Thursday, February 11, 2016

जरुरी नही कि सजदे हो हर वक्त और उसमे खुदाका नाम आये
जिंदगी तो खुद ही एक इबादत है, शर्त है कि ये किसीके काम आये

(Forwarded)

6. लोकमत दीपोत्सव २०१५

ह्या वर्षी आत्तापर्यंत वाचलेल्या सगळ्या दिवाळी अंकांनी मनोरंजन केलं, सुरेख माहिती दिली. पण डोक्याला भुंगा लावणारं, कधीही न पाहिलेलं/ऐकलेलं/वाचलेलं असं त्यांच्यात फार काही नव्हतं. ही उणीव दीपोत्सवने भरून काढली.

अंकाची सुरुवातच झाली एन. आर. नारायण मूर्ती ह्यांच्या मुलाखतीने. इन्फोसिसच्या जन्माची कथा नवीन नाही, निदान आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कोणासाठी तरी नक्कीच नाही. पण ह्या मुलाखतीतून मूर्ती ह्यांची विचारसरणी आपल्यासमोर उलगडत जाते जी फक्त इन्फोसिस किंवा आयटी क्षेत्रापुरती मर्यादित नाही. वानगीदाखल काही भाग पहा:

आर्थिक असो, बौद्धिक असो किंवा भावनिक, आपण आपल्या हयातीत जी संपत्ती निर्माण करतो तिचे आपण फक्त हंगामी खजिनदार असतो असं मी मानतो. आयुष्यभर आपल्याला जी सावली देतात त्यातली किती झाडं आपण लावलेली असतात? ज्याची सावली आपल्याला मिळणार नाही असं एकतरी झाड लावणं म्हणजे हे खजिनदार पद चोख निभावण.

राजकारण-समाजकारण-उद्योग व्यवसाय असो वा व्यक्तिगत कुटुंबजीवन,वयानुसार क्षमता क्षीण झालेल्याम्नी निर्णयप्रक्रियेच्या अग्रस्थानी असू नये असं माझं मत आहे. त्यांनी निर्णय घेणाऱ्यांना मदत करावी, सल्ला द्यावा पण भविष्याचा निवाडा करू नये.

दारिद्र्याचं निर्मुलन ही सरकारची जबाबदारी नाही. रोजगारनिर्मिती ही देखील एका अर्थाने पूर्णत: सरकारची जबाबदारी नाही. उद्योगस्नेही वातावरण तयार करून ते कायम राखणं आणि न्याय्य मार्गाने व्यवसाय वाढवून अधिकाधिक रोजगारनिर्मिती उद्योगधंद्यांना प्रोत्साहित करणं ही सरकारची जबाबदारी आहे.

गरिबी, अभाव ही आर्थिक अवस्था आहे. ती आर्थिक मार्गानेच बदलता येते. या अवस्थेला अकारण मूल्यांचा मुलामा लावून अभावात समाधान मानण्याची संस्कृती तयार करणं हा समाजवाद नव्हे. ही फसवणूक झाली.

मूर्ती आणि दिवंगत माजी राष्ट्रपती कलाम ह्यांचं एक कारावान घेऊन देशभर फिरत वाटेत दिसेल त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारायचा प्लान प्रत्यक्षात आला असता तर किती विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं असं वाटल्यावाचून राहिलं नाही. :-(

असाच सुरेख लेख लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन ह्यांच्या मुलाखतीचा. राजकारणात विरोधकांचे कौतुक करण्याचा कालखंड जणू समाप्त झाला आहे, संसदीय कामकाज पध्दतीत लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडायला जो अभ्यास करावा लागतो त्यासाठी मेहनत करायची ज्यांची तयारी नसते ते सदस्य सभागृहात गोंधळ, गदारोळ असे मार्ग अनुसरतात आणि लोक ज्या दिवशी खासदारांना जाब विचारतील तेव्हा संसदीय कामकाजात गांभीर्य येईल हे त्यांचं म्हणणं एकदम पटलं.

स्मार्ट सिटीबद्दल आजकाल बरंच बोललं आणि लिहिलं जातंय. पण हे प्रकरण नक्की काय आहे ते 'तेल अवीव' वरचा अपर्णा वेलणकर ह्यांचा लेख वाचून समजतं. आपल्याला खरोखर स्मार्ट सिटीज उभ्या करायच्या असतील तर किती मजल मारायची आहे हे सरकारला माहीत आहे की नाही ह्याची शंका हा लेख वाचून येते. लेखिकेने नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवल्या आहेत हेही महत्त्वाचं.

आर-पार ह्या मालिकेतल्या तिन्ही लेखांनी देशांच्या सीमा, त्याचे वाद आणि ह्या वादांत सामान्य माणसांचे होणारे हाल माझ्यापर्यंत आणून सोडले. ह्यात ३१ जुलै २०१५ ला भारत- बांगलादेश ह्यांच्या सीमा बदलल्यामुळे ज्यांची आयुष्यं बदलली त्या चंदननगर, महुरीपार आणि बिलोनिया सारख्या कधी न ऐकलेल्या गावांबद्दल, म्यानमार मधल्या रोहिंग्याच्या समस्येबद्दल आणि सिरीया, इराक, लिबिया तून मिळेल त्या मार्गाने युरोपात निघालेल्या माणसांबद्दल वाचून खरोखर हतबुद्ध व्हायला होतं. माणसांना असंही जगावं लागतं? ह्याला जगणं म्हणतात? आणि इथे एक गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण आदळआपट करतो, त्रागा करतो ह्याची लाज वाटायला लागली.

'दोजोपा पुली रोऊ वा' (प्रत्येकाने फक्त दोन झाडं लावा - एक स्वत:साठी, एक दुसर्यासाठी) हा ब्रह्मपुत्रेच्या ओसाड बेटांवर एकट्याने ३५ वर्षं खपून हजारो एकर जंगल उभं करणाऱ्या जादव पायेंगवरचा लेख म्हणजे ह्या अंकाचा हायलाईट आहे. रूढार्थाने जास्त न शिकलेल्या माणसाचे एकेक विचार ऐकून मी तर त्याला सलाम केला. वानगीदाखल काही इथे देते:

मुझे लगापेड नही रहे तो होम (हम) भी एक दिन ऐसे ही मोर (मर) जायेंगे. उसी दिन सोचा मै लोगाउन्गा पेड

पैसा क्यो लागे? जीआय थाकीबोलोय पैसा दोरका नाय (कशाला पाहिजे पैसा? जगायला पैश्याची गरजच नाही)

क्या जरुरत है गव्हर्नमेंट के हेल्प की? पेड ओपने आप बोढते है, बीज देते है, नदी,हवा,पानी, जानवर, पोखी (पंछी) बीज फैलाते है, हमे तो सिर्फ बचे बीज सोही जगे पे लगाने है. पैसा कहा लोगता है?

जानवर से क्या डरना? वो ओदमी को कुछ नही कोरते. डोरना तो आदमी से चाहिये. सोब से बोडा राक्षस. सोब की खा जाता है. पेड, जानवर, पैसा, प्रोकृती....किसी को नही छोडता.

माजुली बेटावर झाडं लावायचा त्यांचा मानस ऐकून मुलाखतकराने विचारलं की वैज्ञानिकांच्या मते तर ते बेत काही वर्षांनी नष्ट होणार आहे मग कशाला लावायची झाडं? त्यावर ते म्हणाले झाडं लावल्याने जमिनीची धूप कमी होईल, बेट नष्ट व्हायला जास्त वेळ लागेल. आणि समजा ते ब्रह्मपुत्रा नदीने नष्ट केलं तरी झाडांच्या बिया ती सोबत नेणार नाही, कुठेतरी रुजवेल हे नक्की. तिथे जंगल उभं राहिलंच की. प्रोकृत्ती कोई भी काम गोलत नही कोरती

त्यांनी लावलेल्या जंगलामुळे हत्ती आले आणि त्यांनी गावाचं नुकसान केलं म्हणून चिडलेल्या गावकऱ्यांनी आग लावून ५५० हेक्टरपैकी २०० हेक्टर जंगल पेटवून नष्ट केलं त्यावर हा माणूस त्यांना काय म्हणाला माहीत आहे? 'तुम्हारा कॉम तुमने कॉर दिया. मेरा कॉम मै करूंगा. जिमोन दिन जियाय थकीम,शिमन दिन गसकं रुई जाम (जब तक जान है, पेड लागते रहूंगा).

असे आणखी जादव पायेंग हवेत भारताला.

अशीच काही वेगळी दुनिया दाखवली 'तो, ती आणि त्या' ह्या मालिकेने. 'बिदेसिया' हा नोकरीधंद्यासाठी घर सोडून दुसरीकडे रहावं लागलेल्या पुरूषांवरचा, 'मुलं पिकवणारं शेत' हा आनंद मधल्या सरोगसी सेंटर्स वरचा आणि 'त्या दोघींचं लग्न' हा एका भारतीय लेस्बियन मुलीच्या आईने लिहिलेला असे तिन्ही  लेख डोळे सताड उघडून गेले.

अजून खास आवडलेले लेख म्हणजे 'श्वास' हा हरिप्रसाद चौरसीया ह्यांचा, कंगना राणावत हिचा 'जो है सो है', सनी लिओन वरचा 'ती मी नव्हेच', 'दंगल' हा हरियाणाच्या कुस्ती खेळणाऱ्या फोगट बहिणी आणि त्यांच्या अफलातून वडिलांवरचा. बाजीराव बद्दलची ररणवीर सिंगची मुलाखत उत्साहाने वाचायला घेतली. म्हटलं चित्रपट निर्मिती, त्याची भूमिका ह्याबद्दल विस्ताराने वाचायला मिळेल. पण प्रत्यक्षात लेख सुरु होता होताच संपल्यासारखा वाटला. :-(

२०१६ च्या दिवाळीत विकत घ्यायच्या अंकांत दीपोत्सवचं नाव आहे हे वेगळं सांगायला नकोच.

For the Siachen martyrs

I was among those who prayed for Lance Naik Hanumanthappa to emerge unscathed through his ordeal. But it was not meant to be :-( May God rest the souls of all 10 martyrs in peace.

Sunday, February 7, 2016

Nothing haunts us like the things we don't say

-- Mitch Albom

५. किल्ला - दिवाळी अंक २०१५

ह्या अंकाचं मुखपृष्ठ एव्हढं देखणं आहे की पाहताक्षणी मला ते आवडलं आणि अंकांत काय आहे हे पाहायची उत्सुकता लागली. तुम्ही म्हणाल एव्हढं काय आहे मुखपृष्ठात? तर हरिहर गडाच्या जवळपास ९० अंशात असलेल्या पायर्या आणि त्या मुखपृष्ठाच्या जेव्हढ्या भागावर आहेत तेव्हढाच भाग खरखरीत केलेला. जणू काय आपण त्या कातळाला, फत्तरालाच स्पर्श करतोय. क्या बात है!

सुदैवाने आतल्या मजकुराने मला बिलकुल निराश केलं नाही. सर्व लेख उत्तम - गडकोटावरील देवदेवता, कंधार - राष्ट्रकुटांचा भुईकोट, अष्टप्रधान (शिवाजीराजांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती), आंध्रातल्या श्रीशैलम जवळील शिवस्मारकाची ओळख करुन देणारा विश्वास पाटील ह्यांचा लेख, मंगळवेढ्याच्या किल्ल्याबद्दलचा गोपाळराव देशमुख ह्यांचा लेख, नकाशाद्वारे दुर्गवेध, निसर्गदुर्ग हा सीमंतिनी नुलकर ह्यांचा पक्षी-प्राणी ह्यांच्या रहाण्याच्या जागांवरील लेख, दुर्गप्रतिमा ह्या नव्याकोऱ्या सदरातली किल्ले वेताळगडाचे फोटो - सर्व अगदी सुरेख. नगरधन (नागपूरजवळील किल्ला), पाणीमहाल (उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला) आणि किल्ले जिंजीबद्दल वाचून केवळ हेच नव्हे तर (निदान!) महाराष्ट्रातील तरी शक्य होतील तेव्हढे किल्ले पहावेत असं मनाने घेतलं आहे. पाहू कसं जमतंय. "दुर्गरंग" सदरातली रायगडाची चित्रं मस्त आहेत. असलं काही कसब आपल्या हाती नाही ह्याचं थोडं वैषम्य वाटलंच. :-( 'अगडबंब तोफा' ह्या लेखातल्या भीमकाय तोफा पाहून छाती दडपलीच.

खटकला तो एकच लेख - 'दगडांच्या देशा' हा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ह्यांचा. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची दुरवस्था सर्वज्ञात आहे. पण त्याबद्दल काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी नुसतं समिती स्थापायचं काम सरकारने केलंय हे वाचून काही फारसं बरं वाटलं नाही. ह्या असल्या समित्यांकडून काय, कसं आणि किती काम होतं हे वेगळं सांगायला नको. त्यातून आजच वसईनजीकच्या खारबांव किल्ल्याबद्दल वाचलं. निदान ही समिती तरी सुखद अपेक्षाभंग करेल अशी अपेक्षा करावी का?

हा अंक वाचून झाला तरी रद्दीत द्यायला मन होत नाहीये, मी तो संग्रही ठेवणार आहे. ह्या वर्षी पेपरवाल्याला दिवाळी सुरु व्हायच्या आधीच हा अंक आणून दे म्हणून सांगणार. नंतर धावाधाव नको. फक्त सगळेच अंक असे संग्राह्य असले तर पंचाईत होणार हे नक्की :-)
The Tower Of London - A Historical Romance
A view from Horniman Garden


The Cookie Aisle at Kyani's

४. आकंठ - दिवाळी अंक २०१५

मागच्या वर्षी बरीच धावपळ करून मिळवलेल्या दिवाळी अंकांपैकी हा एक. फक्त तो विकत घेताना मी एक गोष्ट विसरले ती म्हणजे मी वास्तवाच्या फार जवळ जाणाऱ्या गोष्टी वाचू शकत नाही. दुसऱ्याचं दु:ख, अडचणी ह्याबद्दल काही वाचलं की मग तेच मनात फिरत रहातं आणि फार त्रास होतो. हा माझा पळपुटेपणा म्हणा हवं तर. आहेच तो एका अर्थी. पण इलाज नाही. आणि हा अंक अनुवादित केलेल्या साहित्यावर आधारित असतो. अश्या कथांत त्या विशिष्ट जमातीतल्या, भाषासमूहातल्या लोकांना आलेले अनुभव, त्यांची दु:खं, अडचणी, दारिद्र्य ह्याबद्दल लिहिलेलं असणारच ना. असो. पण अंक विकत घेतला त्यामुळे वाचण्याशिवाय पर्याय नाही.

खरं तर भाषांतरीत काहीही वाचायला मला एरव्ही आवडलं नसतं कारण अनुवादात बऱ्याचदा मूळ भाषेचा आत्मा हरवतो. तसंच आपल्याला एखादी कथा आवडते की नाही हेही काही वेळा  अनुवाद कसा केला गेलाय ह्यावर अवलंबून असतं. इथे सुध्दा अनेक कथांत हेच झालंय. काही अनुवाद अत्यंत यांत्रिकपणे केल्या गेल्याने कथेचा मूळ बाज हरवलाय. त्या कथा वाचताना एखादं न-नाट्य वाचत असल्यासारखं वाटतं.

तरी मला आवडलेल्या कथा म्हणजे टिफिन बॉक्स, खारीचं हसू, अर्ध्या रात्रीच्या घंटेचा आवाज, एक लाल गुलाब, त्या अंधाऱ्या रात्री, पिंडदान कैरोसाहेबांची मद्दम आणि उत्सव द फेस्टिव्हल. नंके खाग्राबारी, देवकीचा दिवस, मयूर विहार ने अस्वस्थ केलं. 'महानगर' चा सुरुवातीचा भाग वाचून पुढे वाचायची हिम्मत झाली नाही. हा माझा कपाळकरंटेपणा :-( इंदिरा गोस्वामी एक जीवनप्रवास, इंदिरा गोस्वामी यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला काही भाग (ह्या चरित्राचं इंग्रजी भाषांतर मिळालं तर पहायला हवं), आसामची संस्कृती (ह्या लेखात खाद्यसंस्कृतीचा उल्लेख नव्हता हे खटकलं), सबिता गोस्वामी यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला काही भाग (हेही वाचायला हवं) हे लेखही आवडले.

कविता हा माझा प्रांत नव्हे. आणि कथांच्या अनुवादाचा एकंदरीत बाज पाहता कवितांच्या वाटेला न जाणंच शहाणपणाचं असं वाटलं. तरी धाडस करून काही वाचल्या त्यातली 'तो इतका स्वतंत्र होता की' आवडली.

ह्या वर्षी कुठल्या भाषेतलं साहित्य आणतात पाहू.