Tuesday, November 5, 2019

1. The Real Face Of Facebook in India - Cyril Sam and Paranjoy Guha Thakurta

2. His Dark Materials - Philip Pullman

3. Bombay Before Mumbai: Essays in Honour of Jim Masselos

4. विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

5. Flawed - Pavan C. Lall

6.Saying No To Jugaad: The Making Of BigBasket - T.N. Hari & M.S. Subramanian




Sunday, November 3, 2019

२. मुशाफिरी (दिवाळी अंक २०१९) (रुपये १५०)


भटकंतीची आवड असूनही आपल्याला वेळेअभावी हवं तितकं, हवं तिथे आणि हवं तेव्हा भटकता येत नाही. मग इतर भटक्यांनी केलेल्या भटकंतीबद्दल वाचून दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. तसंही आपण कुठे सगळं जग फिरू शकतो, नाही का? तेव्हा मुशाफिरीचा दिवाळी अंक मी घेतेच.

ह्या वर्षीचा अंकही नेहमीसारखीच मेजवानी घेऊन आला. पहिला भाग ऑफ-बीट भटकंतीचा. ह्यात स्पेनमधल्या अस्तुरियास ह्या आपण कधीही न ऐकलेल्या ठिकाणी योगसाधना करणाऱ्या आणि ती शिकवणाऱ्या लोकांबद्दल अनिल परांजपे आपल्याला सांगतात. स्टोकहोमच्या शिल्पवैभवावरचा आशिष महाबळ ह्यांचा लेख, एका मित्राला सोबत घेऊन ३३ दिवसांत पूर्व-पश्चिमेची सात भारतीय राज्यं सायकलीवरून पार करणाऱ्या सायली महाराव ह्यांचं अनुभवकथन, उत्तर युरोपात काही खास प्लानिंग न करताही नियतीने पदरात टाकलेल्या काही अनमोल क्षणांबद्दल सांगणारा प्रीति छत्रेचा लेख आणि मूळची इराणी असून आता भारतात स्थायिक झालेल्या, सायकलवरून सात खंड आणि ६४ देश पादाक्रांत करणाऱ्या मराल यजार्लूची माहिती देणारा अदिती जोगळेकर-हर्डीकर ह्यांचा लेख म्हणजे रुचकर फराळाने गच्च भरलेलं ताट आहे.

दुसरा विभाग अनोळखी आशिया. ह्यात अझरबैजानचं बाकू (सायली घोटीकर), जोर्डन आणि इस्त्रायल (मोहना जोगळेकर), आर्मेनिया (कामिनी केंभावी), श्रीलंका (श्री.द. महाजन) आणि समरकंद (दिनेश शिंदे) ह्या ठिकाणांविषयी माहिती आहे. अझरबैजान, आर्मेनिया आणि उझबेकी समरकंद तिन्ही ठिकाणी राज कपूर अजूनही फेमस आहे हे वाचून गंमत वाटते. पैकी अझरबैजान आणि उझबेकीस्तान आधी युएसएसआरचे भाग असल्याने त्यात राज कपूर लोकप्रिय असल्याचं आश्चर्य वाटत नाही. पण आर्मेनियामध्ये तो कसा काय पोचला बुवा? अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये राजकपूरसोबत मिथुन चक्रवर्तीसुध्दा लोकप्रिय असल्याचं वाचून मी तर खुर्चीवरून पडलेच. त्याचं ‘जिमी जिमी आ जा आ जा’ हे भयानक डोक्यात जाणारं गाणं तिथे भलतंच हिट आहे म्हणे. देवा रे! ‘पिकतं तिथे विकत नाही’ असा काही प्रकार आहे का काय हा? आणखी एक म्हणजे ह्या परक्य देशांत एक भारतीय म्हणून ह्या लेखक-लेखिकांना जो जिव्हाळा, प्रेम मिळालं त्याबद्दल वाचून मस्त वाटतं.

तिसर्या विभागात मेघालय आणि सिक्कीम बद्दल अनुक्रमे प्रकाश काळेल आणि यशोदा वाकणकर ह्यांनी लिहिलंय. चौथ्या ‘ग्रामीण देश, ग्रामीण परदेश’ मध्ये विंचुर्णी (अन्वर हुसेन) आणि जव्हार (स्मिता जोगळेकर) ह्या देशी ठिकाणांसोबत ग्रामीण ब्रिटनबद्दलही (जयप्रकाश प्रधान) वाचायला मिळतं. जिथून डोंगर दिसतील असं एखाद्या तळ्याकाठचं, छोटंसं टुमदार, झाडांनी वेढलेलं, पुस्तकांनी भरलेलं, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेलं घर असावं असं आपल्यापैकी कित्येकांना वाटतं. ते उभारणाऱ्या गौरी देशपांडेबद्दल कुतूहल वाटतंय. सगळे अंक वाचून संपल्यावर पुन्हा लायब्ररी जॉईन करेन तेव्हा त्यांचं ‘विंचुर्णीचे धडे’ आहे का विचारायला हवं.

चौथ्या विभागात हिमालयातल्या बुरान घाटीचा खडतर ट्रेक करणाऱ्या असीम आव्हाड ह्यांना साष्टांग नमस्कार घालावासा वाटतो. हे काही ह्या जन्मात आपल्याला जमणार नाही तेव्हा ह्याबद्दल वाचलेलंच बरं असं वाटून गेलं. चोपता व्हेलीला सोलो ट्रेक करणाऱ्या शैलजा रेगेनाही असाच साष्टांग घातला. पण हे मात्र आपल्यालासुध्दा जमून जाईल का असा विचार डोक्यात आलाच. पक्षी हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आशुतोष आकेरकरांचा भिगवणच्या बर्डीन्गवरचा लेख खास वाटला. हे सुध्दा कधी तरी केलं पाहिजे. पुन्हा एकदा ‘हजार ख्वाहिशे ऐसी’ ची जाणीव झाली.

शेवटचा विभाग नदीवरचा. ह्यात माधव मुंडल्ये ह्यांचा नर्मदेवरचा आणि सुहास गुर्जर ह्यांचा एमेझोनवरचा असे दोन लेख समाविष्ट आहेत. नर्मदा परिक्रमा पायी करणं ह्या जन्मी तरी शक्य नाही हे मला ठाऊक आहे. पण गाडीतून तरी करता येईल ह्या आशेवर आहे. आता एमेझोनवारी कधी जमणार ही नवी विवंचना लागली आहे J

थोडक्यात काय तर, घरी बसल्या बसल्या थोडं जग फिरून येता येईल ह्या हेतूने घेतलेल्या ह्या अंकाने माझ्या मरायच्या आधी फिरायला जायच्या ठिकाणांच्या लिस्टमध्ये अजून भर घातली. J आता बघू यात आयुष्य काय काय बघायची संधी देतं ते. तुमचीही माझ्यासारखीच गत असेल तर हा अंक नक्की वाचा एव्हढंच सांगेन.

१. अक्षरलिपी (दिवाळी अंक २०१९) (रुपये २००)


मला वाटतं मी अक्षरलिपीचा दिवाळी अंक आजपर्यंत विकत घेतला नव्हता. मेजेस्टीक मध्ये भर दुपारी जाऊनही ‘किल्ला’ मिळाला नाही. पण बाकी बरेच अंक होते. त्यातले काही घेता येतात का पाहू म्हणून सगळे चाळले. ह्यातला पहिलाच लेख ‘कन्नोज’ वरचा पाहून उत्सुकता वाढली. अनुक्रमणिकेत रिपोर्ताज सेक्शनही इंटरेस्टिंग वाटलं म्हणून अंक घेतला.

अनुक्रमणिकेनुसार जायचं तर पहिला विभाग कथांचा. खरं तर मला कथाविभाग फारसा आवडत नाही. तरी त्यातल्या त्यात ‘रु-ए-दाद-ए-सफर’ ह्या लांबलचक नावाची (अर्थ काय कोण जाणे!) मोनालिसा वैजयंती विश्वास ह्यांची कथा आणि ‘इनामातले दादा’ हे सुरेंद्र रावसाहेब पाटील ह्यांनी लिहिलेलं व्यक्तिचित्र दोन्ही आवडली.

पुढला भाग रिपोर्ताजचा. अगदी मन लावून वाचावा असा आहे. त्यात मनोज गडनीस अत्तराची राजधानी कन्नोजबद्दल सांगतात तर लेह-लदाख-कारगिलबद्दल अनोखी माहिती देतात ऋषीकेश पाळंदे. उसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी परवड आणि ती थांबवायला तळमळीने झटणार्या लोकांचं काम ह्याविषयी प्रगती बाणखेलेनी तितक्याच तळमळीने लिहिलंय. शर्मिला कलगुटकार क्षय झालेल्या बायकांच्या वाट्याला येणारे हाल आणि त्यातून उमेदीने, जिद्दीने उभ्या राहणाऱ्या बायका आपल्यासमोर उभ्या करतात. मिनाज लाटकर ह्यांचा भारतातल्या तिबेटी लोकांविषयीचा तर शर्मिष्ठा भोसलेंचा नागालेंडमधल्या बाकीच्या राज्यातून आलेल्या लोकांच्या जगण्यावरचा असे दोन्ही लेख आपल्याला विचारात पाडतात. खरं तर देशाच्या निरनिराळ्या भागातल्या दुसरीकडून येऊन स्थायिक झालेल्या लोकांचं आयुष्य हा एका दिवाळी अंकाच्या थीमचा विषय होऊ शकतो. असो. संदेश कुरतडकर ह्यांचा Gay Dating Apps  वरचा आणि मुक्ता चैतन्य ह्यांचा भारतातल्या लहान मुलांच्या वाढत्या पॉर्न साईटसच्या वापरावरचा असे दोन्ही लेख आपल्याला अंतमुर्ख आणि अवस्थ करतात. महेशकुमार मुंजाळे ह्यांचा पदरचे अनेक पदर उलगडून सांगणारा लेखही खासच.

केरळातल्या पुलीकालीवरचं सुरेख फोटोफिचर आणि बालग्राम तसंच सेवालय ह्या सामाजिक संस्थाच्या कामाची ओळख करून देणारे लेख अंक पूर्ण करतात. अंकात एकूण ११ कविता आहेत. पण कविता आणि माझं लहानपणापासून फारसं सख्य नाही त्यामुळे ह्यावर मी भाष्य करू शकत नाही J

एकुणात ह्या वर्षीचा अंक भावला. पुढल्या दिवाळीला अंकात काय आहे हे नक्कीच पाहणार.