Wednesday, August 16, 2017

माझं लंडन, नाच ग घुमा, रारंगढांग

मराठी पुस्तकंच वाचायची ह्या माझ्या निश्चयाने पुन्हा उचल खाल्ली त्याचा हा परिणाम. पुस्तकं वाचून तर झाली पण त्यांच्याबद्दल इथं लिहायचं राहून गेलं. त्यामुळे आता सामुदायिक विवाहासारखं हे सामुदायिक परीक्षण :-)

तर पहिलं पुस्तक 'माझं लंडन'. मीना प्रभू ह्यांची अनेक पुस्तकं वाचली आहेत त्यांचं रोमवरचं पुस्तक 

सोबत घेऊनच रोम पहायचं हा निश्चय करूनही युगं लोटली आहेत. लंडनवरच्या पुस्तकात वाचण्यासारखं ते काय असणार म्हणून आजवर ह्या पुस्तकाकडे काणाडोळा केला होता. पण आता एकेक लेखक-लेखिका धरून लायब्ररीत तिची वा त्याची असतील ती सगळी पुस्तकं वाचायचीच म्हटल्यावर हेही वाचून बघू म्हणून घरी आणलं. तसं ब्रिटीशांचं आणि माझं वैयक्तिक वैर काही नाही. पण आपल्यावर एव्हढी वर्षं राज्य केलं आणि जाताना फुट पाडून कायमची डोकेदुखी लावून गेले म्हणून थोडा दात आहे एव्हढंच. लग्न झाल्यापासून लंडन मध्ये रहात असलेल्या लेखिकेचं मत काय हे बघायची उत्सुकता होती. पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि वाचत गेले. पुस्तक वाचलं तेव्हा त्यातल्या बर्याच मुद्द्यांवर इथे लिहायचं ठरवलं होतं. आता मध्ये सुमारे महिनाभर गेल्याने बर्याच गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत. पण लेखिकेने एकूण पुस्तकात ब्रिटीशांबद्दल कुठेही जराही कडवटपणा न येऊ दिल्याचं स्मरतंय. कदाचित इतकी वर्षं तिथे घालवल्याने असेल. असो. तर लंडनमध्ये जुन्या काळातल्या एव्हढ्या नवलाईच्या वस्तू निगुतीने जतन करून ठेवल्या आहेत हे माहित नव्हतं. आता त्या बघायला तिथे जावंच लागणार. तेही हे पुस्तक सोबत घेऊन. आपली भारतीय जीवनपध्दती, मुलांना वाढवायची पध्दत आणि तिथले विचार ह्यांच्यातला फरक जाणवून देणारे दोन प्रसंग आताच्या काळात फारसे विचित्र वाटत नाहीत. लेखिकेने जाताजाता तिथली ड्रग्जची समस्या,Child Battering, लंडन सारख्या शहरातल्या काही भागात आढळणारी गरिबी ह्यावरही भाष्य केलं आहे. त्यातली Child Battering वरची पानं दोनच होती पण तीही माझ्याच्याने वाचली गेली नाहीत. :-( मीना प्रभू ह्यांच्या पुस्तकांत कुठल्याही देशातल्या खाद्यसंस्कृतीबद्दल फारशी माहिती नसते तसंच ह्याही पुस्तकाचं झालंय. अर्थात इंग्लिश जेवणात लिहिण्यासारखं असतं काय असंही म्हणता येईल. तसंच शाही कुटुंबाबद्दल थोडी अधिक वाचायला आवडलं असतं.

वाचलेलं दुसरं पुस्तक म्हणजे माधवी देसाई ह्यांचं 'नाच ग घुमा'. काही दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये वाचलीच पाहिजेत अश्या स्त्रीचरित्रांची एक लिस्ट आली होती त्यात ह्या पुस्तकाचं नाव होतं. त्या दिवशी लायब्ररीत मराठी पुस्तकं शोधत असताना हे समोरच दिसलं आणि घेऊन आले. तसं सुनीताबाइंच्या 'आहे मनोहर तरी' वर पु.लं. चे चाहते जसे नाराज होते तसंच काहीसं ह्याही पुस्तकाबद्दल झाल्याचं वाचनात होतं. माधवी देसाई ह्या भालजी पेंढारकर ह्यांच्या कन्या, रणजीत देसाई ह्यांच्याशी लग्न व्हायच्या अगोदर त्यांचं आणि देसाईचंसुध्दा एक लग्न आधी झालं होतं ही सगळी माहिती नवी होती. पुस्तक वाचून अनेक कोडी पडली. एक तर लेखिकेने रणजीत देसाई ह्यांच्याशी लग्न का केलं ते कळलं नाही - त्यांच्यावर प्रेम जडलं म्हणून का परिस्थितीशी झगडून कंटाळा आला होता म्हणून? रणजीत देसाई आणि त्यांच्यात नक्की काय बिनसलं? घटस्फोट द्यायच्या वेळी लेखिका एव्हढ्या अगतिक का झाल्या? रणजीत देसाई ह्यांच्या पहिल्या बायकोला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ का आली? पुस्तकात १-२ ठिकाणी लेखिकेचं मत परस्परविरोधी असल्याचंसुद्धा जाणवतं. एके ठिकाणी त्या आपली कुत्री आपल्यावर विश्वास टाकतात पण माणसं टाकत नाहीत त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात आणि नंतर आपला सासरच्या माणसांवर विश्वास नसल्याचं सांगतात. एकीकडे रणजीत देसाईच्या पहिल्या बायकोच्या मुली आईचा फोटो दाखवून आपल्याकडे रडतात असं म्हणतात आणि दुसरीकडे ह्या मुलींचा आपल्यावर विश्वास नाही असं लिहितात. खर्या आयुष्यात कोणी पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट नसतं असं म्हटलं तरी त्यांच्या सासरच्या लोकांची बाजू नीटपणे कळत नाही. पुस्तकभर असं वाटत रहातं कि माधवी ह्यांनी दोष आपल्याकडे घेतला असला तरी एकूणात आव 'दोष माझ्या चांगुलपणाचा आहे, माझ्या चांगल्या प्रयत्नांचा लोकांनी वाईट अर्थ घेतला' हाच आहे - मग ते गोव्याचे सासरचे लोक असोत नाहीतर कोवाडचे. हे पटत नाही. हे मी रणजीत देसाई ह्यांची चाहती म्हणून लिहित नाहीये. कारण एक लेखक आणि माणूस ह्यात जमीन- अस्मानाचा फरक असू शकतो हे मला माहित आहे. मी हे एक माणूस, एक स्त्री, एक वाचक म्हणून लिहितेय. पुस्तकात बरंच काही सांगितलेलं नाही असं वाटत राहतं. त्यामागचं कारण काय ते त्यांनाच ठाऊक पण त्यामुळे नाण्याची एकच बाजू समोर आल्यासारखी वाटते.पूर्ण पुस्तक वाचून झालं तरी मला आपला गोव्यातला त्यांना भेटलेला तो मिस्तीस अधिकारी आठवत राहिला. माझ्यातल्या eternal romantist ला आधी वाटलं ह्या का नाही निघून गेल्या त्याच्यासोबत? मग थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की नीट बसलेली आयुष्याची घडी मोडून असं अनोळखी जगात जाणं सोपं नसणार - सडाफटिंग स्त्रीसाठी नाहीच आणि पदरी एक मुल असलेल्या विवाहित स्त्रीसाठी तर नाहीच नाही. तिथे जुळलं नाही तर काय करणार हा विचार असावा नक्कीच. त्यांचा नवरा छळ करणारा असता किंवा हयात नसता तर ह्या कथेला वेगळं वळण लागलं असतं कदाचित. रस्त्याला फाटे फुटतात तिथे आपण न घेतलेली वाट कुठे जाते ते कोण सांगू शकतं, नाही का?

नाच गं घुमा' मध्ये 'रारंगढांग' चा उल्लेख आला आणि ह्या पुस्तकाच्या विचित्र शीर्षकाबद्दलची अनेक वर्षांपासून असलेली माझी उत्सुकता पुन्हा जागी झाली. कशाबद्दल आहे हे पुस्तक? मला आधी वाटलं प्रभाकर पेंढारकर ह्यांचं आत्मचरित्र आहे पण पुस्तक घरी आणल्यावर लक्षात आलं की हिमालयातल्या एका दुर्गम भागात रस्ता बनवणार्या आर्मी युनिट आणि तिथे काम करणाऱ्या एका सिव्हिलीयन इंजिनियरवरची ही कथा आहे. ‘ढांग' म्हणजे आकाशाच्या पोटात घुसलेला दुर्गम अभेद्य कडा ज्यातून मार्ग काढायचा आहे. ‘रारंग' हे त्या कड्याचं स्थानिक भाषेतलं नाव. त्या इंजिनियरचं नाव, मला वाटतं, विश्वनाथ. चांगली मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या ज्ञानाचा लोकांना, देशाला फायदा करून द्यावा म्हणून तो आर्मीसोबत ३ वर्षांचा करार करून येतो. त्याची ह्या ढांगातून रस्ता काढायच्या कामावर नेमणूक होते पण आर्मीचे स्वत:चे कायदे असतात - काही लिखित, काही न लिहिलेले. त्यातले सगळेच विश्वनाथला पटतात असं नाही. आणि मग 'ब्लडी सिव्हिलीयन' अशी संभावना ठरलेली. त्यात हा रस्ता काढण्यापूर्वी काही आवश्यक बाबी नीट तपासल्या गेल्या नाहीत हे त्याच्या लक्षात येतं. तो आपल्या परीने त्या तपासून घ्यायचा आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या ते लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतो. पण 'हाताखालच्या अधिकार्यांनी वरून आलेले आदेश पाळलेच पाहिजेत' ही सैन्याची शिस्त आणि काम ठराविक वेळेत पूर्ण करायचा दबाव ह्यामुळे त्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो. मग पुढे सिव्हिलीयन इंजिनियर विश्वनाथ काय करतो हे वाचण्यासारखं आहे. हिमालयासारख्या दुर्गम भागात रस्ते बनवायचं काम सोपं नसणार हे आपल्याला माहित असतं पण कायकाय अडचणी येऊ शकतात ते हे पुस्तक वाचल्यावर कळतं. विश्वनाथच्या भोवतीच्या मेजर बंगा, नायर, सुभेदार, बहादूर ह्या व्यक्तिरेखात आपणही गुंतत जातो. आर्मीची बाजू कळते पण पटत नाही. विश्वनाथची बाजू अधिक पटत राहते. आपण सिव्हिलीयन म्हणून की काय कोण जाणे. एका वेगळ्या विषयावरचं म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचनिय आहे.

No comments: