Monday, October 31, 2011

लोकसत्तात दररोज येणारी त्यांच्या दिवाळी अंकातल्या लेखांबद्दलची माहिती वाचून अंकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. म्हणून मागच्या सोमवारीच अंक घेऊन आले आणि दिवाळीच्या दिवशी अधिरतेने अंक उघडला. पण नाही म्हटलं तरी निराशाच पदरी आली.

पहिले ३-४ लेख अमेरिकेत स्थित असलेल्या आणि तिथे बहुराष्ट्रीय कंपन्यांत नोकरी करणाया भारतीयांचे होते. ह्या लेखांचं प्रयोजन कळलं नाही. वेगळं सांगण्यासारखं असं ह्यांच्यात काहीही नव्हतं. तीच गोष्ट विनोदी लेखांची. एकही लेख ’विनोदी’ वाटला नाही. :-(

सचिन कुंडलकर ह्यांनी लिहिलेला ’ज्याचा त्याचा प्रश्न’ हा लेख वाचून तर हसावं का रडावं हेच कळेना झालं. कोणाच्याही खाजगी आयुष्य़ात नाक खुपसायचा इतरांना हक्क नाही हे लेखकाचं मत अगदी मान्य. आपल्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी असणाया व्यक्तिचं खाजगी आयुष्य हे त्या कामगिरीचं मूल्यमापन करण्यात गणलं जाऊ नये हेही मान्य. पण म्हणून ’जबरदस्तीचे शारिरिक संबंध सोडता समाजात इतर सर्व प्रकारचे लैंगिक संबंध मोकळेपणे चालू रहावेत अशी माझी इच्छा आहे’ असं म्हणणाया लेखकाची खरोखर कीव आली. लोकांना काहीतरी धक्कादायक वाचायला द्यावं असा एकमेव हेतू लिखाणामागे आहे की काय अशी शंका यावी इतपत ह्या मताच्या समर्थनार्थ त्यांनी मांडलेले मुद्दे तकलादू वाटले. तुम्हाला काय करायचं ते करा हो, बाकीच्या समाजाने काय करावं त्याची नसती उठाठेव कशाला?

’हरवलेल्या दिवसांची गोष्ट’ हाही लेख काही उमजला नाही. आयुष्यातल्या आठवणींचे तुकडे, किंवा कोलाज म्हणा हवं तर, ह्यापलिकडे जाऊन ह्या लेखात नेमकं काय सांगायचं आहे ते निदान मला तरी अजिबात समजलं नाही.

ह्याउलट ’फ़िरुनी पुन्हा भेटेन मी’ हा रविंन्द्र पाथरे ह्यांचा अमृता प्रीतमवरचा लेख आवडला. तसंच ’फ़रिश्ता’, न्यू हनुमान थिएटर आणि सत्यदेव दुबेंवरचे सर्व लेख माहितीपूर्ण होते. ’रॊबर्ट फ़्रॊस्टच्या शेतावर’ वाचून तर अमेरिकेत असताना ह्या जागेला भेट दिली नाही ह्याबद्दल खेद वाटला. पण फ़्रॊस्टच्या कविता वाचून काढायचं मात्र ठरवलं आहे, हा निश्चय कितपत तडीस जातो ते पहायचं. ’गिधाडांवर धाड’, ’खारे पिस्ते’, ’कांदा फ़ेस्टिव्हल’ हे लेख वाचूनही छान माहिती मिळाली. गिरिश कुबेर ह्यांचा ’त्रिशंकूंची पैदास’ हा लेख आजकाल चालणाया मिडिया सर्कसवर विचार करायला लावणारा होता.

हा अनुभव घेऊनही दिवाळी अंक वाचायची हौस काही अजून फ़िटलेली नाहिये. लोकसत्तात भटकंती आणि समदा ह्या अंकांबद्दलची आलेली माहिती आवडली. मिळाले तर वाचायचा बेत आहे. पाहू मिळतात का ते.

No comments: