Sunday, February 7, 2016

५. किल्ला - दिवाळी अंक २०१५

ह्या अंकाचं मुखपृष्ठ एव्हढं देखणं आहे की पाहताक्षणी मला ते आवडलं आणि अंकांत काय आहे हे पाहायची उत्सुकता लागली. तुम्ही म्हणाल एव्हढं काय आहे मुखपृष्ठात? तर हरिहर गडाच्या जवळपास ९० अंशात असलेल्या पायर्या आणि त्या मुखपृष्ठाच्या जेव्हढ्या भागावर आहेत तेव्हढाच भाग खरखरीत केलेला. जणू काय आपण त्या कातळाला, फत्तरालाच स्पर्श करतोय. क्या बात है!

सुदैवाने आतल्या मजकुराने मला बिलकुल निराश केलं नाही. सर्व लेख उत्तम - गडकोटावरील देवदेवता, कंधार - राष्ट्रकुटांचा भुईकोट, अष्टप्रधान (शिवाजीराजांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती), आंध्रातल्या श्रीशैलम जवळील शिवस्मारकाची ओळख करुन देणारा विश्वास पाटील ह्यांचा लेख, मंगळवेढ्याच्या किल्ल्याबद्दलचा गोपाळराव देशमुख ह्यांचा लेख, नकाशाद्वारे दुर्गवेध, निसर्गदुर्ग हा सीमंतिनी नुलकर ह्यांचा पक्षी-प्राणी ह्यांच्या रहाण्याच्या जागांवरील लेख, दुर्गप्रतिमा ह्या नव्याकोऱ्या सदरातली किल्ले वेताळगडाचे फोटो - सर्व अगदी सुरेख. नगरधन (नागपूरजवळील किल्ला), पाणीमहाल (उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला) आणि किल्ले जिंजीबद्दल वाचून केवळ हेच नव्हे तर (निदान!) महाराष्ट्रातील तरी शक्य होतील तेव्हढे किल्ले पहावेत असं मनाने घेतलं आहे. पाहू कसं जमतंय. "दुर्गरंग" सदरातली रायगडाची चित्रं मस्त आहेत. असलं काही कसब आपल्या हाती नाही ह्याचं थोडं वैषम्य वाटलंच. :-( 'अगडबंब तोफा' ह्या लेखातल्या भीमकाय तोफा पाहून छाती दडपलीच.

खटकला तो एकच लेख - 'दगडांच्या देशा' हा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ह्यांचा. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची दुरवस्था सर्वज्ञात आहे. पण त्याबद्दल काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी नुसतं समिती स्थापायचं काम सरकारने केलंय हे वाचून काही फारसं बरं वाटलं नाही. ह्या असल्या समित्यांकडून काय, कसं आणि किती काम होतं हे वेगळं सांगायला नको. त्यातून आजच वसईनजीकच्या खारबांव किल्ल्याबद्दल वाचलं. निदान ही समिती तरी सुखद अपेक्षाभंग करेल अशी अपेक्षा करावी का?

हा अंक वाचून झाला तरी रद्दीत द्यायला मन होत नाहीये, मी तो संग्रही ठेवणार आहे. ह्या वर्षी पेपरवाल्याला दिवाळी सुरु व्हायच्या आधीच हा अंक आणून दे म्हणून सांगणार. नंतर धावाधाव नको. फक्त सगळेच अंक असे संग्राह्य असले तर पंचाईत होणार हे नक्की :-)

No comments: