Sunday, November 9, 2014

२. नवल, दिवाळी अंक २०१४

खरं तर 'खगम' ही या अंकातली पहिली कथा - सत्यजित रे ह्यांच्या मूळ कथेचा अनुवाद. पण 'गांधीवाड्यातलं भूत' ह्या कथेच्या नावातला 'भूत' हा शब्द वाचून मी ती आधी वाचायला घेतली आणि स्वत:चा पचका करून घेतला. कथा अगदीच बाळबोध वाटली. मग चुपचाप 'खगम' कडे वळले. 'खगम' ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे असा उल्लेख कथेत आहे. मी ह्या व्यक्तिरेखेबद्दल कधी ऐकलं/वाचलं नव्हतं. पण ही अनुवादित कथा मस्त वाटली. कधीतरी मूळ कथा वाचता यावी असं फार वाटलं.

'विलक्षण सत्यकथा' मधला 'आपले अडाणी बांधव' आणि 'नेपोलियनचे स्त्रीसंबंध' हे दोन्ही लेख आवडले. त्यामानाने 'चमत्कारिक भविष्यकथन' अपूर्ण वाटला.

'संदेहकथा' भागातली अशीच अतिशय आवडलेली कथा म्हणजे सुनील दांडेकर ह्यांची 'एका कोळीयाने'. कदाचित आयटी क्षेत्राची पार्श्वभूमी असल्यामुळेही असेल. 'चीफ आर्किटेक्ट' म्हटल्यावर काय प्रकार असेल ते कळून चुकलं. पण शेवटचा ट्विस्ट आवडला. अरुण मांडे ह्यांची 'संकटमोचक' सुध्दा मस्तच. रमा गोळवलकर ह्यांची 'पुनरावृत्ती' सुरुवातीला अतिशय रंजक वाटली पुराणकाळातील कथेनुसार शिळा असलेल्या ठिकाणाचं स्थानमाहात्म्य आणि आधुनिक काळात जवळच अणुउर्जा निर्मिती केंद्र असणं ह्याची काहीतरी सांगड घातली जाईल असं वाटलं होतं पण शेवट गुंडाळल्यासारखा वाटला. खरं तर कथा अर्धवट वाटली.

'कर्नलचा कोट' ही अनुवादित कथा वाचावी अशीच. 'विज्ञान-काल्पनिका' मधली फक्त 'प्रीत तुझी माझी' आवडली. 'डाव' काही खास वाटली नाही. आणि 'तुझ्यावाचून गमेना' तर अगदीच काहीतरी वाटली. 'डस्टी', 'विलक्षण प्रतिस्पर्धी', 'ब्रेम्बली' वाचताना निदान मला तरी बोअर झालं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. 'आगच्छ कामेश्वरी' थोड्या वाह्यात धाटणीची वाटली. जयश्री कुलकर्णी ह्यांची 'चकवा' शेवट काय होणार ह्याची कल्पना येऊनसुध्दा आवडली.

'युद्धकथा' भागातला 'युद्धाची अखेर अखेर होता होता' हा लेख खास उल्लेखनीय. 'सागरा प्राण तळमळला' ही सत्यकथा आहे असं सुरुवातीवरून वाटलं. पण नंतर वाचताना हा कल्पनाविलास आहे हे लक्षात आलं तरी थोडं गोंधळ उडालाच.  'रोमन इतिहासाचा साक्षीदार' वाचून आपणही एकदा 'कलोझियम' पाहिलं पाहिजे हे प्रकर्षाने जाणवलं.

'दत्तक' ह्या भयकादंबरीची पानं निदान मी विकत घेतलेल्या प्रतीत तरी नव्हती त्यामुळे ती वाचता आली नाही.

एकूणात काय तर काही अपवादात्मक कथा वगळता अंकाने निराशा केली. :-(

No comments: