Wednesday, September 28, 2016

माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर

'कोसला' वाचून 'आपल्याला गंभीर लिखाण वाचणं जमतं आणि त्याने खूप दिवस त्रास होत नाही' असा थोडा धीर आला. अर्थात मनीचा मृत्यू, पाळलेल्या सश्याच्या पिल्लाचा मृत्यू अश्या काही गोष्टी सोडल्या तर त्यात फारसं दु:खद वगैरे काही नव्हतं. दु:खद प्रसंग वाचून फार दिवस डोक्याला त्रास होत नाही ही गोष्ट फारशी चांगली नाहीये (बहुतेक) पण आजच्या काळात जगण्यार्या लोकांसाठी गरजेची आहे. खरं तर रोजच्या पेपरात इतकं काही वाचायला लागतं की त्यामुळे हे असलं वाचायचा आपोआप सराव झाला असावा. हीसुद्धा फार चांगली गोष्ट नाहीये. पण त्यात फारसं काही करता येण्यासारखं नाही - रोजचा पेपर वाचायचं सोडणं ह्याखेरीज. अर्थात मला 'कोसला' संपूर्णपणे (किंवा कदाचित काहीच) कळली नाही ही खंत आहेच. पण मित्रमंडळींत कोणी वाचलं आहे हे शोधून काढून त्याबद्दल चर्चा वगैरे करायचा उत्साह नाहीये. निदान सध्या तरी. :-(

'कोसला' परत केलं आणि 'माणदेशी माणसं' घेऊन आले. ह्यातही कोणाकोणाच्या नशिबाच्या चित्तरकथा असणार हे उघड होतं. पण एकदा मुसळात डोकं घातलं की ते मागे म्हणून घ्यायचं नाही हा (मराठी वगैरे!) बाणा. प्रत्येक वेळी हे असंच म्हणत बसले तर चांगली पुस्तकं कधी वाचताच यायची नाहीत. 'धर्मा रामोशी' वाचतानाच परत एकदा वाटून गेलं की ह्यापेक्षा एखादं fiction आणलं असतं तर डोक्याला मुंग्या लागल्या नसत्या. पण आता जे आहे ते आहे. नेटाने वाचत राहिले. आणि माडगूळकरांना भेटलेली अनेक माणसं मलासुध्दा भेटली.

त्यात रस्त्यावरचे मैलाचे दगड रंगवणारा रामा मैलकुली होता. मास्तरकीपेक्षा तमाश्यातली ढोलकी वाजवायला आवडते म्हणून सरकारी नोकरी सोडणारा नामा मास्तर होता. मोहापायी दरोडा घालण्यात मदत करून अक्षरश: आयुष्यातून उठलेला शिवा माळी होता. गरीब म्हणून चुलता राबवून घेत असलेला मुलाण्याचा साधासरळ बकस होता. नवर्याने सवत आणून उरावर बसवली म्हणून मानाने घरातून बाहेर पडून स्वत:चा चरितार्थ स्वत: चालवत शेजारी असलेल्या पोरांना माया लावणारी तांबोळ्याची खाला, लग्न करून ओढगस्तीच्या संसारात अडकलेला रघू कारकून, केवळ दु:ख भोगायलाच जन्माला आलेला बिटाकाका, 'कापं गेली आणि भोकं राहिली' अशी गत झालेले बन्याबापू - 'जवापाडे' म्हणावं इतकंही सुख वाट्याला न आलेली ही माणसं पाहून जीव धसकतो. 'मागच्या जन्मीचं पाप', 'कर्म' वगैरेवरचा माझा विश्वास अलीकडे उडालाय. ह्या विश्वाचा पसारा मांडणारा कोणी असलाच तर सध्या तरी त्याने हा पसारा 'रामभरोसे' सोडलाय. 'कुणामुखी पडते लोणी कुणामुखी अंगार' हे शब्दश: खरं आहे आणि त्यात कसलेही नियम किंवा कायदेकानू नाहीत. किंवा कधी काळी असलेच तर त्यांची एक्स्पायरी डेट पार झाली आहे. हे आयुष्य चांगलं मिळालंय पण पुढला जन्म असलाच तर तो असाही मिळू शकतो. त्यामुळे दुसऱ्याचं हे दु:ख 'शीतळ' न होता अधिक अंगावर येतं. बेचैन करतं. मग ते १-२ दिवसांपुरतं का होईना.

खूप वेळ एका जागी बसून राहिल्याने बधीर झालेल्या पायात पुन्हा एकदा शक्ती आली की जीवात जीव यावा तसं माझं झालंय. ' डोक्याला त्रास नको' पासून सुरु झालेला प्रवास 'अजूनही आपल्याला त्रास होऊ शकतो' ह्या आश्चर्यापर्यत येऊन ठेपला आहे हेही नसे थोडके. 

No comments: