Sunday, February 7, 2016

४. आकंठ - दिवाळी अंक २०१५

मागच्या वर्षी बरीच धावपळ करून मिळवलेल्या दिवाळी अंकांपैकी हा एक. फक्त तो विकत घेताना मी एक गोष्ट विसरले ती म्हणजे मी वास्तवाच्या फार जवळ जाणाऱ्या गोष्टी वाचू शकत नाही. दुसऱ्याचं दु:ख, अडचणी ह्याबद्दल काही वाचलं की मग तेच मनात फिरत रहातं आणि फार त्रास होतो. हा माझा पळपुटेपणा म्हणा हवं तर. आहेच तो एका अर्थी. पण इलाज नाही. आणि हा अंक अनुवादित केलेल्या साहित्यावर आधारित असतो. अश्या कथांत त्या विशिष्ट जमातीतल्या, भाषासमूहातल्या लोकांना आलेले अनुभव, त्यांची दु:खं, अडचणी, दारिद्र्य ह्याबद्दल लिहिलेलं असणारच ना. असो. पण अंक विकत घेतला त्यामुळे वाचण्याशिवाय पर्याय नाही.

खरं तर भाषांतरीत काहीही वाचायला मला एरव्ही आवडलं नसतं कारण अनुवादात बऱ्याचदा मूळ भाषेचा आत्मा हरवतो. तसंच आपल्याला एखादी कथा आवडते की नाही हेही काही वेळा  अनुवाद कसा केला गेलाय ह्यावर अवलंबून असतं. इथे सुध्दा अनेक कथांत हेच झालंय. काही अनुवाद अत्यंत यांत्रिकपणे केल्या गेल्याने कथेचा मूळ बाज हरवलाय. त्या कथा वाचताना एखादं न-नाट्य वाचत असल्यासारखं वाटतं.

तरी मला आवडलेल्या कथा म्हणजे टिफिन बॉक्स, खारीचं हसू, अर्ध्या रात्रीच्या घंटेचा आवाज, एक लाल गुलाब, त्या अंधाऱ्या रात्री, पिंडदान कैरोसाहेबांची मद्दम आणि उत्सव द फेस्टिव्हल. नंके खाग्राबारी, देवकीचा दिवस, मयूर विहार ने अस्वस्थ केलं. 'महानगर' चा सुरुवातीचा भाग वाचून पुढे वाचायची हिम्मत झाली नाही. हा माझा कपाळकरंटेपणा :-( इंदिरा गोस्वामी एक जीवनप्रवास, इंदिरा गोस्वामी यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला काही भाग (ह्या चरित्राचं इंग्रजी भाषांतर मिळालं तर पहायला हवं), आसामची संस्कृती (ह्या लेखात खाद्यसंस्कृतीचा उल्लेख नव्हता हे खटकलं), सबिता गोस्वामी यांच्या आत्मचरित्रातून घेतलेला काही भाग (हेही वाचायला हवं) हे लेखही आवडले.

कविता हा माझा प्रांत नव्हे. आणि कथांच्या अनुवादाचा एकंदरीत बाज पाहता कवितांच्या वाटेला न जाणंच शहाणपणाचं असं वाटलं. तरी धाडस करून काही वाचल्या त्यातली 'तो इतका स्वतंत्र होता की' आवडली.

ह्या वर्षी कुठल्या भाषेतलं साहित्य आणतात पाहू.

No comments: