Monday, October 3, 2016

एक माणूस एक दिवस (भाग ३) - ह. मो. मराठे

तुम्ही म्हणाल ह्या पुस्तकाचे पहिले दोन भाग सोडून एकदम तिसरा भाग वाचण्याचं काय खास कारण? 'माझा वेंधळेपणा'. आणखी काही नाही :-) झालं असं की लायब्ररीत पोचले तेव्हा आधीच उशीर झाला होता. काढून ठेवलेल्या गठ्ठ्यातून पटकन पुस्तकं काढून चाळून पाहिली. ह्या पुस्तकातली व्यक्तिमत्वं इंटरेस्टिंग वाटली. व्हॉटसएप वर आलेल्या मूळ सूचीत ह्याचे एकापेक्षा जास्त भाग आहेत असा उल्लेख नव्हता आणि गठ्ठ्यातसुध्दा हा एकच भाग होता. त्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही. वाचायच्या वेळेस आलं. आता पुस्तक परत करतेवेळी बाकीचे भाग आहेत का ते विचारायला लागेल.

पुस्तकाची मूळ कल्पना म्हणजे आपापल्या क्षेत्रात प्रसिध्द अश्या व्यक्तीसोबत एक पूर्ण दिवस घालवून त्याबद्दल वाचकांना माहिती देणारा लेख लिहिणे. पहिली व्यक्ति म्हणजे मधू दंडवते. खरं तर मधू आणि प्रमिला दंडवते ही नावं मी फक्त ऐकलेली. त्यांच्याबद्दल फारसं काही माहीत नव्हतं. त्यामुळे कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्यात मधू दंडवते ह्यांच्या असलेल्या सहभागाबद्दल वाचून आश्चर्य वाटलं. निवडणूक म्हणजे काय मामला असतो त्याचं थोडंसंच का होईना पण मस्त दर्शन ह्या लेखातून घडतं. पुढला लेख अण्णा हजारेंवरचा. मला ह्यांच्याबद्दलही उपोषण, आप व्यतिरिक्त फारशी माहिती नव्हती. त्यांनी सैन्यात सैनिकांना रसद पुरवण्यासाठी गाड्या चालवायचं केलेलं काम, त्यात सीमेवर आलेला चित्तथरारक अनुभव, राळेगणसिध्दी गावाचा केलेला कायापालट ही सर्व माहिती नवीन होती. वर्तमानपत्रात अश्या लोकांच्या आधीच्या कार्यावर कधीच काही माहिती येत नाही - ती येते ती ते गेल्यावर आणि त्यांच्या प्रत्येक पुण्यतिथीला. कटू असलं तरी हे वास्तव आहे.

तिसरा लेख नाना पाटेकर वरचा. मी हिंदी चित्रपट फारसे पहात नाही. त्याचा प्रहार अर्धवट पाहिलाय. खामोशी आणि अग्निसाक्षी बऱ्यापैकी पाहिलाय. बाकी पिक्चर तुकड्यातुकड्यात कधीकधी चेनेल सर्फिंग करताना. त्याने अभिनय केलेली नाटकं तर अर्थात पहायचा कधी योगच आला नाही. त्याच्या विक्षिप्तपणाच्या कहाण्या मात्र बऱ्याच वाचल्या आहेत. तरी आधीच्या दोघांच्या मानाने ह्याची माहिती अधिक होती असंच म्हणायला लागेल. एखाद्या चित्रपटाचं शुटींग कसं चालतं ते ह्या लेखातून व्यवस्थित समजतं. अलीकडच्या काळातली ही स्थिती तर ६०-७० च्या दशकात कसल्या दिव्यातून पार पडून उत्तम हिंदी चित्रपट काढले गेले असतील असा विचार मनात येतोच. एक माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून नाना पाटेकर ह्या लेखातून कळतो. नंतरचा लेख 'कायनेटिक' च्या अरुण फिरोदियांवरचा. इथेही 'पुण्याची बाईक्स बनवणारी कंपनी' ह्याव्यतिरिक्त फारशी माहिती मला नाही. त्यांनीसुध्दा एक लाखातली कार बनवायचा प्रयत्न केला होता ही माहिती नवीन. कधी पेपरातदेखील ह्याबद्दल वाचल्याचं आठवत नाही. त्या कारचं काय झालं कोणास ठाऊक. एका बिझनेसमनचं आयुष्य किती व्यस्त असतं हे ह्या लेखावरून जाणवतं. पण 'भारताला फारसा संघर्ष न करता स्वातंत्र्य मिळालं' हे त्यांचं वाक्य खूप खटकलं. ह्या वाक्यावर लेखकानेही त्यांना अधिक काही विचारलं नाही हे आश्चर्यच.

शेवटला लेख 'नरेंद्र महाराज' ह्यांच्यावर. आता हे 'नरेंद्र महाराज' कोण हे मला अर्थातच माहित नव्हतं. त्यांच्यावर लेख लिहायचं कारण काय तेही समजेना. मला एकूणात हे बाबा, महाराज, साध्वी ह्या प्रकाराबद्दल मनापासून चीड आहे. धर्माचा बाजार करून आपली तुंबडी भरायचे उद्योग आहेत. देव आणि भक्त ह्यांच्यामध्ये कोणी कशाला हवं? आणि एखादा असलाच सच्चा गुरु तर तो नक्कीच एव्हढा बोलबाला करणार नाही ह्याची मला पक्की खात्री आहे. पण आहे तरी काय हे प्रकरण अश्या कुतूहलाने मी लेख वाचायला घेतला. ह्या महाराजांबद्दलच्या अनेक मतप्रवाहामुळेच लेखकानेसुध्दा एकदा स्वत:च्या डोळ्यांनी पाहून काय ते ठरवावं ह्या हेतूने ह्या महाराजांसोबत एक दिवस घालवायचं ठरवलं असं दिसतं. लेख वाचत गेले तरी मला स्वत:ला पक्कं असं मत बनवता आलं नाही. एकीकडे जे आजार किंवा अडचणी वैद्यकीय उपचारांशिवाय बरे होऊ शकत नाहीत असे असतात तिथे हे महाराज दर्शनाला आलेल्यांना तसं स्पष्ट सांगतात. तर दुसरीकडे मला एखाद्याच्या मेंदूतली गाठ दिसते किंवा प्रेग्नंट स्त्रीचा गर्भ मुलगा आहे की मुलगी हे कळू शकतं असं म्हणतात. कदाचित आवाक्याबाहेरचे आजार बरे करतो असं सांगून रोगी दगावला तर नसती बिलामत मागे लागायची हा शहाणपणा डॉक्टरी इलाज करायचा सल्ला देण्यामागे असावा. '३ मुली आहेत' असं सांगत आलेल्या जोडप्याला 'मुलाला काय सोनं लागलंय का? ३ मुली पुरे झाल्या' अशी कानउघडणी करण्याऐवजी 'चौथी मुलगीच होणार तेव्हा सोनोग्राफी करून काय ते ठरवा. पाचवा मात्र मुलगा होईल' असं म्हणणारे हे महाराज 'दारूची सवय लागलेय' असं म्हणणाऱ्या भक्तांना मात्र ती सोडण्याची शपथ घ्यायला लावतात. बहुतेक 'मुलाचं वेड' हा आपल्या समाजातला विकोपाला गेलेला रोग त्यांना दारूइतका महत्त्वाचा वाटत नसावा. 'करणीने कोणाचं वाईट करता येत नाही. लिंबू मिळाला तर सरबत करून प्या. नारळ मिळाला तर खोबरं खा' असं म्हणणारे हे महाराज आपली आरती, आपला जयजयकार, लोकांचा आपल्या पायाच्या अंगठ्यावर नाक घासून केलेला नमस्कार का थांबवत नाहीत, नरेंद्रलीलामृताचा एक तरी पाठ रोज म्हणावा त्याने काशीला जाण्याचं पुण्य प्राप्त होतं असं का सांगतात हे एक ते जाणे आणि दुसरा तो परमेश्वर. 'नामस्मरणात वेळ गेला की विचारांच्या फ्लॉपीज लोड होतात' हे वाक्य वाचून तर प्रचंड करमणूक झाली. तरी बरंय ह्यांचं '२००६ ते २०१० दरम्यान तिसरे महायुध्द होणार' हे भाकीत खोटं झालं.

'माउली म्हणते मी अडचणी सोडवेन पण माझ्या मार्गाने जा. माझी भक्ती करा' असं ते म्हणतात. अलीकडे हे एकूण भवसागर वगैरे प्रकार मला समजेनासे झालेत. माणसाला अडचणीत टाकायला देवाने जन्म दिलाय का? बरं असेल दिला तर त्याने त्यातून आपली प्रगती करावी असा त्याचा हेतू असला पाहिजे. म्हणजे लहान मूल चालायला शिकताना अडखळतं, तोल सांभाळायला धडपडतं तेव्हा आई त्याला तोल सावरू देते. ते पडलं धडपडलं तर त्याला फुंकर घालते, त्याला प्रोत्साहन देते, ते पुढे जायला आपण आणखी काही करू शकतो का ह्याचा विचार करते. "माझ्या पाया पड, नाक घास म्हणजे मी तुला सावरेन" असं नाही म्हणत. मग देवाचा असा उफराटा न्याय का? माझा उदोउदो कर म्हणजे मी तुला तारुन नेतो हे शुध्द ब्लेकमेलिंग झालं. मग त्यातून नवससायास, मंदिरापुढे रांगा लावणे, देवाला दागिने, मुकुट अर्पण करणे असले प्रकार सुरु होतात. कधी भेटलाच कोणी सच्चा गुरु तर हे प्रश्न विचारेन म्हणते. आणि हो, हे महाराज असंही म्हणतात की 'स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज' असा जप करा. जो ह्या मार्गाने जाईल त्याची अडचण निवारण होईल. अडचण नक्की कोण निवारणार आहे? माउली का हे 'स्वामी नरेंद्र महाराज'????

लेख वाचून पु.लं. च एक वाक्य आठवलं - जगात कुंभार थोडे आणि गाढवं फार. तस्मात कुंभार हो, गाढवांस तोटा नाही. :-)

No comments: