खरं तर ह्या लेखकाचं नाव मी ऐकलेलं नाही. पण पुस्तक चाळून पाहिलं तेव्हा इंटरेस्टिंग वाटलं. पुस्तकाची मांडणी तशी चांगली केली आहे. पहिल्या भागात जुन्या काळातील के. एन. सिंग., जीवन अश्या ओळखीच्या आणि याकूब, नायमपल्ली ह्या (निदान मला तरी) थोड्या अनोळखी व्हीलन्सने सुरुवात होते. दुसर्या भागात अमजद खान, प्राण, अमरीश पुरी ह्यासारखे दादा लोक भेटून जातात. तिसर्या भागात विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा आणि नाना पाटेकर ह्या नायक असून खलनायकाची भूमिका केलेल्या नटांबद्दल माहिती मिळते. ह्या गटात नानाला कोंबायचं प्रयोजन मला कळलं नाही. पण बहुतेक तो दुसर्या कुठल्या गटात बसत नसल्याने त्याला इथे समाविष्ट केलं असावं.
चौथा भाग वेगळा का केला हेही समजलं नाही. ह्यात अजित, प्रेम चोप्रा, गुलशन ग्रोव्हर असे वेगवेगळ्या काळातले व्हीलन्स एकत्र आणलेत पण शीर्षक दिलंय 'व्हिलन बाय प्रोफेशन'. म्हणजे काय? सगळे प्रोफेशनल व्हीलन्सच आहेत की. तीच गत पाचव्या आणि सहाव्या भागाची. पाचव्यात 'समथिंग स्पेशल' ह्या नावाखाली अशोक कुमार, तरुण बोस, रेहमान, शशी कपूर आणि प्रेमनाथ ह्या सगळ्यांची एकत्र मोट बांधली आहे. तर सहाव्यात शक्ती कपूर, अन्वर हुसेन, मनोज बाजपेयी असे ५-६ व्हिलन्स भेटतात. पहिल्या तीन भागातल्या स्वच्छ वर्गीकरणाचा इथे साफ फज्जा उडालेला दिसतो.
सातवा भाग थोडाफार रुळावर आलाय. ह्यात गाण्यातून व्यक्त झालेली खलनायकी, डाकू, दरोडेखोर असे विषय आहेत. आठवा भाग - हॉलीवूडच्या खलनायकांवरचा - फारच संक्षिप्त झालाय. नवव्या भागात मराठीतले खलनायक आहेत. डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर आणि निळू फुले ह्यांच्याबद्दल विस्ताराने माहिती असली तरी राजशेखर, दादा साळवी ह्यांच्यासारख्या नटांचा, शशिकला, इंदिरा चिटणीस ह्या मराठी खलनायिकांचा उल्लेख नाही, जुन्या ऐतिहासिक, पौराणिक किंवा ग्रामीण विषयांवर आधारित चित्रपटातल्या खलनायकांबद्दल काहीच माहिती नाही हे खटकतं.
तसंच ह्या सगळ्या वर्गीकरणाच्या गडबडीत मनमोहन, मेकमोहन, देव कुमार, सुजितकुमार, रझा मुराद, शेट्टी असे अनेक खलनायक विसरले गेलेत.
शेवटला भाग मात्र छान जमलाय. ह्यात ललिता पवार, शशिकला, नादिरा, बिंदू, हेलन ह्यासारख्या गाजलेल्या आणि प्रणोती घोषसारख्या एकाच चित्रपटात झळकलेल्या खलनायिकांबद्दल चांगली माहिती मिळते. मात्र अरुणा इराणी, शम्मी, मनोरमा ह्यांचा उल्लेख राहून गेलाय.
प्रत्येक खलनायक आणि खलनायिकेबद्दलचं प्रकरण मात्र खूप विस्कळीत झालंय. प्रकरणाची सुरुवात कधी त्यांचा ह्या क्षेत्रात प्रवेश कसा झाला ह्याच्या माहितीने, कधी त्यांच्या चित्रपटाच्या यादीने तर कधी एखाद्या किश्श्याने होते. त्यापेक्षा आधी त्यांचा प्रवेशआणि मग त्यांचे चित्रपट त्यातल्या खास किस्से आणि वैशिष्ट्यासह अशी मांडणी असती तर मजकूर अधिक वाचनीय झाला असता. काही लेखात अनवधानाने चित्रपटातील रहस्य उलगडलं गेलंय – उदा. गुमराह (अशोक कुमार) आणि गुप्त (काजोल). तर काही ठिकाणी तपशिलाच्या चुका झाल्या आहेत – उदा. लावारिस मध्ये अमिताभ बच्चनची आईआणि प्रेयसी दोघींच्या नावाचा उल्लेख 'मोहिनी' असा आहे. तर 'आरती' चित्रपटाच्या बाबतीत शशिकलाचा उल्लेख नायिकेची नणंद आणि जाऊ असा झालाय.
ह्या पुस्तकातून बरीच माहिती मिळत असली तरी ते अधिक वाचनीय करता आलं असतं एव्हढं नक्की.
ता. क. ‘राजकुमार आणि रेहमान ह्यांची "वक्त" मधली संवादातली जुगलबंदी आणि दोघांचं टायमिंग म्हणजे उच्च कोटीच्या अभिनयाचा आविष्कार होता' हे वाक्य वाचून भरपूर करमणूक झाली. राजकुमार अभिनय करायचा हि ब्रेकिंग न्यूज आहे :-)
No comments:
Post a Comment