Saturday, February 10, 2024

८. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ३००)

ह्या वर्षीच्या 'ऋतुरंग' च्या अंकाचा विषय 'आपलं माणूस'. ह्यावर आधारित भरपूर लेख अंकात आहेत. पैकी मला गुलजार, जावेद अख्तर, दिलीप माजगावकर, विश्वास पाटील, शुभदा चौकर, समीर गायकवाड आणि प्रगती बाणखेले ह्यांनी लिहिलेले लेख खास आवडले. 'त्रिमूर्ती' ह्या सदरात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावरील लेख आहेत पण त्यातून फारसं नवं हाती लागलं नाही. 'सातासमुद्रापलीकडे' ह्या सदरात परदेशी लोकांशी झालेल्या मैत्रीवर अनेक लेख आहेत. आजच्या काळात धर्मावरून, जातीवरून, भाषेवरून देशादेशात आणि देशांतर्गत चाललेल्या भांडणांच्या बातम्या वाचून जीव विटलेला असताना हे लेख धीर देतात, अजूनही आशा आहे हा विश्वास देतात. अंकात जागोजागी असलेली रेखाटने उत्तम. 

7. भवताल (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ३००)

डोळे झाकून दरवर्षी घ्यावेत अश्या मोजक्या दिवाळी अंकांपैकी एक म्हणजे भवताल. प्रत्येक अंकात एका वेगळ्या विषयावर खूप मनोरंजक माहिती मिळते. खरं तर आता मला आधीच्या वर्षीचे अंक जपून न ठेवल्याचा खूप पश्चात्ताप होतोय.

असो. तर ह्या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय आहे - माळराने. प्रवासात आपण सगळेच अश्या जागा बघतो जिथे मोठमोठे वृक्ष नसतात की हिरवीगार कुरणं नसतात. आपल्या नजरेला काही खुरटी झुडपं, गवत असं काहीबाही दिसतं आणि मग वाटून जातं की अरे इथे झाडं लावायला पाहिजेत. पण ही विचारसरणीच मुळात कशी चुकीची आहे हे हा अंक आपल्याला समजावून देतो. कारण अश्या ओसाड पडीक वाटणाऱ्या जागेची आपली म्हणून एक परिसंस्था, एक इकोसिस्टिम असते. खुरट्या वाटणाऱ्या झाडाची आपली वैशिष्टयं असतात. 'गवत' अश्या सामान्य नावाने बोळवण केली तरी त्यात नानाविध प्रकार असतात जे पट्टीच्या वनस्पतीशास्त्रतज्ज्ञालासुद्धा घाम फोडू शकतात. इथे ह्यासोबत नांदणारी आपली म्हणून एक जीवसृष्टी असते. हे सगळं लक्षात न घेता सगळं काही 'सुजलाम सुफलाम' करण्याच्या प्रयत्नात आपण पर्यावरणाची किती भरून न येणारी हानी करू शकतो ते हा अंक वाचून आपल्या लक्षात येतं. 

अंकात माळरानांशी संबंधित अनेक विषयावर लेख आहेत - जगात आढळणारे गवताळ प्रदेश, आपल्या महाराष्ट्रातले गवताळ प्रदेश,माणसाच्या उत्क्रान्तीचा, विकासाचा आणि माळरानाचा संबंध, माळरानांवर पडलेला विविध काळातल्या राजसत्तांचा प्रभाव, विदर्भातली माळराने, गायराने, राखणरानाची पद्धत, माळरानावर आढळणारे विविध प्राणी, वनस्पती, गवताच्या अनेक प्रजाती, माळरानाशी घट्ट नाळ जोडून असलेले धनगर, नंदगवळी हे समाज, धुळ्यातल्या कुरणांच्या पुनरूज्जीवनाची गोष्ट, हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीकाठच्या गावात गवताचं पीक घेणाऱ्या १२ गावांची गोष्ट, चारा नियोजन, डेक्कन कॉन्झर्व्हेशन फाउंडेशन, दख्खनच्या पठारावरील लांडगे आणि बिबटे, गवताळ प्रदेशांचे संवर्धन आणि माळरानं सुधारण्याचा पुणे जिल्ह्यातल्या केंदूर इथला प्रयोग. एकदा अंक हाती घेतला की खाली ठेवणं कठीण. ह्या वर्षीपासून हे अंक जपून ठेवायचे का असा मी सिरियसली विचार करते आहे. मागल्या सगळ्या वर्षीचे अंक मिळतात का तेही पाहायला हवं. 

आणि हो, 'भवताल इकोटूर्स' आणि 'भवताल' च्या अन्य उपक्रमांची माहिती हवी असल्यास ९५४५३५०८६२ ह्या क्रमांकावर 'Bhavatal updates' असा मेसेज पाठवा किंवा bhavatal@gmail.com वर ईमेल करा.