Wednesday, September 28, 2016

Notes for future trips:

सातारा ते भुईंज रस्त्यावर असलेल्या 'शेरी लिंब' गावातली शिवकालीन बारा मोटेची विहीर
उंदरांचं मंदिर, बिकानेरपासून ३० किमी अंतरावर असलेलं करणी माता मंदिर, राजस्थान
पक्ष्यांची सामुहिक आत्महत्या - जतिंगा, आसाम (सप्टेंबर, ऑक्टोबर)
मणिपूरचा तरंगत्या बेटांचा लोकतक तलाव
रुपकुंड तलाव, उत्तराखंड - नवव्या शतकातले ६०० मानवी सांगाडे
कुंभलगड किल्ला, राजस्थान - ३६ किमी भिंत आणि त्यातली जवळपास ३०० मंदिरं
कोलकत्यातल्या Botanical Garden मध्ये असलेलं २०० वर्षं जुनं वडाचं झाड
चुंबकीय टेकडी, लडाख
कोडीन्ही गांव केरळ - ३५० जुळ्यांचा जन्म
रामेश्वरमच्या पंबन बेटावरचे तरंगते दगड
चेरापुंजी, मेघालय मधले झाडांच्या मुळांचे पूल
लेपक्षी मंदिर, आंध्र प्रदेश मधला लटकत खांब
महाबलीपुरम, तमिलनाडू - झुलता दगड
बडा इमामबरा - लखनऊ, उत्तर प्रदेश (१८ व्या शतकात बांधलेला आणि एकही खांब नसलेला ५० मीटर रुंद राजदरबार)
बुलेट बाबा मंदिर, राजस्थान
मावलिंनॉग, मेघालय - आशियातलं सर्वात स्वच्छ गाव
तेर गावचं म्युझियम
Tso Moriri Wetland Conservation Reserve, Ladakh
Thenmala, Kerala

नापास मुलांची गोष्ट - अरुण शेवते

हे पुस्तक खरं तर लेखांचं एक संकलन आहे. ह्यातले बरेचसे लेख म्हणजे मान्यवरांनी लिहिलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी किंवा त्यांच्या आत्मचरित्रातले उतारे आहेत. ह्यातल्या आठवणीचे लेख वाचताना मजा येते कारण जुन्या काळातल्या अनेक गोष्टी आपल्याला समजतात. पण उतारे वाचताना बऱ्याचदा काही गोष्टींचा संदर्भ लागत नाही किंवा ते संपतात तेव्हा अस्थानी तोडल्यासारखे वाटतात.

बहुतेक लेखांचा सूर हा रूढार्थाने शिकवल्या जाणाऱ्या विषयांत गोडी नसल्याने शालेय जीवनात प्रगती करता आली नाही किंवा नापास व्हावं लागलं हा आहे. तो बऱ्याच अंशी बरोबर आहे. आपल्या इथे मुलांना आवडतील ते विषय शिकण्याची मुभा नाही. कधीकधी आवडता विषय नावडता करतील की काय असं वाटायला लावणारे शिक्षक असतात. नुसता पाठांतरावर भर असतो. पुस्तकं सोडून त्याच विषयांवरचं अवांतर ज्ञान मिळवायला प्रोत्साहन नाही. आणि शिकू त्याचा वापर कसा करायचा त्याचं प्रात्यक्षिक नाही. सगळा पुस्तकी घोकंपट्टीचा मामला. माझं शालेय जीवन म्हणजे भरपूर अभ्यास करायचा आणि शक्यतो पहिला, नाहीतर दुसरा तरी नक्कीच नंबर मिळवायचा. अर्थात त्याबद्दल अजिबात तक्रार नाही. मान मोडून अभ्यास करायची ही सवय अजूनही कामी येतेय. भाषा, इतिहास, जीवशास्त्र, बीजगणित आणि भूगोल हे आवडीचे विषय होते. पण नागरिकशास्त्र, भूमिती, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सोडून दुसरं शिकायची परवानगी असती तर मी ते विषय नक्की सोडले असते. त्याऐवजी बंगाली, एखादी विदेशी भाषा, पुरातत्त्वशास्त्र किंवा प्राचीन भारतीय संस्कृती/वेद असं काहीतरी मन लावून शिकले असते. चित्रकला, कार्यानुभव, शिवण हे विषय आम्हाला का होते हे कोडं आज अनेक वर्षं कायम आहे. असो. सांगायचा मुद्दा हा की ह्या पुस्तकातल्या अनेक लेखांत हाच राग आळवलाय. पण नापास झालो म्हणून उमेद गमवायची नाही हा संदेश खूप मोलाचा आहे. नापास होऊनही ह्या लोकांनी पुढे खूप प्रगती केली. शाळेत चमकलेली मुलं पुढे फारशी चमकतातच असं नाही हे जयंत साळगावकरांचं म्हणणं पटलं. गुलजार आठवीला उर्दूची परीक्षा नापास झाले होते ह्यावर माझा अजून विश्वास बसत नाहीये. शांता शेळकेंना गणितात पन्नासपैकी शून्य मार्क मिळाले होते त्यावर पान-दोन पानांचा लेख असेल पण वाचण्याजोगा आहे.

पण जन्मभर लक्षात राहतील असे काही लेख - एक लोकमान्य टिळकांवरचा. टिळकांनी लहान वयातच संस्कृतचा किती अभ्यास केला होता ते वाचून छाती दडपून जाते. दुसरा लेख ओग्युस्त रॉन्दे ह्या फ्रेंच शिल्पकारावरचा. त्याच्या आवडीच्या कामाचं शिक्षण देणाऱ्या 'पतित एकोल' ह्या संस्थेची प्रवेश परीक्षा त्याये तब्बल तीन वेळा दिली. तिन्ही वेळा नापास झाल्याने तिथे प्रवेश मिळण्याचा मार्ग बंद झाला पण म्हणून त्याने जिद्द सोडली नाही. आपल्या प्रतिभेच्या जोरावर तो त्याच क्षेत्रात नावारूपाला आला. Hats Off! सुशीलकुमार शिंदे ह्यांची जीवनकथाही अशीच विलक्षण आहे. बाकी दोन लेख नरेंद्र जाधव आणि लक्ष्मण माने ह्यांचे. ह्या तिघांनी प्रतिकूल परिस्थितीत काय सायासाने शिक्षण घेतलं ते वाचून थक्क व्हायला होतं. आणि हीच वेळ आपल्यावर आली असती तर आपण शिकण्यासाठी एव्हढी धडपड केली असती का हा प्रश्न स्वत:ला विचारल्याशिवाय राहवत नाही.

माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर

'कोसला' वाचून 'आपल्याला गंभीर लिखाण वाचणं जमतं आणि त्याने खूप दिवस त्रास होत नाही' असा थोडा धीर आला. अर्थात मनीचा मृत्यू, पाळलेल्या सश्याच्या पिल्लाचा मृत्यू अश्या काही गोष्टी सोडल्या तर त्यात फारसं दु:खद वगैरे काही नव्हतं. दु:खद प्रसंग वाचून फार दिवस डोक्याला त्रास होत नाही ही गोष्ट फारशी चांगली नाहीये (बहुतेक) पण आजच्या काळात जगण्यार्या लोकांसाठी गरजेची आहे. खरं तर रोजच्या पेपरात इतकं काही वाचायला लागतं की त्यामुळे हे असलं वाचायचा आपोआप सराव झाला असावा. हीसुद्धा फार चांगली गोष्ट नाहीये. पण त्यात फारसं काही करता येण्यासारखं नाही - रोजचा पेपर वाचायचं सोडणं ह्याखेरीज. अर्थात मला 'कोसला' संपूर्णपणे (किंवा कदाचित काहीच) कळली नाही ही खंत आहेच. पण मित्रमंडळींत कोणी वाचलं आहे हे शोधून काढून त्याबद्दल चर्चा वगैरे करायचा उत्साह नाहीये. निदान सध्या तरी. :-(

'कोसला' परत केलं आणि 'माणदेशी माणसं' घेऊन आले. ह्यातही कोणाकोणाच्या नशिबाच्या चित्तरकथा असणार हे उघड होतं. पण एकदा मुसळात डोकं घातलं की ते मागे म्हणून घ्यायचं नाही हा (मराठी वगैरे!) बाणा. प्रत्येक वेळी हे असंच म्हणत बसले तर चांगली पुस्तकं कधी वाचताच यायची नाहीत. 'धर्मा रामोशी' वाचतानाच परत एकदा वाटून गेलं की ह्यापेक्षा एखादं fiction आणलं असतं तर डोक्याला मुंग्या लागल्या नसत्या. पण आता जे आहे ते आहे. नेटाने वाचत राहिले. आणि माडगूळकरांना भेटलेली अनेक माणसं मलासुध्दा भेटली.

त्यात रस्त्यावरचे मैलाचे दगड रंगवणारा रामा मैलकुली होता. मास्तरकीपेक्षा तमाश्यातली ढोलकी वाजवायला आवडते म्हणून सरकारी नोकरी सोडणारा नामा मास्तर होता. मोहापायी दरोडा घालण्यात मदत करून अक्षरश: आयुष्यातून उठलेला शिवा माळी होता. गरीब म्हणून चुलता राबवून घेत असलेला मुलाण्याचा साधासरळ बकस होता. नवर्याने सवत आणून उरावर बसवली म्हणून मानाने घरातून बाहेर पडून स्वत:चा चरितार्थ स्वत: चालवत शेजारी असलेल्या पोरांना माया लावणारी तांबोळ्याची खाला, लग्न करून ओढगस्तीच्या संसारात अडकलेला रघू कारकून, केवळ दु:ख भोगायलाच जन्माला आलेला बिटाकाका, 'कापं गेली आणि भोकं राहिली' अशी गत झालेले बन्याबापू - 'जवापाडे' म्हणावं इतकंही सुख वाट्याला न आलेली ही माणसं पाहून जीव धसकतो. 'मागच्या जन्मीचं पाप', 'कर्म' वगैरेवरचा माझा विश्वास अलीकडे उडालाय. ह्या विश्वाचा पसारा मांडणारा कोणी असलाच तर सध्या तरी त्याने हा पसारा 'रामभरोसे' सोडलाय. 'कुणामुखी पडते लोणी कुणामुखी अंगार' हे शब्दश: खरं आहे आणि त्यात कसलेही नियम किंवा कायदेकानू नाहीत. किंवा कधी काळी असलेच तर त्यांची एक्स्पायरी डेट पार झाली आहे. हे आयुष्य चांगलं मिळालंय पण पुढला जन्म असलाच तर तो असाही मिळू शकतो. त्यामुळे दुसऱ्याचं हे दु:ख 'शीतळ' न होता अधिक अंगावर येतं. बेचैन करतं. मग ते १-२ दिवसांपुरतं का होईना.

खूप वेळ एका जागी बसून राहिल्याने बधीर झालेल्या पायात पुन्हा एकदा शक्ती आली की जीवात जीव यावा तसं माझं झालंय. ' डोक्याला त्रास नको' पासून सुरु झालेला प्रवास 'अजूनही आपल्याला त्रास होऊ शकतो' ह्या आश्चर्यापर्यत येऊन ठेपला आहे हेही नसे थोडके.