Thursday, February 16, 2023

८. ऋतुरंग (दिवाळी अंक २०२२) (किंमत ३०० रुपये)

 ह्या ब्लॉगवर एक नजर टाकल्यावर लक्षात आलं की २०२१ मध्ये मी ऋतुरंगचा दिवाळी अंक घेतला नव्हता. २०२० मध्ये घेतला होता. ह्या वर्षीची ह्या अंकांची खरेदी अनुक्रमणिका बघून केली होती.

पैकी बरेचसे लेख शब्दांकित. मग तो सत्यजित रेंवरचा शर्मिला टागोरचा असो किंवा शबाना आझमीवरचा जावेद अख्तर ह्यांचा असो किंवा निसर्गाशी असलेलं स्वतःचं नातं उलगडून सांगणारा दीप्ती नवल ह्यांचा असो. पण ह्यामुळे झालंय काय की शब्दांकन कितीही समजून उमजून केलेलं असलं तरी मूळ लेखाची सर त्याला येत नाही. कुठे ना कुठे तरी एखादा शब्द बोचतोच. कुठे वाक्यरचना उगाचच क्लिष्ट वाटते. दुसरं म्हणजे हे लेख छोटे वाटतात, त्रोटक वाटतात. पण हेही खरंच की शब्दांकन नसतं तर मिंटल मुखिजा, रसिका रेड्डी (ह्यांचा लेख बहुतेक लोकसत्तात आधी वाचला होता), दुर्गा गुडीलू ह्यांच्याबद्दल कळलंच नसतं.

त्यामानाने मराठी माणसाच्या लेखांचं शब्दांकन तितकंसं खटकत नाही. ह्यात कमल परदेशी, मीरा उमप, मीरा बाबर, लक्ष्मण चव्हाण, राजू बाविस्कर, सुरेख कोरडे, शिवराम भंडारी ह्या निदान मी तरी कधी नावं न ऐकलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या प्रेरणादायक कथा आहेत. सुशीलकुमार शिंदे, मुकुंद संगोराम, किशोर मेढे ह्यांचे लेखही वाचनीय आहेत. वसंतदादा पाटील आणि गुलजार ह्यांच्यावरच्या अंबरीश मिश्र ह्यांच्या लेखात सुद्धा ह्या त्रुटी तुलनेने कमी जाणवल्या. भास्करराव पेरे पाटील ह्यांच्या लेखाचा खास उल्लेख करावासा वाटतो कारण सरकार मदत करेल म्हणून वाट बघत न बसता त्यांनी आपल्या गावाचा जो कायापालट केला त्याबद्दल वाचायला फार छान वाटलं. ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो त्याचा प्रॅक्टिकल वापर केलाय. 

ललित भागातले हिमवाटेवरील पहाट (सुरेशचंद्र वारघडे) आणि मायकल पालीनचा जगप्रवास (नीती मेहेंदळे) हे लेख आवडले. अंजली आंबेकर ह्यांच्या लेखातून आदिवासी संगीत पार सातासमुद्रापल्याड नेणाऱ्या नंचयम्मा ह्यांची ओळख होते. मल्हार अरणकल्ले ह्यांचा गावाकडल्या ऋतूबदलांची ओळख करून देणारा 'ही वाट दूर जाते' हा लेखही वाचनीय आहे. 

दोन लेख मात्र खटकले. एक नृत्यसाधनेची सहा वर्षं हा डॉ. भाग्यश्री पाटील ह्यांचा. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली आणि ते नेटाने पूर्ण केलं हे कौतुकास्पद आहे ह्यात वादच नाही. पण ह्या नृत्यप्रवासात त्यांना काय अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशी मात केली ह्याबाबत लेखात फार कमी माहिती आहे. नृत्य लहान वयात शिकायला सुरुवात करावी लागते कारण त्यासाठी लागणार लवचिकपणा तेव्हा शरीरात असतो ही सर्वमान्य समजूत आहे. त्याला छेद देत हा प्रवास त्यांनी केला तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणाला जायचं असेल तर त्या व्यक्तीने काय करायला हवं किंवा नको त्याविषयीची माहिती लेखात हवी होती. तसं न होता हा लेख निव्वळ आभारप्रदर्शनाचा झाला आहे. हे टाळता आलं असतं.

दुसरा लेख विनय सहस्र्बुद्धे ह्यांचा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्यावर लिहिलेला. सहस्र्बुद्धे ह्यांचं नाव ओळखीचं वाटलं. गुगल केल्यावर त्यांचं लिखाण कुठे वाचलंय आणि गाडी कुठल्या रुळावरून धावणार ह्याचा नेमका अंदाज आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळाली. त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल, त्यांच्या राष्ट्रपती पदावर नेमणूक होण्याआधीच्या कामाबद्दल आदर आहे. पण "त्या कोणालाही गृहीत धरत नाहीत आणि कोणीही त्यांना गृहीत धरू शकत नाही" वगैरे लेखकाची विधानं भाषणात टाळ्या पडाव्या ह्या हेतूने करतात थेट तश्या पद्धतीची वाटली. त्यांची नोकरशाहीवरची पकड आणि अचूक थेट प्रश्न विचारायची सवय वगैरे अजून तरी दिसायची आहे. तूर्तास रबर स्टॅम्प ह्या यशवंत सिंह ह्यांच्या शब्दांची आठवण व्हावी अशीच स्थिती आहे. स्थिती बदलेल अशी आशा करावी का?

असो. पुढल्या वेळी अनुक्रमणिका जरा सावधपणे पाहावी लागेल असं दिसतंय. 

Sunday, February 12, 2023

७. लोकसत्ता (दिवाळी अंक २०२२) (किंमत १७५ रुपये)

खरं तर दर वर्षी दिवाळी अंक वाचनाची सुरुवात लोकसत्ताच्या अंकाने करायची हा माझा अलिखित शिरस्ता.  हा अंक आधी आणलेल्या अंकांत होता. नंतर काही अंक आणले ते खाली ठेवले आणि आधीच संच कपाटावर ठेवला गेला. मग खाली ठेवलेले अंक आधी वाचून टाकले. त्यामुळे लोकसत्ताचा अंक वाचायला उशीर झाला. 

२०२२ च्या बरीच बऱ्याच अंकांप्रमाणे ह्या अंकाची अनुक्रमणिका वाचून आता वेळ सत्कारणी लागणार ह्याची खात्री पटली. पहिला लेख अभिनव चंद्रचूड ह्यांचा - दुय्यम न्यायालयांना देशाच्या घटनेचा अर्थ लावण्याचा हक्क मिळावा असा ह्यातला युक्तिवाद. म्हटलं तर क्लिष्ट विषय. शाळेत असतानाही नागरिकशास्त्र हा आवडीचा विषय नव्हता. पण गेली काही वर्षं राज्यघटना आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टीबाबत थोडं वाचू लागले आहे. त्यामुळे हा लेख ज्ञानात भर टाकणारा वाटला. बीबीसी माहीत नसलेल्या लोकांनाही भारतात गेले काही दिवस हे नाव माहित झालेलं आहे. मी गेली कित्येक वर्ष त्यांचा ऐतिहासिक घटनांचा ९-१० मिनिटात मागोवा घेणारा Witness History हा पॉडकास्ट ऐकते आहे. त्यामुळे ह्या संस्थेबद्दल मनात खूप आदर आहे. सतीश जेकब ह्यांचा 'बीबीसीतले  दिवस', आशुतोष ह्यांचा 'बीबीसी आजही आशेचा किरण' आणि गिरीश कुबेर ह्यांचा 'एका क्रान्तीचं शतक' हे लेख वाचून तर हा आदर आणखी वाढला. कधी इंग्लंडला जाणं झालंच तर बाहेरून का होईना त्यांची इमारत नक्की पाहून येणार आहे. श्याम सरन ह्यांच्या 'बीबीसीचे भारताबद्दलचे धोरण बदलते आहे' मध्ये थोडा वेगळा सूर लागला आहे. असो.

'प्राचीन भारत', 'भारतीय संस्कृती' वगैरे शब्द कोणी वापरायला लागले की धडकी भरते आजकाल. पण 'सहिष्णुता' शब्द वाचल्यावर जीवात जीव आला. आजकाल हा शब्द नाहीसा झालाय वापरातून. हेमंत राजोपाध्ये ह्यांचा हा लेख संस्कृतीच्या नावाने गळे काढणाऱ्या समस्त मंडळींना वाचायला द्यायला हवा. ह्या वाढत्या असहिष्णूतेची कारणं आपल्या सर्वानाच ठाऊक आहेत. तरीही ह्या कारणांसोबतच ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा उहापोह नौशाद उस्मान ह्यांनी आपल्या लेखात केला आहे. त्यांच्या लेखाच्या शेवटच्या 'इन्शा अल्लाह' ला माझं 'देव करो' आणि 'Amen' जोडते. हे होईल तो सुदिन.

विनय सहस्त्रबुद्धे ह्यांचे लेख लोकसत्तामध्ये वाचले आहेत. त्यांच्या लेखाचं 'सदिच्छा संपदेकडून सॉफ्ट पॉवरकडे' हे शीर्षक वाचून लेखात काय मालमसाला असेल ह्याचा अंदाज आला. तरी लोकशाही टिकवून ठेवण्यात भारताने यश संपादन केलं आहे हे ते मान्य करतात हे वाचून आनंद वाटला. २०१४ च्या आधीपासून देशात लोकशाही होती हे त्यांना मान्य आहे की नाही कोणास ठाऊक. लष्कराने आपली स्वायत्तता टिकवून ठेवली आहे हे आपलं नशीब. पण न्यायालयांच्या स्वायत्ततेबाबत आजकाल शंका येऊ लागली आहे. पुन्हा असो.

म्युझियम्स हा माझा आवडता विषय. मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तूसंग्रहालय (पूर्वाश्रमीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम) ही माझी अत्यंत आवडती जागा. अरुंधती देवस्थळे ह्यांच्या 'कलासंग्रहालयाचिये दारी' ह्या लेखात मात्र देशविदेशातल्या नानाविध प्रकारच्या म्यूझियम्सबद्दल वाचायला मिळतं - अगदी museum of broken relationships, museum of bad art, Gelato Museum पासून ते पार फ्रॉईड म्यूझियम सर जॉन सोन्स म्युझियम ऑफ आर्किटेक्चरपर्यंत. खासगी संग्रहालयांवरचा अभिजित बेल्हेकर ह्यांचा आणि Anatomy ला वाहून घेतलेल्या एना मोरंडी मंझोलीनी वरचा विजय तापस ह्यांचा लेखही वाचनीय. हे लेख वाचून हे सगळं आपण कधी पाहणार हा प्रश्न अर्थात मनात उगवलाच. 

हिंदी सिनेसृष्टीतला चिरतरुण समजला जाणाऱ्या देव आनंदवर लिहिलेला अरुणा अंतरकर ह्यांचा लेख देवच्या चाहत्यांना नक्की आवडेल. हबीब तन्वीर हे नाव कुठेकुठे वाचलेलं पण मला त्यांच्याबद्दल फार काही माहिती नव्हती. लेखातला त्यांचा फोटो पाहिल्यावर काही आर्ट फिल्म्समध्ये त्यांना पाहिल्याचं आठवलं. पण त्यांच्या नाट्यकलेतल्या प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात 'मोर नाम हबीब तन्वीर' ह्या लेखात वाचायला मिळतं. जुन्या काळातलं किती आणि काय काय निसटून गेलंय हे वाचून खिन्न व्हायला होतं. 

शाळेत असताना जी. ए. ची पुस्तकं वाचली होती. काही गोष्टी कळल्या, बऱ्याचश्या डोक्यावरून गेल्या. पण ह्या नावाचं गारूड कायम राहिलं. रामदास भटकळ ह्यांनी जी. ए. वर लिहिलेल्या लेखावरून आणि त्यात समाविष्ट केलेल्या त्यांना जी. ए.नी लिहिलेल्या पत्रातून त्यांच्या स्वभावाबद्दल थोडी कल्पना येते.

'मुकेश' म्हटलं की सुमधुर गाण्यांची एक मालिकाच मनात उभी राहते. गाणी काय आपण सगळेच ऐकतो. पण ती कशी ऐकावीत हे डॉ. मृदुला दाढे-जोशी ह्यांचा मुकेशवर लिहिलेला लेख वाचून कळतं. मी तर ठरवलं आहे की वेळ मिळेल तेव्हा हा लेख घेऊन बसायचं आणि पारायणं केलेली मुकेशची गाणी पुन्हा एकदा ऐकायची. लेखिकेने सांगितलेल्या जागा आपल्याला सापडताहेत का ते पाहायचं आणि मग गोल्डन एरातली इतर आवडती गाणी त्याच पद्धतीने ऐकून पाहायची. पाहू कधी जमतंय ते. 

प्रवीण बांदेकरांची 'कावळ्याची अंडी आणि गडगडलेलं सरकार' ही कथा कळतेय कळतेय म्हणेस्तोवर हातातून निसटली. तीच गोष्ट प्रणव सुखदेव ह्यांच्या 'नर आणि सागर' ह्या कथेची. त्यामानाने 'राखण' (रश्मी कशेळकर), 'एका राणीची गोष्ट' (डॉ. शुभदा कुलकर्णी)आणि 'दिलशाद खालाची न्हाणी '(वसीमबारी मणेर) ह्या कथा आवडल्या. 'दिलशाद खालाची न्हाणी' मधली मुसलमान पात्रांच्या तोंडची मराठीमिश्रित हिंदी फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. 

प्रमोद मुनघाटे ह्यांचा लेख वाचून 'सुशील राधा आणि सद्गुणी कृष्णराव' हे अजब नाव असलेली कादंबरी वाचायची उत्सुकता लागली आहे. कविता विभागातली  'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' ही नीरजा ह्यांची कविता आवडली. 'चिन्हचित्रं' मधली गणितातल्या चिन्हांवर आधारलेली व्यंगचित्रं मस्तच.