यंदाच्या
दिवाळीचा वाचायला घेतलेला
हा दुसरा अंक.
सुरुवातीलाच
रत्नाकर मतकरींची कथा बघून
जाम खुश झाले. पण
हा आनंद फार काळ टिकला नाही.
कथा आजकालच्या
काळात वास्तव वाटावी अशी.
त्यामुळे
प्लॉटमध्ये फार नाविन्य नव्हतं
पण शेवटी एखादा ट्वीस्ट असेल
असं वाटलं होतं, तो
नव्हता त्यामुळे निराशा झाली.
:-(
पुढचा
लेख कोलकात्यामधल्या सांडपाण्यावर
नैसर्गिकरित्या प्रक्रिया
करून त्यावर मासे आणि भात
पिकवण्याचा चमत्कार करून
दाखवणाऱ्या बिनखर्चाच्या
प्रणालीवरचा रिपोर्ताज.
निसर्गावर आणि
पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या
कोणाही माणसाने वाचावा असाच.
आपली आणखी शहरं
हा कित्ता गिरवतील तर किती
छान होईल. अर्थात
आहे तीच प्रणाली उध्वस्त
करायचे करंटे प्रयत्न बिल्डरांच्या
लॉबीकडून होताहेत हे वाचून
असं काही घडण्याची शक्यता
धूसरच दिसते म्हणा.
आपले डोळे कधी
उघडणार देव जाणे!
‘मी
गुणगुणसेन' हा
अनिल अवचट ह्यांचा लेख भावला
ते त्यांनी शास्त्रीय गायकीचं
रूढार्थाने शिक्षण न घेता ती
कशी समजून घेता येते ह्याचं
वर्णन केलंय त्यामुळे.
गेली कित्येक
वर्षं मी ह्याबाबतीत काहीतरी
करावं, निदान
ह्या विषयाची किमान तोंडओळख
असावी असे बेत करतेय पण अद्याप
काही प्रगती नाही.
हा लेख वाचून
याबाबतीत पुन्हा प्रयत्न
करावेसे वाटू लागलेत.
कोणी सांगावं
थोडी प्रगती होईलही.
‘एका फळाचा
प्रसाद' ही
कथा वेगळ्या ओळख नसलेल्या
क्षेत्रासंबधात असल्याने
आवडली. ‘विवियन
मेयरच्या शोधात'
हा नितीन दादरावाला
ह्यांचा लेख एका अश्या महिलेची
ओळख करून देतो जिने सहज म्हणून
अनेक छायाचित्रं काढली आणि
ती तिच्या मृत्यूपूर्वी २
वर्ष आधी निव्वळ योगायोगाने
जगापुढे आली. त्या
फोटोजमधून १९५०-७०
सालच्या अमेरीकेचचं नव्हे
तर जगातल्या बऱ्याच देशांचं
दर्शन घडतं. ऐकावं
ते नवलच! गौरी
कानेटकरांचा 'सुपरकेव्ह्ज'
वरचा लेख सुपरडुपर
आवडला. जमलं
तर ह्या विषयावर नेटवर आणखी
माहिती मिळवून वाचेन.
‘अवेळीच
जेव्हा दाटला अंधार'
हा दोन्ही किडनी
फेल झालेल्या नवरयाच्या
आजारपणात बायकोने दिलेल्या
लढ्याची कहाणी सांगणारा लेख
वाचून लेखिका वृषाली जोगळेकरांना
अक्षरश: साष्टांग
नमस्कार घालावासा वाटला.
रुग्णांना
दिलासा देण्याऐवजी त्यांच्या
नातेवाईकांना धावाधाव करायला
लावणारी आपली मेडिकल आणि लीगल
सिस्टीम खरोखर धन्य आहे.
एव्हढं करून
गैरप्रकार होतात आणि ते करणे
निवांत असतात. चोर
सोडून संन्याशाला सूळ!
तरी 'सर
सलामत तो पगडी पचास'
ह्या म्हणीचा
अर्थ नव्याने उमगला हा लेख
वाचून. ‘सोयरिक'
हे रंगनाथ पाठारे
ह्यांचा 'सातपाटील'
ह्या आगामी
कादंबरीतील प्रकरण रोचक वाटलं.
ही कादंबरी
लायब्ररीत येते का ते पाहायला
हवं. तसंच
'ताडोबाचे
सगेसोयरे' हा
दीनानाथ मनोहर ह्यांनी स्वर्गीय
बाबा आमटेंच्या सोमनाथ
प्रकल्पातल्या प्राण्यांवरचा
लेखही छान आहे.
‘आनंदवन'
ला जायचं आहे
हे पुन्हा एकदा प्रकर्षाने
जाणवलं. कोणाही
सामान्य माणसाप्रमाणे
रेल्वेगाडीचं प्रचंड आकर्षण
असल्यामुळे गणेश कुलकर्णींचा
'ये
दुनिया तुफान मेल'
हा लेख मस्त
वाटला. हिंदी
चित्रपटसृष्टीमधल्या रेल्वे,
स्टेशन वगैरेंच्या
चित्रणाबद्दल बरीच मनोरंजक
माहिती मिळते. पण
लेखाच्या शेवटी केकी मूस आणि
त्यांच्याकडे असलेला एक कुत्रा
ह्यांच्याबद्दल वाचून खूप
चुटपूट लागते. त्या
कुत्र्याचा मालक त्याला शोधत
का नाही आला कोणास ठाऊक :-(
‘दंडकारण्यात
रुजतंय लोकांचं राज्य'
हा दीप्ती राऊत
ह्याचा लेख वाचून खूप समाधान
वाटलं. नक्षलवाद्यांचं
प्राबल्य असलेल्या भामरागड
आणि आजूबाजूच्या भागात लोकांच्या
सहभागाने विकासाचं काम कसं
सुरु झालंय ह्याची प्रेरणादायक
माहिती ह्यातून मिळते.
आपली वर्तमानपत्रं
नकारात्मक बातम्या देण्याऐवजी
हे असले लेख का नाही छापत?
सुहास
पळशीकर ह्याचा आजकालच्या नको
त्या कारणांसाठी Angry
होणार्या,
धुमसत्या समाजावर
लिहिलेला लेख थोडा वाचला.
पण पुढेपुढे
तो जास्तच गंभीर होत गेला
त्यामुळे सोडून दिला.
पूर्वी मी
इंटरेस्ट नसलेले लेखही नेटाने
वाचत असे. जणू
काही ते मध्येच सोडून देणं
पाप. आजकाल
मिळालेला प्रत्येक क्षण कारणी
लावायचा अशी प्रतिज्ञा केल्याने
(आणि
ती अजूनपर्यंत टिकून असल्याने!)
जे आवडत नाही
ते वाचत नाही. राजेश्वरी
देशपांडेंचा लोकसत्ताच्या
दिवाळी अंकातला लेख फारसा
आवडला नसल्याने ह्या अंकातला
त्यांचा लेखही सुरुवातीचे
काही परिच्छेद वाचून स्किप
केला. ‘कायद्याचं
राज्य: अपेक्षा
आणि अडचणी', 'श्याम
मनोहर: जगण्यात
मजा येत नाहीय' हे
लेखही ह्याच कारणाने वाचले
नाहीत. ‘स्वीकारलेली
सक्तमजुरी' हा
लेख बहुधा महाअनुभवच्या दर
महिन्याच्या अंकातल्या एखाद्या
लेखमालिकेतला पुढचा भाग असावा
असं वाटलं कारण स्वतंत्र लेख
म्हणून त्याची संगती लागत
नाही.
म्हणजे
एकंदरीत मागच्या वर्षीच्या
मानाने थोडी निराशा झाली हे
खरं. पण
तरी पैसा वसूल अंक.
No comments:
Post a Comment