Sunday, November 28, 2021

१. लोकप्रभा (दिवाळी अंक २०२१) (किंमत ५० रुपये)

 ह्या वर्षी दिवाळीच्या आधीच मॅजेस्टिकमध्ये चक्कर टाकून अंकांची चवड घेऊन आले. ऐन दिवाळीत तिथलया गर्दीत शिरून करोनाचा प्रसाद घेऊन यायची माझी इच्छा नव्हती :-)

खरं तर लोकप्रभाचा अंक वाचून काही आठवडे झालेत. आज लिहू उद्या लिहू म्हणत म्हणत लिहायचा मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी आज लागला. पण गोची अशी आहे की काही लेख नेमके कश्याबद्दल होते तेच मुळात आठवत नाही. उदा. विनायक परब ह्यांचा अगदी पहिला लेख 'व्वा! चितारताना'. कोल्हापूर परंपरेतले प्रसिद्ध चित्रकार, त्यांची पेंटिंग्ज, शैली आदिवर ह्यात माहिती होती एव्हढं आठवतंय. पण चित्रकलेचं आणि माझं सूत कधी जुळलंच नसल्याने असेल कदाचित पण ह्या लेखात भरपूर माहिती असूनही फार काही लक्षात राहिलेलं नाही. अर्थात हा दोष सर्वस्वी माझाच. 

एव्हढ्या तेव्हढ्या कारणाने भावना दुखावलया जाण्याच्या ह्या काळात शमिका वृषाली ह्यांचा 'शृंगारप्रेमी महाराष्ट्र' हा लेख तथाकथित संस्कृतीरक्षकांना फेफरं, झीट वगैरे सर्व काही आणेल असाच. महाराष्ट्रातला समाज ह्याबाबतीत किती मोकळाढाकळा होता हे वाचून आश्चर्य तर वाटतंच पण खेदही वाटतो. हा मोकळेपणा लोप पावल्याने तर आजकाल स्त्रियांशी निगडित गुन्हयांत वाढ होत नसेल ना हा प्रश्न मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. 'प्रतिकारशक्तीची खाण' हा डॉ. अंजली कुलकर्णी ह्यांचा मानवी शरीराच्या आश्रयाने राहणाऱ्या सूक्ष्म जीवांवरचा लेख उद्बोधक. "पन्नालाल घोष" हे नाव मी फक्त ऐकून होते. पण त्यांनी केलेल्या कामाचं उत्तम दस्तावेजीकरण करण्यासाठी काय भगीरथ प्रयत्न करावे लागले ह्यावरचा विश्वास कुलकर्णी ह्यांचा लेख खिन्न करून गेला. आपल्याकडे कुठल्याही वारश्याचं जतन करण्याबाबत भयानक अनास्था आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. संस्कृती, इतिहास वगैरे गोष्टी निवडणूक जिंकण्यापुरत्या वापरायच्या. बाकी त्याचं जतन वगैरे करायचं तर फार मेहनत लागते. ती करतो कोण?

अफगाणिस्तानमधून अमेरिकी फौजा बाहेर पडल्या तेव्हा आलेल्या अनेक लेखांपैकी कुठल्याश्या लेखात 'बचा पोष' बद्द्ल वाचल्याचं आठवतंय. ज्या घरात मुलगा नाही तिथे मुलीलाच मुलाचा पोशाख देऊन मुलासारखं वाढवायची ही प्रथा. पण त्याला असलेले अनेक कंगोरे 'बचा पोष' ही प्राजक्ता पाडगांवकर ह्यांची छोटेखानी कथा उलगडते. त्या मानाने 'लिव्ह इन' ही सरिता बांदेकर ह्यांची कथा अगदी बेतलेली आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटली. 'तुम्हां कोण म्हणे दुर्बळ बिचारे' ही डॉ. संजीव कुलकर्णी ह्यांची कथा एकेकाळी कपोलकल्पित वाटली असती. पण सध्याच्या काळात मात्र ती अशक्य वाटत नाही. आपण निसर्गातले सगळ्यात बुद्धिमान प्राणी हा माणसाचा अहंकार एव्हढ्याश्या करोनाने उतरवला आहेच. त्यातूनही आपण शिकलो नाही तर इतर जीवही आपल्याला धक्का देऊ शकतील ह्यात वादाचा मुद्दा नाही. 

'यक्षनगरीतली शृंगारपुरे' हा आशुतोष उकिडवे ह्यांचा देशोदेशींच्या निवासी हॉटेल्सवरचा आणि 'गुहाघरे' हा संदीप नलावडे ह्यांचा अजूनही आदिमानवाप्रमाणे गुहेत राहाणाऱ्या लोकांविषयीचा दोन्ही लेख मनोरंजक. प्रवासवर्णनांचा खजिना (मकरंद जोशी), 'छू मंतर' (उज्ज्वला दळवी) आणि रमे तेथे मन  (विजया जांगळे) माहितीपूर्ण.