Saturday, February 17, 2024

९. दुर्गांच्या देशातून (दिवाळी अंक २०२३) (किंमत रुपये ४००)

'ट्रेकिंगवरचा पहिला दिवाळी अंक' अशी ओळख असणाऱ्या ह्या दिवाळी अंकाचा हा बारावा अंक. म्हणजे अंक सुरु होऊन एक तप पूर्ण झालं. 'दिवाळी अंक' हा मराठी माणसाचा चकली-चिवडा आणि नाटक ह्यांइतकाच वीक पॉईट असला तरी आजकालच्या जमान्यात कोणी पुस्तक वाचायला जात नाही अशी सार्वत्रिक ओरड नेहमीच ऐकू येते. ह्या परिस्थितीत अंकाचं हे यश खरंच कौतुकास्पद आहे. मी कधीपासून अंक आणायला सुरुवात केली ते ह्या ब्लॉगच्या जुन्या नोंदी पाहून मला कळेलच पण अंक प्रथम वाचला त्यानंतर प्रत्येक दिवाळीला आणलाच बहुतेक. 'किल्ला' चा अंक दार दिवाळीला जपून ठेवते. 'दुर्गांच्या देशातून' चा अंक आजवर ठेवला नाही. पण ह्या वर्षीचा मात्र ठेवणार आहे. ह्याला कारण ह्या वर्षीच्या अंकात आधी कधी न वाचलेल्या किल्ल्यांबाबत भरपूर माहिती आहे. आणि कधी न कधी तरी वेळ काढून हे सर्व किल्ले डोळस नजरेने पाहायचे हा आयुष्यातल्या टू-डू लिस्टमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर असो.

अंकात आधी ज्यांनी कधी लिहिलेलं नाही शक्यतो अश्या लेखकांना संधी द्यायचा आपला शिरस्ता ह्या वर्षीही अंकाने पाळलेला दिसतो हे संपादकीयातून समजतं. ह्या वर्षीच्या अंकात लिहीणार्या लेखकांची संख्या ३२ आहे हेही कळतं. पण ह्या ३२ लेखांविषयी दोन शब्द लिहिल्याचा नादात संपादकीय चांगलं ६ पानी झालेलं आहे. मी सुरुवातीचं एक पान वाचलं. मग शेवटचं पान वाचलं आणि सरळ लेखांकडे वळले. मला असं वाटतं की ह्याऐवजी प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला त्या लेखक-लेखिकेबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. 

तर नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर आता अंकातल्या मला आवडलेल्या लेखांकडे वळते. 

'हे आपल्याच्याने ह्या जन्मी तरी होणे नाही' अशी गोष्ट म्हणजे गिर्यारोहण. त्यामुळे बाकीच्यांनी केलेल्या मोहिमेबद्दल वाचण्याची उत्सुकता असतेच. 'अष्टहजारी मोहिमांचा थरार' हा जितेंद्र गवारे ह्यांचा लेख ह्यावर भरपूर माहिती देतो. आणि ह्या असल्या कठीण मोहिमा करून ही गिरिशिखरं सर करणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. आपण जिथे राहातो त्या परिसरातले किल्ले आपल्या शाळेतल्या मुलांनाही दाखवले पाहिजेत ह्या ध्यासातून ही कल्पना सत्यात उतरवणाऱ्या ३ शिक्षकांच्या उपक्रमाची माहिती शिवराज पिंपुडे ह्यांच्या 'दुर्गजागर' ह्या लेखातून मिळते. त्यातून प्रेरणा घेऊन अधिक शिक्षक असे उपक्रम राबवतील अशी आशा वाटते. 'Mountains Memoirs' हा लेख मॅरेथॉन धावपटू असलेल्या सुविधा कडलग ह्यांच्या सह्याद्रीतल्या आणि हिमालयातल्या गिर्यारोहणावरचा लेख छान आहे. पण तो इंग्लिशमधून का आहे हे कोडं काही उलगडलं नाही. पन्हाळा, लोहगड आणि तोरणा ह्या ३ किल्ल्यावर लिहिलेला सुनील लिमये ह्यांचा 'गडकोटांच्या सान्निध्यात' हा छोटेखानी लेखही मला आवडला. एव्हरेस्टच्या बेस केम्पपर्यंत जायचं एक वेडं स्वप्न मी अनेक वर्षं उराशी बाळगून आहे. त्यामुळे एव्हरेस्ट चढाईवरचा शिवाजी ननवरे ह्यांचा 'माझा एव्हरेस्ट प्रवास' हा लेख आवडला. 

'चक्रम हायकर्स' हे नाव कधी त्यांनी आयोजित केलेले उपक्रम किंवा त्यांनी यशस्वी केलेली रेस्क्यू ह्यामुळे पेपरातून वाचून अनेकांना माहितीचं असेल. अश्या लोकांना 'गिरिभ्रमण कळे कौतुक' हा समीर कर्वे ह्यांचा लेख आवडेल. तीन संस्कृत श्लोकांच्या आद्याक्षरांतून 'चक्रम' हे नाव तयार झालंय हे वाचून आश्चर्य वाटतं. रायगड माहीत नाही असा मराठी माणूस विरळा. स्वराज्यातल्या ह्या महत्वाच्या किल्ल्यावर मयूर खोपकर ह्यांनी 'महाराजांच्या दृष्टिकोनातून राजगडाचे महत्व' हा छान माहितीपूर्ण लेख लिहिलेला आहे.  डॉ. नितीन हडप ह्यांनी प्रतापगड आणि रायगड ह्यांचं नातं उलगडून दाखवलेलं आहे. अशीच माहिती पुरंदर ह्या किल्ल्याबद्दल यशोधन जोशी ह्यांच्या 'डॉ. हरमान गोएटस ह्यांच्या नजरेतून पुरंदर' ह्या लेखातून मिळते. 

साल्हेरच्या लढाईवर सुभाष फासे ह्यांच्या 'साल्हेर स्ट्रॅटेजिकल सर्जिकल स्ट्राईक' ह्या लेखातून बरीच माहिती मिळते. पंकज समेळ ह्यांचा लेख धारावी, वसई, घोडबंदर, ठाणे, पारसिक, दुर्गाडी ह्या किल्ल्यांची माहिती देतो. डॉ. राहुल वारंगे हयांनी रसाळगड, सुमारगड आणि महीपतगड  ह्या दुर्गत्रयीवर लिहिलंय. अशीच माहिती सूरज गुरव (नांदेडचा नंदगिरी), विजय माने (पदरगड सह्याद्रीच्या कुशीतली अनोखी किमया), प्राची पालकर (रामगड), शिवाजी आंधळे (सुधागड) ह्यांच्या लेखातून मिळते. शिल्पा पिसाळ ह्यांचा 'देवतिब्बा' च्या ट्रेकवरचा लेख आणि संकेत शिंदे ह्यांचा 'कुंभेघाट ते ठिबठिबा नाळ' हे लेख वाचून वाचकालाही तिथे जायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. किमया देशपान्डे ह्यांनी पुणे जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरच्या मंदिरांवर माहितीपूर्ण लेख लिहिलाय. 

अंकातले शेवटचे काही लेख शिवनेरी, सामानगड आणि कलानिधीगड ह्यांच्या संवर्धनाविषयी माहिती देतात. उठसुठ शिवाजीमहाराजांचं नाव घेणारे राजकारणी ज्या महाराष्ट्रदेशात आहेत तिथे प्राचीन किल्ल्यांचं असं संवर्धन करायची वेळ येते ह्याबद्दल खंत वाटते. पण सरकारी मदतीची वाट न बघता स्थानिक लोक आणि संस्था ह्यात पुढाकार घेत आहेत हे चित्र आशादायक वाटतं. 

ज्या वर्षी स्वराज्यातल्या प्रत्येक गडावर दसरा-दिवाळीच्या दिवशी दिवे लागतील, रांगोळ्या काढल्या जातील, पाडव्याला गुढी उभारली जाईल आणि बाकी वर्षभर पर्यावरणाचं, निसर्गाचं आणि इतिहासाचं भान राखून माणसांचा राबता चालू होईल तो सुदिन. तो लवकर यावा ही देवाजवळ कळकळीची प्रार्थना. 

No comments: