पेपर टाकायला येणाऱ्या
माणसाने ‘किल्लाचा अंक मिळत नाहीये’ म्हटल्यावर माझं धाबं दणाणलं. म्हटलं ह्या
बाबावर विसंबून राहिले तर अंक हाताचा जाणार. वेळ मिळताच मेजेस्तिक बुकदालनात धाव
घेतली. तिथे अंकांची थप्पी बघून जीव भांड्यात पडला. :-) आधी बाकीचे अंक वाचून घेतले आणि शेवटी शेवटी वाचायला
म्हणून हा अंक राखून ठेवला. आवडता खाऊ पुरवून पुरवून खायचा असतो ना :-)
ह्या वेळचा अंक थोडा वेगळा
आहे. जवळपास निम्म्या अंकात छत्रपती संभाजी राजांवर आधारित लेख आहेत. त्यामुळे लेख
दोन भागात विभागला गेलाय. पहिल्या भागात डॉक्टर देगलूरकर ह्यांनी होट्टलच्या
प्राचीन मंदिराबद्दल लिहिलंय. बोरिवलीच्या एका संस्थेत प्राचीन भारतीय इतिहासावर
आधारीत अभ्यासक्रम आहेत त्यात एक प्राचीन मंदिराबद्दल असल्याचं आठवतंय. हा लेख
वाचून तो अभ्यासक्रम करायची इच्छा पुन्हा बळावली. गरुडाचे घरटे हा रायगडावरचा
अभिजित बेल्हेकरांचा लेख आवडला. बुंदेलखंडातल्या ओरछा किल्ल्यावर अमोल सांडे
ह्यांनी लिहिलेला लेख वाचून ह्यावर एपिक चेनेलवरच्या ‘एकांत’ मध्ये एक एपिसोड होता
त्याची आठवण झाली. आजकाल भारतातल्या किल्ल्यांवर खूप लिहिलं जातंय. पण परदेशातल्या
किल्ल्यांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. ‘राजवाडा व्हर्सायचा’ (राजीव खांडेकर)
आणि ‘सकारा-इजिप्तची पाषाणलिपी’ (सिमंतिनी नूलकार) हे लेख ह्या अंकापुरती ती उणीव
दूर करतात.
संभाजी महाराजांवरच्या लेखांची
सुरुवात होते ती ‘राजमुद्रा’ ह्या योगेश काळजे ह्यांच्या लेखाने. हा आणि त्यापाठोपाठचा
शिवराई वरचा पुरुषोत्तम भार्गवे ह्यांचा लेख शिवकालातल्या चलनांविषयी छान माहिती
देतात. ह्या नाण्यांचे फोटो पाहताना एखाद्या गडावर फिरताना कधी आपल्याही हाती
एखादी शिवराई गवसावी असं वाटल्याशिवाय कसं राहील? :-) गिरीश टकले ह्यांचा ‘रामशेजचा लढा’ हा लेख बराच लांबलाय पण
तरी मराठ्यांच्या इतिहासातल्या एका आगळ्या लढाईची रोमहर्षक माहिती देतो. मराठे ही
लढाई जिंकले होते त्यामुळे तो अधिकच मनोरंजक वाटतो. मात्र शाळेत इतिहासात
ह्याबद्दल वाचल्याचं अजिबात स्मरत नाही.
संभाजी महाराज म्हणजे एक
रगेल, रंगेल आणि बेजबाबदार राजा अशी एक प्रतिमा साहित्यातून रूढ झालेली आहे. मोहित्यांची
मंजुळा, थोरातांची कमळा ह्या चित्रपटाबद्दल आपण ऐकलेलं असतं. तसंच गोदावरी
प्रकरणाबद्दल वाचलेलंही असतं. पण ही प्रतिमा कशी चुकीची आहे हे डॉक्टर शालिनी
मोहोड ह्यांचा लेख वाचून जाणवतं. अर्थात कुठल्याच माहितीवर डोळे झाकून विश्वास
ठेवावा अशी आजची स्थिती नाही. त्यामुळे ह्या लेखात म्हटलं आहे तसं सगळं नसेलही
कदाचित. शेवटी काय तर कोणी माणूस पूर्ण चांगला किंवा पूर्ण वाईट नसतोच. इतिहासात नेमकं
काय घडलं होतं ते कोण छातीठोकपणे सांगू शकेल? तरी ह्याबाबतीत संभाजीराजांवर अन्याय
झालाय हे पटतं.
संभाजीराजांनी काही ग्रंथही
लिहिले होते हे मला अजिबात माहित नव्हतं. ‘कविहृदयी ग्रंथकार’ हा मृदुला तापस
ह्यांचा लेख ह्याबाबत अधिक माहिती देतो. ‘कविकलश’ (संदीप तापकीर) आणि ‘हतो वा
प्राप्यसि स्वर्गम’ (सौरभ वैश्यंपायन) हे लेखही वाचनीय.
दरवर्षीप्रमाणे किल्लाचा
हाही अंक कपाटात जाऊन बसलाय आता J
No comments:
Post a Comment