Saturday, March 27, 2021

७. किल्ला (दिवाळी अंक २०२०)

 मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकांतसुध्दा मेल्या करोनाने शिरकाव केला. त्यामुळे 'किल्ला' ची प्रस्तावना वाचताना मनात धाकधूक होती. पण त्यात करोनाचा 'क' पण नसल्याचं पाहून हायसं वाटलं. एव्हढंच काय तर 'आरमार' ह्या विषयावर हा अंक आहे हे वाचून काय काय लेख आहेत हे चाळून बघायचा मोह झाला. कळवण्यास अत्यंत आनंद वाटतो की 'मराठा आरमार' ह्या विषयावर इत्यंभूत माहिती देणार्या आणि अधिक अभ्यास करण्यास मार्गदर्शक ठरतील अश्या लेखांची अगदी भरगच्च मेजवानी अंकात आहे. फक्त वाचणारे डोळे हवेत.

अंकाची सुरुवात झालेय ती 'प्राचीन भारतीय आरमार' वरच्या लेखाने. सध्याच्या काळात 'प्राचीन' आणि 'भारत' हे शब्द एकत्र वाचले की पोटात गोळा येतो. जुनं ते सगळं सोनं नसतं. तरी ते रेटून सोनं ठरवायचा आणि नसलेली झळाळी त्याला द्यायचा ट्रेंडच आलाय ना. असो. पण हा लेख अपवाद. लोथल, हरप्पा आणि सिंधुसंस्कृतीतल्या भागांतल्या उत्खननांत सापडलेल्या नौकानयन क्षेत्रातल्या गोष्टींबद्दल, तसंच मौर्य, शिलाहार राजे तसंच राजा भोज यांच्या काळातल्या आरमाराबद्दल, त्यावरच्या ग्रंथांबद्दलही ह्यात बरीच माहिती मिळते.

ह्यापुढल्या लेखांत छत्रपती शिवाजीमहाराजांचे आरमार, त्यांनी बांधलेले जलदुर्ग, ह्या जलदुर्गांवरचे तोफखाने, सरखेल कान्होजी आंग्रे, ह्या काळातली नाणी, मराठा आरमारातली विविध प्रकारची जहाजं आणि त्यांची बांधणी अश्या विविध विषयांवरची माहिती आहे. हे सगळं वाचून वाचकांना ह्या विषयावर अधिक वाचण्याचा मोह होणार हे जाणून की काय कोणास ठाऊक पण ह्या विषयावर अधिक अभ्यास कसा करावा ह्याचं मौलिक मार्गदर्शन करणारा कौस्तुभ पोंक्षेंचा 'मराठा आरमार आणि संशोधन' हा लेखही अंकात समाविष्ट आहे.  कधीकाळी वेळ मिळालाच तर मोडीचा अभ्यास नव्याने करून ह्या विषयात काही हातभार लावता येतो का ते पहायचं असा शेखचिल्ली बेत करायचा मोह मलाही झालाच :-)

आधुनिक भारतीय आरमाराची माहिती देणार्या लेखाने अंकाची सांगता झाली आणि बुध्दीला खुराक देणारं काहीतरी छान वाचल्याचं समाधान मिळालं.