीवर लेख वाचल्याचंही स्मरतंय. पण हे हाफकिन मुळात होते कोण त्याची ओळख 'डाँ वाल्देमार हाफकिन' हा डॉ.सुलोचना गवांदे ह्यांचा छोटेखानी लेख करून देतो. प्रशांत कुलकर्णी ह्यांची व्यंगचित्रं आर्टीफिशल इंटेलिजन्सवर नेमकं भाष्य करतात.

ताप येऊन गेला की तोंडची चव परत आणायला मऊ दहीभात आणि लिंबाचं लोणचंच लागतं तसं माझी वाचनातली हरवलेली गोडी पुन्हा आणायला लोकसत्ताचा अंक लागला. थँक यू लोकसत्ता :-)