हा अंक पाहिल्यावर विकत घ्यायचा की नाही ह्या संभ्रमात पडले होते. भयकथा वाचायला तर आवडतात पण वाचल्यावर भीतीही वाटते. :-) शेवटी घेऊन तर पाहू यात ह्या निष्कर्षाप्रत येऊन अंक घेऊन आले. तरी काही दिवस तो उघडून वाचायचा धीर होत नव्हता :-)
खरं सांगायचं तर अंकाने थोडी निराशाच केली. बऱ्याचशा कथांची सुरुवात वाचून पुढे काय होणार आहे ह्याचा अंदाज येत होता. तरी त्यातल्या त्यात आवडलेल्या कथा म्हणजे थांग (सचिन देशपांडे), स्किनटोन (सचिन भाऊसाहेब पाटील), बंध (उमेश पटवर्धन), रहनोम (हेमंत कोठीकर) आणि दुहेरी (गुरुदत्त सोनसुरकर).
'धूसर' (अनिरुद्ध फळणीकर) ही कथा फारच लांबल्यासारखी वाटली. 'मनबावरी' (सुनील जावळे) ही रोमँटिक म्हणावी अशी कथा ह्या अंकात कशी हे रहस्य उलगडलं नाही. 'मृगजळ' (राजीव काळे) ह्या कथेला फार्मा इंडस्ट्रीची पार्श्वभूमी असल्याने इंटरेस्टींग वाटली पण त्याचाही शेवट प्रेडिक्टेबल होता.
अंकात नवोदित लेखकांबरोबरच गाजलेल्या रहस्यकथा लेखकांच्या कथाही समाविष्ट आहेत. पैकी 'बारा पस्तीस' ही रत्नाकर मतकरींची कथा आवडली तरी त्यात राधाकिशन किरीटला मारतो असा काही शेवट केला असता तर वेगळा ट्विस्ट झाला असता असं वाटून गेलं. 'होळी' ही जी. ए. कुलकर्णी ह्यांची कथा शाळेत वाचलेली असल्याने पुन्हा वाचली नाही. 'रहस्य...एका श्रध्देचे!' ही श्रीकांत सिनकर ह्यांची कथा सत्यकथा होती का काल्पनिक ते कळलं नाही. नारायण धारप ह्यांची 'ते सर्वत्र आहेत' आणि सुहास शिरवळकर ह्यांची 'थ्री डायमेन्शल' आवडल्या नाहीत
हा अंक वाचताना असंही वाटून गेलं की अश्या कथा वाचायची आवड आता मला उरली नाही. अभद्र, अमंगल अशी वर्णनं आता वाचवत नाहीत. ह्या वर्षी कदाचित हा अंक घेणार नाही.
No comments:
Post a Comment