Friday, February 25, 2022

९. भवताल (दिवाळी अंक २०२१) (किंमत २५० रुपये)

भवतालचा  ह्या वर्षीचा दिवाळी अंक म्हणजे भूजल विशेषांक. पाऊस पडल्यावर जमिनीत जे पाणी मुरतं आणि विहिरी किंवा बोअरवेल खणल्यावर लागतं ते भूजल अशी आपली बेसिक माहिती. त्याही पुढे जाऊन भूजल कुठल्या जमिनीत मुरू शकतं, त्याची गुणवत्ता, बोअरवेल खोदण्यातले तोटे, योग्य भूजल व्यवस्थापन कसं करावं, ते प्रत्येक गावागणिक का बदलू शकतं आदी अनेक मुद्द्यांचा व्यवस्थित उहापोह ह्या अंकात केला गेलेला आहे. 

अंकात एकूण ५ विभाग. पहिला - जागतिक संदर्भ. त्यात भूजलाची घटती पातळी आणि गुणवत्ता ही समस्या केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून जगभर लोकांना ह्या समस्येचा कसा सामना करावा लागतोय आणि मोरोक्को, अल्जेरिया तसेच भारतातली काही गावं ह्यावर कसा उपाय करताहेत ते वाचायला मिळतं. नंतरचा विभाग - भारतदेशी. भारतात पूर्वी पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं होतं, त्यात आपलया चुकांमुळे आपण कसे घोळ घातलेत, ते निस्तरायला काय करावं लागेल आणि जे करायचं आहे त्याची सध्याची स्थिती काय ह्यावर चर्चा आहे. 

तिसर्या विभागात - म्हणजे 'महाराष्ट्र माझा' मध्ये - महाराष्ट्राचं भूशास्त्र, तिथल्या जमिनीचे प्रकार, त्यानुसार भूजल धारण करण्याची तिची निरनिराळी क्षमता, त्यावरून ठरणारी पुनर्भरणाची पद्धत आदी मुद्दे मांडले आहेत. महाराष्ट्रातलया भूजल कायद्याची माहिती देणारा एक लेखही ह्या विभागात समाविष्ट आहे. 

अंकाचे शेवटले दोन विभाग खूप महत्त्वाचे. चौथा विभाग - प्रयोगांची गाथा - आपल्या महाराष्ट्र राज्यात पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय काय प्रकल्प राबवले गेले आणि सध्या कार्यान्वित आहेत त्याविषयी माहिती देतो. पैकी पानी फाउंडेशनच्या 'वोटर कप' स्पर्धेबदल आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेलच. त्याव्यतिरिक्त ग्राम गौरव-पाणी पंचायत, मानवलोक (अंबेजोगाई), सोपेकॉम, Aquadam आणि वोटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) ह्या संस्थांच्या कामाविषयी लेख आहेत. 

शेवटच्या विभागात (गावांच्या कहाण्या) शासकीय मदतीची वाट न पहाता एकत्र येऊन भूजलाचे व्यवस्थित नियोजन करून आपली भूमी खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम करणाऱ्या मोहा (जिल्हा बीड, तालुका परळी), रणदुल्लाबाद (जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव) आणि बुकनवाडी (जिल्हा उस्मानाबाद) ह्या ३ गावांच्या गोष्टी आहेत. 

भूजल व्यवस्थापन ह्या विषयात रूची असणाऱ्या कोणाही व्यक्तीसाठी ह्या लेखात माहितीचा खजिना आहे ह्यात शंकाच नाही. पण ह्या विषयात सर्वसाधारण कुतूहल असणाऱ्या पण फार खोलात जायची इच्छा नसणाऱ्या माझ्यासारख्या वाचकासाठी काही लेख थोडे रटाळ वाटू शकतात. काही विदेशी व्यक्तींचे लेख अंकात आहेत त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं कार्य समजतं हे खरं पण ह्या लेखांचं भाषांतर नीट न झाल्याने ते कृत्रिम वाटले. 

ह्या उणीवा सोडल्या तर अंक छानच आहे. संग्रही ठेवण्याचा मोह झाला - विशेषतः सर्व लेखकांचे ईमेल आयडी असल्यामुळे. तो आवरला कारण ह्या व्यक्तींना थेट संपर्क करावा लागेल अशी शक्यता कमी दिसते. फक्त पुढेमागे जमलंच तर काही संस्थांना मदत करायला आवडेल म्हणून त्यांचे डिटेल्स स्वतः:साठी इथे नोंदवून ठेवतेय. 

Flood Resilience | ISET-International (i-s-e-t.org)

https://www.aquadam.net/about/

https://www.soppecom.org/aboutus.htm

https://wotr.org/

https://www.paanifoundation.in/

No comments: